पणजीत विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराची ही घटना म्हणजे समाजाच्या सांस्कृतिक ऱ्हासाचे प्रतिबिंब असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डाॅ. रूपेश पाटकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, या घटनेचा दोन तऱ्हेने विचार करायला हवा. शक्यता आहे की, संशयिताने असे कृत्य पूर्वी केले असेल. पीडित मुलीला बदनामीची भीती दाखवून त्याने स्वतःची सुटका करून घेतली असावी. पीडितेच्या असाहाय्यतेचा आणि भीतीचा उपयोग करून यापूर्वी तो बचावला असावा, म्हणूनच त्याने हा गुन्हा पुन्हा करण्याचे धारिष्ट्य दाखवले असेल. त्यामुळे पीडिता आणि तिच्या नातेवाईकांनी गुन्हा नोंदवण्याचे धैर्य दाखविले, ही योग्य गोष्ट केली आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे, त्या चालकाला एखादी मुलगी किंवा स्त्री ही उपभोगाची वस्तू वाटते. हे तो लहानपणापासून शिकला असावा. या घटनेतून मुलींबाबत, स्त्रियांबाबत मुलांमध्ये बालपणापासूनच आदर राखण्याचे संस्कार रुजवण्याची गरज आहे, हे सिद्ध होते.
तिसरा मुद्दा, प्रत्येकाने स्वतःची सुरक्षितता पाहिली पाहिजे. मद्यपान करून किंवा नशा करून स्वतःला संकटात झोकणे योग्य नव्हे. मुलांनी अथवा मुलींनीही पोरसवदा वयात व्यसनांना ठामपणे नकार देणे आवश्यक आहे, असेही पाटकर म्हणाले.
नाताळ पार्टीनिमित्त वास्कोहून पणजीत आलेल्या वास्कोतील एका विद्यार्थिनीवर मिनी बस चालकाने ती बसमध्ये एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना रविवारी (दि.25) संध्याकाळी पाटो - पणजी येथे पार्क केलेल्या मिनीबसमध्ये घडली. याप्रकरणी रात्री 11.41 वा. गुन्हा नोंद करून महिला पोलिसांनी बस चालक चंद्रशेखर वासू लमाणी (35) याला रात्रीच अटक केली आहे. या घटनेने खळबळ माजली असून पुन्हा राज्यातील प्रवासाबाबत असुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. संशयित सध्या झुआरीनगर बिर्ला वेर्णा येथील असून तो परप्रांतीय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाताळ असल्याने काल सकाळी काही विद्यार्थी व विद्यार्थिनींचा एक गट वास्को येथून पणजीत नाताळ सण साजरा करण्यासाठी आला होता. या गटाने भाडेपट्टीवर मिनी बस (जीए 06 टी 5376) ठरविली होती. पणजीत ही मिनी बस पार्क होम हॉटेलजवळ उभी करण्यात आली होती. मिनी बसमधून सर्वजण उतरून पार्टी करण्यासाठी गेले. गटासोबत ही पीडित विद्यार्थिनीही होती. पार्टीमध्ये बहुतेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मद्यप्राशन केले. पीडित विद्यार्थिनीला केलेल्या मद्यप्राशनामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने ती आराम करण्यासाठी दुपारच्यावेळी पार्किंगमध्ये उभ्या करून ठेवलेल्या मिनीबसमध्ये आली. बाकीचा गट हे पार्टीमध्ये होते. गाडीमध्ये तिच्याशिवाय कोणीही नव्हते.
काहीवेळाने बस चालक मिनीबसजवळ आला व त्याला एक विद्यार्थिनी बसमध्ये झोपेत असलेली दिसली. काल नाताळ असल्याने या पार्किंग परिसरात वाहनांची वर्दळ कमी होती व जादा वाहने पार्क केलेली नव्हती. त्याने विद्यार्थिनीची हालचाल नसल्याने त्याने तिचा गैरफायदा घेण्यासाठी गाडीमध्ये घुसला. तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केल्यावर या विद्यार्थिनीला जाग आली मात्र मद्याच्या नशेत असल्याने ती त्याला प्रतिकार करू शकली नाही. त्याचा फायदा उठवत या बस चालक नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यासंदर्भात कोणाला सांगशील तर तुझीच बदनामी होईल अशी धमकी दिली व तेथून तो निघून गेला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.