कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील लेडी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद देशातील अनेक राज्यात उमटताना दिसतायेत. काल (16 ऑगस्ट) गोव्यातही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि डॉक्टरांकडून कोलकाता येथील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली होती.
दरम्यान, डॉक्टर, परिचारिका यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी गोवा वैद्यकीय कायद्यात दुरुस्ती, जिल्हा कृती दलांची लवकरात लवकर स्थापना करण्यासह रुग्णालयांना सुरक्षित ठिकाणे म्हणून जाहीर करण्याची मागणी आज (17 ऑगस्ट) आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता आंदोलकांनी कोलकाता येथील महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन हत्या करणाऱ्या नराधमाला कडक शिक्षा देण्याचीही मागणी केली.
कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (17 ऑगस्ट) देशव्यापी संपात सहभागी होऊन गोव्यातील प्रायव्हेट डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवून राजधानी पणजीत मूक मोर्चा काढला. यावेळी त्यांच्या या संपात डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, 'आयएमए'च्या गोवा शाखेचे प्रमुख डॉ. संदेश चोडणकर, डॉ. शेखर साळकर यांच्यासह राज्यातील डॉक्टर आणि परिचारिकांनी आपली उपस्थिती नोंदवली.
तसेच, कोलकातामधील महिला डॉक्टरवरील (Doctor) अत्याचाराची घटना अतिशय निंदनीय आहे. या घटनेमुळे देशातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ डॉक्टर, परिचारिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत. त्याचबरोबर कोलकाता प्रकरणातील दोषींनी तात्काळ अटक करुन कठोर दंड देण्यात यावा असे डॉ. चोडणकर यावेळी म्हणाले.
चोडणकर पुढे म्हणाले की, 'गोव्यातील (Goa) वैद्यकीय कायदा केवळ नावालाच आहे. त्याची योग्यरित्या अंमलबजावणी होत नाहीये. सावंत सरकारने गोव्यातील या वैद्यकीय कायद्यात आता तात्काळ दुरुस्ती करुन डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल उचलावे.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.