

Curti Illegal Casino Raid: कुर्टी - खांडेपार पंचायत क्षेत्रातील बेतोडा रोडवरील सपना पार्कजवळ बेकायदा मिनी कॅसिनोवर फोंडा पोलिसांनी आज (बुधवारी) छापा टाकून संगणक, गेमिंग साहित्य तसेच रोख रक्कम मिळून 2 लाख 5 हजारांचा ऐवज जप्त केला.
हा कॅसिनो चालवणारा प्रवीण दिगंबर यादव (वय ३९ वर्षे) या मूळ पुणे पण सध्या सपना पार्क - बेतोडा येथील सलीम शेख याच्याकडे राहाणाऱ्या संशयिताला अटक केली आहे.
अचानक पडलेल्या छाप्यामुळे आणि ग्रामस्थांनी या जुगाराविरुद्ध उठवलेल्या आवाजामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली.
मात्र, पोलिसांनी हे प्रकरण यशस्वीरित्या हाताळले. पोलिसांना स्थानिक पंचसदस्य नीळकंठ नाईक व इतरांनी सहकार्य केले.
कुर्टी - खांडेपार पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक पाचमधील बेतोडा रोडवरील सपना पार्कजवळील इमारतीत मिनी कॅसिनो चालवला जात असल्याची कुणकूण येथील लोकांना लागल्यानंतर त्यांनी पंचसदस्य नीळकंठ नाईक यांना याची माहिती दिली.
त्यानंतर नाईक यांनी फोंडा पोलिसांत याची तक्रार दिल्यावर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी येऊन कॅसिनोवर छापा टाकला. पोलिस यायच्या अगोदरच दुकानाचे शटर बंद करून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवीण यादवला लोकांनी रोखून धरले. त्यामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला.
पोलिसांनी कॅसिनो चालवण्यासाठी लागणारे साहित्य, संगणक व रोख रक्कम जप्त केली. कॅसिनोचा मूळ मालक अन्य एकजण असून त्यांना दुकानाजवळ आणण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली. मात्र, भीतीमुळे मूळ मालक आलाच नाही. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे कारवाई!
कुर्टी - खांडेपारच्या प्रभाग क्रमांक पाचचे पंचसदस्य नीळकंठ नाईक व इतर ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा मिनी कॅसिनोचा जुगार उघडकीस आला. गेले दोन महिने हा मिनी कॅसिनो कार्यरत होता.
विशेष म्हणजे, या ठिकाणी विद्यार्थीही खेळायला येत होते, अशी माहिती मिळाली. कोणत्याही स्थितीत या प्रभागात कॅसिनो खेळ सुरू होता कामा नये, असे पंचसदस्य नीळकंठ नाईक यांनी सांगितले.
कॅसिनो आता गावागावांत...
राजधानी पणजीमध्ये मांडवी नदीत कॅसिनोचा खेळ चालतो, पण हे लोण आता ग्रामीण भागातही पोचल्याचे स्पष्ट झाले आहे. या मिनी कॅसिनोत जुगार खेळण्यासाठी विशिष्ट पद्धती तयार केली असून बोटीवरील कॅसिनोप्रमाणेच पैसे लावून हे खेळ खेळले जातात.
जिंकल्यास भरभक्कम रक्कम दिली जाते. हरल्यास खिसे रिकामे, असा प्रकार या मिनी कॅसिनोत चालतो, अशी माहिती एका जाणकाराने दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.