Ranmale Folk Art Goa : पश्चिम घाटाच्या गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या पर्वतरांगेला या परिसरातल्या लोकमानसाने सह्याद्री म्हटलेले असून, गोवा आणि शेजारच्या महाराष्ट्र-कर्नाटकातल्या सीमेवरच्या प्रदेशात शेकडो वर्षांपासून रणमाले लोकनाट्याची समृद्ध परंपरा आहे.
लोकपरंपरेवर तसेच धर्मविधींवर अधिष्ठित असलेल्या अव्यावसायिक, अव्यक्तिगत, सामूहिक नाट्याविष्कारात रणमालेचा समावेश होत असून, आजही त्याचे सादरीकरण गोमंत सह्याद्रीत केले जाते. पूर्वीचा उत्साह, या लोकनाट्याचे एकंदर स्वरूप यात बऱ्याच ठिकाणी कायापालट झालेला असला तरी आजही त्याच्या सादरीकरणातून त्याचा उगम आदिम यातुविधीत असल्याचे नाकारता येणार नाही. लोकसाहित्याच्या संशोधिका डॉ. तारा भवाळकर यांच्या मते यातूविधी निसर्गसंवादी जीवनसरणीतील आदिम अवस्थेत बहुधा सृष्टीतील घडामोडींशी संबंधित असत, अभावग्रस्त अशा ऋतूनंतर नवीन धान्य येण्याचा किंवा वृक्षलता फुलण्याचा, फळण्याचा काळ हा ‘सुफलन-विधी’ साजरे करण्याचा असतो. मनावरचे ताण संपलेले असल्याने समूहमनाला मुक्ततेचा व समाधानाचा अनुभव येत असतो. अशावेळी अशुभ अशा अभावग्रस्त मोसमाचा काळ संपला, जणू अनिष्टाचा नाश झाला आणि इष्ट असा सुगीचा, समृद्धीचा काळ आला, म्हणून निसर्गशक्तीविषयी आदर, कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करण्याच्या भावनेतून आदिम काळातील समाजाने केलेले सामूहिक यातुविधीय उत्सवरूप व नाट्यरूप पावले, असे जे प्रतिपादन लोकनाट्यासंदर्भात केलेले आहे ते रणमालेला लागू पडते.
गोव्यातील पानगळतीशी संबंधित असलेल्या शिशिराने निरोप घेतल्यावर इथल्या बऱ्याच वृक्षवेलींना नवी पालवी फुटू लागते. आम्रवृक्षावरती आम्रमंजिरी विलसू लागते. कोकम, ओटमसारख्या वृक्षांवरती फळे दिसू लागतात. काही दिवसांनी भारतीय कालगणनेतील नवीन वर्षाचे आगमन होणार असल्याची जणू काही वर्दी वृक्षवेलींवरच्या पालवीद्वारे मिळू लागते. त्यासाठी जुन्या वर्षाचा निरोप घेऊन नव्या वर्षाला उत्साहाने सामोरे जाण्यास आपल्या पूर्वजांनी उन्हाळा आनंददायी जावा या अभिलाषेपायी ‘सुगिम्ह’ म्हणजे शिगम्याच्या उत्सवाचे प्रयोजन करून त्यात रणमालेसारख्या लोकनाट्याच्या सादरीकरणाला महत्त्व दिले असावे.
सत्तरीतल्या उस्त्यापासून गांज्यापर्यंत नदीपात्रात चालणाऱ्या पुरणशेतीची कामे आटोपलेली असतात. काही कालावधीनंतर दाणेगोटे घरात येणार आहेत, आपण जे पेरले ते उगवले आणि कणसांनी त्यांच्या सौंदर्यात वृद्धी केलेली आहे याची जाणीव घराघरांत असल्याने ‘सुजलाम आणि सुफलाम’तेला प्रदान करण्यात निसर्गातली अदृश्य रूपात असलेली शक्ती कारणीभूत असल्याची भावना त्याकाळी लोकमानसात रूढ होती. त्याविषयी कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करावा म्हणून गीत, नृत्यप्रधान रणमाले लोकनाट्याचे सादरीकरण उचित मानले गेले. शिशिरातली पानगळती संपली आणि सुफलनाला प्राधान्य देणाऱ्या वसंत ऋतूचे मनःपूर्वक स्वागत करण्याची भावना सह्याद्रीतल्या लोकमानसात असली पाहिजे. ’कदंबकुल’ ग्रंथात इतिहासकार डॉ. जी. एम. मोराईश यांनी शिवचित्त पेरमाडीदेव या कदंब नृपतींनी पश्चिम घाटात वास्तव्य करणाऱ्या ’मालव’आदिवासी जमातीचे शिरकाण केल्यानंतर ’मालवहारी’ हे बिरुद धारण केले असल्याचे म्हटले आहे. सांग्यातल्या उगे गावातल्या सिद्धेश्वराच्या परिवार दैवतांत दिघी घाटाच्या पायथ्याशी जो हेमाडदेव आहे, तो शिवचित्त पेरमाडीदेव असल्याचा मतप्रवाह रूढ आहे. सत्तरी, धारबांदोडा, सांगे, महाराष्ट्राच्या दोडामार्ग, कर्नाटकाच्या खानापूर तालुक्यात तसेच परिसरात हेबार, हेमाड, मेशे यांना मांस, मद्यसेवनात गुंतवून त्यांची हत्या केली असल्याचे लोकमन मानत आहे. त्यावेळी त्यांच्या मनोरंजनास रणमाले लोकनाट्य सादर केले होते, असे सांगितले जाते.
’माले’ म्हणजे मातीच्या मोठ्या दिव्याच्या प्रकाशात हे ’रण’ म्हणजे युद्ध झाले. आपण त्यांना फसवून निघृणरित्या त्यांची हत्या केली, त्यांच्या मृतात्म्यांनी आपणाला उपद्रव करू नये, त्यांची अवकृपा होऊ नये अशा स्वाभाविक भावनेमुळे प्रारंभी यातुविधीशी निगडित असणाऱ्या या लोकनाट्याचा जन्म झाला असावा. यातू शक्तीची जागा कालांतराने गणपतीसारख्या लोकदैवताने घेतली असावी आणि त्यामुळे उत्तर कन्नडातील जोयडा तालुक्यात नवरात्रीच्या आश्विनाच्या नऊ दिवसांत, तर सत्तरीतील झर्मेत चोरोत्सवानंतर तर करंझोळ गावात चोरोत्सवापूर्वी सादर होणाऱ्या रणमालेतून पूर्वीच्या यातुविधीच्या परंपरांचे दर्शन घडते. रणमाले सादरीकरण करताना प्रारंभी केले जाणारे..
’पयले नमन करू गणिसा देवासी ।
दुसरे नमन करू गावच्या देवासी गा बा !
सरास्वती शारदा रंग्यालो माया ।
हे नमन आम्हाला यातुविधीतून विकसित झालेल्या लोकदैवतांच्या पूजनाची प्रचिती आणून देतात. गोमंत सह्याद्रीच्या गोवा-महाराष्ट्र-कर्नाटकातल्या बहुतांश सीमेवरच्या गावांत आज रणमाले लोकनाट्याची जी परंपरा रूढ आहे, त्यात इथे शेकडो वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या प्रामुख्याने जुन्या आणि नव्या मराठ्यांचा समावेश असून, त्यांचे जीवन कृषी व्यवसायाशी निगडीत आहे. जुन्या काळी ते डोंगर उतारावरची लहानसहान झाडे झुडपे कापून आणि जाळून नाचणी, वरी, कांगो, राळो यांच्या उत्पन्नासाठी कुमेरी शेती करायचे. आज कुमेरी शेतीच्या जागी भातशेती, बागायती व्यवसायांकडे हा समाज वळलेला आहे. रणमालेची परंपरा पूर्वीसारखी नसली तरी आज झर्मे, करंझोळसारख्या गावांत लोकधर्माचा अविभाज्य घटक म्हणून रणमालेचे सादरीकरण करतात. महाराष्ट्रातल्या दोडामार्गजवळच्या सासोली पुनर्वसन वसाहतीतल्या पाटयेत मालेचे सादरीकरण नाममात्र केले जाते. परंतु हे लोकनाट्य सादर करताना सातेरी केळबाय दैवतांचा कृपाशीर्वाद लाभावा ही भावना हाताच्या बोटावर शिल्लक राहिलेल्या लोककलाकारांत आहे.
आज लोकनाट्याची ही परंपरा पाटये, मांगेली आदी महाराष्ट्रातील गावांतून लोप पावण्याच्या वाटेवर आहे. महाकवी कालिदासांच्या नाटकात सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांतून उद्भवणारे आणि नाना रसांनी युक्त असे लोकव्यवहार दिसतात. नाटक हे विभिन्न आवडी असणाऱ्यांचे एकमेव मनोरंजनाचे साधन असल्याचे म्हटलेले आहे. त्याची प्रचिती रणमालेतून आल्याशिवाय राहत नाही. भरतमुनींनी आठ नाट्यरस मानलेले असून, शृंगार, हास्य, करुण. रौद्र, वीररस, भयानक बीभत्स आणि अद्भुत यांचा समावेश करण्यात आलेला आहे. रणमालेच्या सादरीकरणातून नाट्यरसिकांच्या मनात कार्यरूप रसनिष्पत्ती होत असते. गोव्यात रणमालेचे सादरीकरण शिगम्यात, गुढीपाडव्याला जेव्हा केले जाते, तेव्हा त्यास लोकधर्मातल्या संचितांचा आधार लाभलेला असतो. एखाद्या उत्सवात अथवा लग्नासारख्या समारोहातदेखील रणमाले सादर करताना त्यात गणपती, सरस्वती आणि अन्य स्थानिक लोकदैवतांच्या स्तवनाला अनन्यसाधारण स्थान लाभलेले असते. अशावेळी लोकनाट्याचे सादरीकरण ग्रामदैवतासमोरील माडाच्या चुडतांनी किंवा झाडाच्या फांद्यांनी शाकारणी केलेल्या पारंपरिक अंगणात, म्हणजेच ‘मांडा’वर केले जायचे. रात्रीच्या वेळी उजेडासाठी पेटलेल्या मशाली किंवा माल्याचा उपयोग केला जायचा. रणमालेच्या पूर्वरंगात आणि उत्तररंगात सादर केल्या जाणाऱ्या कथासूत्रांत वैविध्याचा प्रत्यय घेत असतो. (पूर्वार्ध)
-राजेंद्र केरकर
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.