'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध
पणजी: करंझाळे गार्डन, चिल्ड्रन्स पार्क येथे गुरुवारी (१८ सप्टेंबर) दुपारी सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर सुमारे सहा अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात काणकोणकर गंभीर जखमी झाले असून त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचा राजकीय नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी रामा काणकोण यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्लेखारांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. तर, हा हल्ला केवळ काणकोण यांच्यावर नसून सत्ताधाऱ्यांनी प्रश्न विचारण्याचे धाडस करणाऱ्या प्रत्येक गोमंतकीयावरचा हल्ला आहे. आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला न्याय हवा, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला रामराज्याचा दावा करणाऱ्या राज्यात ‘रामा’ही सुरक्षित नसल्याचे दाखवून देतो. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्राथर्ना करतो असे म्हणत या हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी मडगावचा आवाजचे युवा नेते प्रभव नाईक यांनी केली.
“काणकोणकरांवर भर दिवसा करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. गोव्याचे मिर्झापूरमध्ये रुपांतर झाले आहे”, अशी प्रतिक्रिया आप नेते अमित पालेकरांनी दिली.
दरम्यान, पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. शिवाय या घटनेचे फुटेज व्हायरल झाले आहे. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, काणकोणकर हे जेवण करून रस्ता ओलांडत असताना त्यांना अडवून प्रथम त्यांच्या तोंडावर शेण फेकण्यात आले.
त्यानंतर सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर सुरी आणि केबल घेऊन हल्ला केला. उपस्थित लोकांना देखील धमकावून जवळ येऊ दिले नाही. त्यानंतर हे आरोपी दुचाकीवरून पसार झाले. हल्लेखोरांकडे बंदूक होती, असा आरोप काणकोणकरांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.