Mormugao Muncipal Council: मुरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मोठ्या नाटकी वातावरणानंतर रामचंद्र कामत यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध भाजप असा सत्ता संघर्ष निर्माण झाला होता. दाबोळीचे नगरसेवक विनोद किनळेकर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी केलेला अर्ज मागे घेतल्याने, अखेर कामत यांची बिनविरोध उपनगराध्यक्ष पदी निवड झाली.
मुरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवडीसाठी भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाल्याने, मुरगाव तालुक्याचे पालकमंत्री तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांच्या कार्यालयात दोन्हीही नगरसेवकामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या समवेत मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर उपस्थित होते.
मात्र 17 नगरसेवकांनी आपला पाठिंबा नगरसेवक रामचंद्र कामत यांना पुर्वीच जाहिर केल्याने, त्यांनी माघार घेतली नाही व आपला पाठिंबा कामत यांना जाहीर केला. यात माजी नगरविकास मंत्री मिलींद नाईक व वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या समर्थक नगरसेवका बरोबर तीन अपक्ष नगरसेवकाचा समावेश होता. यामुळे बायणा भागातील प्रभाग 07 चे नगरसेवक रामचंद्र कामत यांनी बाजी मारली.
कामत हे माजी मंत्री मिलींद नाईक यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांना उपनगराध्यक्षपदी आरूढ होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात होता, अशी माहिती काही उपस्थितीत नगरसेवका तर्फे देण्यात आली. वास्को येथील मुरगाव नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी सोमवार (दि.24) रोजी दोन अर्ज दाखल करण्यात आले. यात मुरगावातून भाजपचे नगरसेवक रामचंद्र कामत तर दाबोळीतून भाजपचे नगरसेवक विनोद किनळेकर यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज सादर केले. यामुळे उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक भाजप विरुद्ध भाजप अशी झाली.
मंगळवार (दि.25 रोजी सकाळी 11 वाजता मुरगाव तालुक्याचे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी भगवंत करमली व पालिकेचे मुख्याधिकारी जयंत तारी यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्षाची निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु सभासदाची किमान गणसंख्या नसल्याने, सभा अर्धा तास पुढे ढकलण्यात आली. नंतर दुसऱ्यांदा सभा 15 मिनिटे पुढे ढकलण्यात आली.
सभागृहात 20 नगरसेवकांसोबत वास्कोचे आमदार कृष्णा साळकर दाखल झाले. व त्याच्या उपस्थितीत नगरसेवक विनोद किनळेकर यांनी आपला उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतला. नंतर निवडणूक अधिकारी करमली यांनी रामचंद्र कामत याची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
दगरम्यान, माजी उपनगराध्यक्ष अमय चोपडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, सर्व प्रथम ' दै गोमन्तक ' मध्ये पुढील उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत होणार असल्याचे बातमी झळकली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.