Ram Mandir Inauguration : अयोध्या, कोणी हजार हजार किलोमीटर वरून रांगोळी काढत आले, तर कुणी स्केटिंग करत... कुणी भजन म्हणत आलेले, कोणी सायकलवर तर कोणी पायी! उरी एकच ध्यास - ‘पाहिन पुजिन टेकिन माथा रामा रघुनंदना’.
प्रभू रामाच्या अवध नगरीत पोहोचताच त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूद्वारे पाझरत होती प्रभू रामचंद्रांवरील अटळ श्रद्धा. अयोध्येत आज सकाळपासून हे वातावरण आहे. त्याला जोड आहे ती रामगीतांची.
अयोध्येत प्रवेश करत असतानाच एका आध्यात्मिक भूमीत प्रवेश करत असल्याचा अनुभव आला. काही शतकांच्या संघर्षानंतर अयोध्येत भाग्याचा दिवस उजाडत असल्याची सार्वत्रिक भावना आहे. फुले प्रितीची आनंदाच्या अश्रूंनी भिजली आहेत.
श्रीरामाच्या पूजेसाठी अयोध्या सजली आहे. रामलल्ला कधी एकदा मंदिरात विराजमान होतात, याची आस प्रत्येकाच्या डोळ्यांत दिसत आहे. ‘एकही नारा, एक ही नाम, जय श्रीराम’ अशा घोषणांनी अयोध्या राममय झाली आहे. सर्वत्र प्रचंड चैतन्य आणि उत्सवाचे वातावरण असून त्याला रामभक्तीची जोड आहे.
रामलल्ला गर्भगृहात विराजमान होण्याच्या अभूतपूर्व सोहळ्याचे आपण साक्षीदार होणार याचे मनस्वी समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ‘मन मे राम तन मे राम’ हाच भाव घेऊन हातात भगव्या पताका घेतलेल्या रामभक्तांची पावले अयोध्येकडे वळत आहेत.
अत्यंत उत्साहाने घोषणा देत जथ्थेच्या जथ्थे हनुमान गढी, दशरथ भवन, सीता की रसोई या ठिकाणी येत आहेत. प्रत्येक ठिकाणी जाऊन नतमस्तक होत आपल्या भावनांना वाट करून दिली जात आहे. ‘जय सियाराम.. जय जय श्रीराम..’ हा एकच मंत्रघोष आज दिवसभर अयोध्येत ऐकायला मिळत आहे.
सर्वत्र फुलांची सजावट
अयोध्येत कोणत्याही बाजूने प्रवेश करताना फुलांची आकर्षक सजावट केलेले रस्ते भाविकांचे स्वागत करतात. विजेच्या खांबांनाही सजावट केलेली आहे. श्रीरामाचे भव्य कटआऊट वातावरण निर्मितीत भर घालत आहे.
अयोध्येतील महत्त्वाच्या चौकांत आकर्षक चित्र शिल्प (म्युरल्स) लावण्यात आलेली आहेत. लता मंगेशकर चौक सर्व भाविकांचे खास आकर्षण केंद्र ठरत आहे. या ठिकाणाहून मुख्य मंदिराकडे आणि हनुमान गढीकडे जाण्याचा मार्ग असल्याने आलेला प्रत्येक जण या ठिकाणी नतमस्तक होत आहे.
अयोध्येत सर्वत्र कमालीची स्वच्छता पाळली जात आहे. ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या आहे. कागदाचा कपटा दिसता क्षणी कचरावेचकांकडून तो कचरा कुंडीत टाकला जातो. शहरातील गल्लींसह रस्त्यांसह मुख्य रस्त्यांची वारंवार स्वच्छता केली जात आहे.
अयोध्या नगर निगमच्यावतीने पूर्ण अयोध्या शहरात पहाटेपासून रामचरित मानस, हनुमान चालिसा अशी स्तोत्रे लाऊडस्पीकरवर लावली जात आहेत.
शरयू घाटावर स्नान
अयोध्येत काही दिवसांपासून प्रचंड थंडी पडत आहे. आज सकाळी तापमान सहा अंश सेल्सिअस होते. तरीही शरयू नदीत स्नान करण्यासाठी भाविकांची ओढ होती. ‘एक बार सरयू मैं डुबकी मार ली, तो सारी ठंड निकल जाती है...’ अशी सहज भावना व्यक्त होत आहे. शरयू घाटही स्वच्छ आहे.
राममय अयोध्या
दक्षिणेकडील राज्यांतूनही भाविक अयोध्येत
हैदराबाद येथून खास १३०० किलोचा लाडू प्रभू रामचंद्रांना अर्पण
शिराळा (जि. सांगली) येथील सुनील कुंभार आणि आकाश सुतार १८०० किलोमीटरचा प्रवास दुचाकीवर करत अयोध्येत दाखल. शिराळा ते अयोध्या या दरम्यान येणाऱ्या गावांत त्यांनी भव्य रांगोळ्या काढल्या. आज सकाळी अयोध्येत पोहोचताच लता मंगेशकर चौकात भव्य रांगोळी काढत प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष.
रामलल्लाला तिलक लावण्यासाठी काश्मीरहून स्वामी दिव्यानंद सरस्वती आणि रामशरण दास दाखल.
विविध मठांचे अधिपती आणि साधू दाखल. कांचीचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वतीही अयोध्येत.
चित्रकूट ते अयोध्या रामचरण यात्रा अयोध्येत दाखल. या यात्रेच्या निमित्ताने प्रभू श्रीरामंचंद्रांना सोन्याच्या १३ किलोच्या, तर चांदीच्या दहा किलोच्या पादुका अर्पण.
उत्तर प्रदेश सरकार सांस्कृतिक विभागाच्यावतीने लता मंगेशकर चौक ते हनुमान गढी या रस्त्यावर सांस्कृतिक नृत्य सादरीकरण.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.