म्हापसा,
माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी स्वत:ची करामत दाखवून भाजपाला यापूर्वीच दणका दिलेला आहे, अशी टिप्पणी करून, जिल्हा पंचायत व नगरपालिका निवडणुका झाल्यानंतरच आपण नवीन पक्षाची स्थापना करणार आहे, असे थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी स्पष्ट केले आहे.
काणका येथील स्वत:च्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्री. कांदोळकर म्हणाले, ‘‘जेव्हा मी नवीन पार्टी काढणार तेव्हाच मी भाजपाचा राजीनामा देणार आहे. अजूनही भरपूर वेळ आहे. काही गोष्टी योग्य वेळी कराव्या लागतात. मी सध्या काही घडामोडींचा अंदाज घेतोय, अभ्यास करतोय. त्यामुळे, मी अमुक करणार, तमुक करणार हे आत्ताच काही सांगू शकत नाही. मी विचारपूर्वक राजकारण करणारा आहे’’, असेही श्री. कांदोळकर यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले, की ‘‘हळदोणे पंचायतीत सत्तापालट करून मी सध्या माझ्या कार्याची नव्याने सुरुवात केलेलीच आहे. सुदैवाने माझ्यासमवेत भाजपाचे सच्चे, जुनेजाणते व क्रियाशील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणावर नाराज नाहीत; पण, गोव्यात भाजपाने जे काही चालवलेय त्याबाबत ते कमालीचे नाराज आहेत. प्राप्त परिस्थितीत येथील सारस्वत समाजही भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नाराज आहे’’, असेही ते म्हणाले.
काहीच पुरावे उपलब्ध नसताना रवी नाईक यांचे पुत्र रॉय याच्याविरोधात भाजपाने या पूर्वी भरपूर आरोप केले होते; पण, काही वर्षांपूर्वी ज्या रॉयवर आरोप केले जात होते, तो भाजपात प्रवेशात केलेला रॉय नाही, असा दावा भाजपाच्या काही नेत्यांकडून केला जातोय, ही मोठी शोकांतिका तथा लाजिरवाणी बाब आहे, असेही श्री. कांदोळकर म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे दोन पुत्र रितेश व रॉय यांनी भाजपात प्रवेश केल्याच्या घटनेमुळे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे नमूद करून कांदोळकर यांनी सांगितले, की ‘‘वास्तविक त्या दोघांचा भाजपाप्रवेश हा माझा विषय नाही. पण, मी भाजपाचा एक सदस्य आहे. रॉय यांच्यावर पूर्वी कित्येक आरोप भाजपाच्या नेत्यांनी केले होते. तेव्हा भाजपा विधानसभेत विरोधी पक्षात असताना कित्येक आंदोलनेही झाली होती. याच विषयावरून भाजपाचे १४ आमदार त्या वेळी विभानसभेत सभापतींच्या आसनापर्यंत धावले होते व त्यामुळे विधानसभा अधिवेशन सतत तीन दिवस तहकूब करावे लागले होते.
त्यासंदर्भात माहिती देताना कांदोळकर यांनी पुढे सांगितले, ‘‘वर्ष २०१२ ते २०१७ पर्यंत मी आमदारपदी होतो व त्यामुळे, मिकी पाशेको यांनी तसेच सुदिन ढवळीकर यांच्या सांगण्यावरून लवू मामलेदार यांनी विधानसभा सभागृहात याच प्रश्नावरून कसा काय वादंग माजवला होता, हे मी जवळून अनुभवले होते. त्या वेळी या विषयासंदर्भात मिकी पाशेको, मायकल लोबो, विष्णू वाघ यांचा समावेश असलेल्या सभागृह समितीची निवड झाली होती. पण, त्या समितीने सादर केलेला अहवाल अजूनही ताटकळत आहे. आज त्यापैकी विष्णू वाघ आमच्यामध्ये नसल्याने तो रॉय नेमका कोण आहे हे त्या समितीच्या अन्य सदस्यांनी स्पष्ट करावे. त्या वेळी रॉय यांच्यावर आरोप करणारे तत्कालीन आमदार मनोहर पर्रीकर खोटारडे, की सध्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हे खोटारडे आहेत हे त्यांच्या स्पष्टीकरणामुळे जगजाहीर होईल. त्या काळात आमदार मनोहर पर्रीकर, अनंत शेट व विष्णू वाघ हे आज हयात नाहीत; परंतु, खोटारडे, ‘फटिंग’ नेमके कोण, याचा उलगडा त्या वेळी आमदारपद भूषवणारे तथा पक्षाचे नेते म्हणून प्रतिनिधित्व करणारे लक्ष्मीकांत पार्सेकर, राजेंद्र आर्लेकर, दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक, मिलिंद नाईक, रमेश तवडकर, विजय पै खोत, वासू मेंग गावकर, दयानंद सोपटे, राजेश पाटणेकर, दामू नाईक यांनी करावा. वर्ष २०१२ मध्ये ते आमदारपदी होते व सभागृहाच्या पटलावर मांडलेल्या अहवालात नमूद केलेला रॉय हा सध्या भाजपात प्रवेश केलेला रॉय आहे का हेही त्यांनी सांगावे.
कांदोळकर यांनी स्वत:च्या भावना व्यक्त करताना नमूद केले, की ‘‘माझा प्रेरणास्रोत असलेले भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर हे आज हयात नाहीत; पण, दुर्दैवाने अप्रत्यक्षपणे त्यांनाच खोटारडे ठरवण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे. पर्रीकर हे गोव्याच्या
राजकारणातील भाऊसाहेब बांदोडकरांनंतरचे महत्त्वपूर्ण नेते आहेत, असे गोमंतकीय जनमानसाची धारणा आहे. गोव्याची भाजपा पतनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, म्हणूनच मी हे सारे पोटतिडकीने बोलत आहे.
जेव्हा काँग्रेसच्या दहा आमदारांना भाजपात प्रवेश देण्यात आला, तेव्हा निदान मला तरी विश्वासात घेण्यात आले नव्हते. त्या वेळी दयानंद मांद्रेकर व इतर माजी आमदारांना विश्वासात घेण्यात आले होते की नाही, हे मला माहीत नाही. त्याबाबत तेच सांगू शकतात. आज भाजपा नेत्यांना चांगल्या गोष्टी शिकवण्याची वेळ पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे, असेही कांदोळकर म्हणाले.
अनिष्ट प्रवृत्तींना विरोध : कांदोळकर
काँग्रेसमध्ये असणारे सर्व चोर असे आमच्या मनावर भाजपा नेत्यांनी बिंबवले होते; पण, तेच काँग्रेसवाले आता भाजपात प्रवेश केल्यानंतर कसे काय पवित्र होतात, असा सवाल कांदोळकर यांनी केला. मी अजूनही भाजपातच आहे. वास्तविक, वडिलांनी मुलांना चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्याबाबत धडे देणे आवश्यक असते; पण, वडिलांसमान असलेले भाजपाचे नेतेच सध्या चुकीच्या मार्गाने जात आहेत. वडील चुकत असल्यास, वाकड्या दिशेने मार्गक्रमण करीत असल्यास कोणी तरी प्रश्न करणे भागच पडते व नेमके तेच मी सध्या करीत आहे. त्यामुळे, मी भाजपात असूनही केवळ पक्षातील अनिष्ट प्रवृत्तींबाबत विरोध करीत आहे.
EDITING _ SANJAY GHUGRETKAR
|