New Governor Of Bihar: राजेंद्र आर्लेकर बिहारचे राज्यपाल

कोश्यारींसह १३ राज्यपाल, उपराज्यपालांची राष्ट्रपतींकडून बदली
Governor Of Bihar
Governor Of BiharDainik Gomantak

Governor Of Bihar: गोव्याचे सुपुत्र आणि हिमाचल प्रदेशचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची आता बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशातील 13 राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये गोव्यासह महाराष्ट्रातील वादग्रस्त राहिलेल्या भगतसिंग कोश्‍यारी यांचाही समावेश आहे.

मूळ वास्को येथील रहिवासी आणि पेडणे तालुक्याचे माजी आमदार, माजी मंत्री आणि माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांची आज बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याची घोषणा राष्ट्रपतींनी केली.

13 जुलै 2021 रोजी त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला होता. सुमारे 17 महिने ते या पदावर विराजमान होते. आता त्यांच्यावर बिहारसारख्या मोठ्या राज्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ‘केवळ राज्य बदलले आहे, जबाबदारी तीच आहे.

माननीय राष्ट्रपतींनी दिलेली जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडेन’, अशी प्रतिक्रिया महामहीम आर्लेकर यांनी व्यक्त केली.

राज्य छोटे व मोठे असे काही नसते. या पदाची जबाबदारी महत्त्वाची असून ती आपण निष्ठेने पार पाडू. यापूर्वी हिमाचल प्रदेशच्या लोकांची सेवा करता आली.

आता बिहारच्या लोकांची सेवा करेन. तिथे असलेल्या स्थानिक राजकारणाचा या पदावर कोणताच परिणाम असत नाही. राष्ट्रपतींनी टाकलेल्या जबाबदारीने मी आनंदी झालो आहे. या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढील आठवड्याच्या सुरवातीला बिहारच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारेन.

- राजेंद्र आर्लेकर, नवनियुक्त राज्यपाल, बिहार

वादग्रस्‍त कारकिर्दीला पूर्णविराम

मुंबई : महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात अनेकदा असंतोष धुमसला. थेट युवराज संभाजीराजे भोसले, उदयनराजे भोसले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

त्याचदरम्यान, काही दिवसांपूर्वी कोश्‍यारींनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

इतर राज्यपालही बदलले

राष्ट्रपतींनी इतर राज्यांतही काही बदल केले आहेत. ते असे, १) लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश. २) लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्‍कीम. ३) सीपी राधाकृष्णन, राज्यपाल, झारखंड. ४) शिवप्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश. ५) गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम. ६) निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश. ७) विश्वभूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगड. ८) अनुसुईया उईके, राज्यपाल, मणिपूर. ९) एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड. १०) फागू चौहान, राज्यपाल, मेघालय. ११) ब्रिगेडियर (निवृत्त) बीडी मिश्रा, लेफ्टनंट गव्हर्नर, लडाख.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com