Quepem News : कुडचडे पालिका बाजार प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामामुळे यंदा पावसाळ्यात स्टेशन रोडवर पुराची स्थिती निर्माण होणार असल्याची भीती लोकांनी व्यक्त केली आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे व अशावेळी या प्रकल्पाच्या कामामुळे प्रकल्पासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाणी कुठे सोडणार? याविषयी पालिका गंभीर नसल्याचे दिसून येते.
कुडचडे पालिका बाजाराची इमारत बरीच जुनी झाली होती. लोकांच्या सुरक्षेसाठी सदर इमारत मोडून त्याठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येत असून गेल्या अनेक महिन्यांपासून या इमारतीचे काम रखडले होते. सदर प्रकल्पासाठी खोदकाम केले असून गुरुवारी रात्री अचानकपणे स्टेशन रोड प्रकल्पाच्या कामासाठी व्यावसायिकांना विश्वासात न घेता बंद केल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
आज सकाळी दुकानदार बाजारात आले असता त्यांना स्टेशन रस्ता बंद असल्याचे दिसून आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पाच्या चारही बाजूंनी दुकाने असल्याने प्रकल्पाचे काम करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने सांगितले. प्रकल्पासाठी लागणारे साहित्य ठेवण्यास जागा मिळत नसल्याने व हा प्रकल्प मुख्य बाजारात असल्याने रात्रीचे काम करावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने आज प्रकल्पासाठी खोदण्यात आलेल्या जागेवर काँक्रिट घालण्याच्या कामाला सुरवात केली असून काँक्रिट घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी व कामात व्यत्यय येऊ नये म्हणून हा रस्ता तात्पुरता आजच्या दिवसासाठी बंद केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारामुळे या प्रकल्पाच्या कामास बराच विलंब झाला असल्याचे कंत्राटदाराने सांगितले.
गटारांची साफसफाई रखडली
पालिकेने पावसाळीपूर्व कामे पूर्ण न केल्याने स्टेशन रोडवरील गटार मातीने बुजून गेले आहे. पालिका प्रकल्पात खड्ड्यात साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी पंपचा वापर करण्यात येणार असून ते पाणी गटारात सोडून देणार असल्याचे सांगितले जाते. या भागातील गटारांची साफसफाई न झाल्याने पावसाचे व खड्ड्यात साचणारे पाणी एकाबरोबर रस्त्यावर आल्यास हा भाग पाण्याखाली जाण्याची भीती लोकांनी व्यक्त केली.
नगरसेवकांनी लक्ष द्यावे
याविषयी नगराध्यक्षा जसमीन ब्रागांझा म्हणाल्या, की सर्व प्रभागांत पावसाळीपूर्व कामे सुरू आहेत. पालिका क्षेत्रात भूमिगत विजवाहिन्या व मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू असल्याने सदर कामामुळे गटार मातीने भरून गेले आहे. ज्या ठिकाणी जास्त त्रास होणार, तेथे नगरसेवकांनी जास्त लक्ष घालून पावसाळीपूर्व कामे करून घ्यावीत.
अयोग्य पद्धतीने काम सुरू
कुडचडेत होणाऱ्या विकासकामांना आपला विरोध नाही. पण ज्याप्रकारे हे काम सुरू आहे, त्याला आमचा विरोध असल्याचे नगरसेवक बाळकृष्ण होडरकर यांनी सांगितले. लोकांना त्रास करून विकास आम्हाला नको. जी कामे कुडचडे मतदारसंघात सुरू आहेत, त्याच्यावर देखरेख न ठेवल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, असे होडरकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.