Ranji Cricket: तमिळनाडूचा गोव्यावर सोपा विजय; सात विकेटने मारली बाजी

सलग तिसरा सामना जिंकला
Ranji Cricket Update
Ranji Cricket UpdateDainik Gomantak

Ranji Cricket Update

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात सोमवारी सकाळी तमिळनाडूने गोव्यावर सात विकेट राखून सोपा विजय नोंदविला. त्यांनी सलग तिसरा सामना जिंकत गटात अग्रस्थानही मिळविले.

तमिळनाडूने विजयासाठी १३७ धावांच्या आव्हानासमोर सोमवारी चौथ्या दिवशी ४९.५ षटकांत ३ बाद १४२ धावा केल्या. पाच सामन्यांतील तिसऱ्या विजयामुळे त्यांचे आता २१ गुण झाले असून तेवढेच गुण असलेल्या कर्नाटकविरुद्ध त्यांचा पुढील सामना ९ फेब्रुवारीपासून घरच्या मैदानावर खेळला जाईल.

पर्वरी मैदानावर गोव्याला सलग दुसरा, तर यंदा पाच सामन्यांतील तिसरा पराभव पत्करावा लागला. निराशाजनक कामगिरीमुळे फक्त चार गुणांसह ते सातव्या क्रमांकावर कायम राहिले. गोव्याचा पुढील सामना सूरत येथे रेल्वे संघाविरुद्ध (१२ गुण) ९ फेब्रुवारीपासून खेळला जाईल.

सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर नाबाद असलेल्या सुरेश लोकेश्वर व प्रदोष रंजन पॉल यांनी आपापली अर्धशतके नोंदवत तमिळनाडूचा विजय सोपा केला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली.

पहिला रणजी सामना खेळणाऱ्या लोकेश्वर याने १२९ चेंडूंत ६ चौकारांसह ५२ धावा केल्या. प्रदोष याने १२५ चेंडूंत ६ चौकारांसह ६५ धावा केल्या. प्रदोष सामन्याचा मानकरी ठरला. त्याने पहिल्या डावातही अर्धशतक (७१) केले होते, तसेच दुसऱ्या डावात गोव्याचे दोन प्रमुख फलंदाजही बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः २४१

तमिळनाडू, पहिला डाव ः २७३

गोवा, दुसरा डाव ः १६८

तमिळनाडू, दुसरा डाव (१ बाद ६१ वरून) ः ४९.५ षटकांत ३ बाद १४२ (सुरेश लोकेश्वर ५२, प्रदोष रंजन पॉल ६५, बाबा अपराजित नाबाद ७, विजय शंकर नाबाद १३, दर्शन मिसाळ २४-६-५१-२, अर्जुन तेंडुलकर २-०-५-०, मोहित रेडकर २०-२-५५-०, दीपराज गावकर १-०-१४-०, सुयश प्रभुदेसाई २.५-०-१६-१).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com