पणजी : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृह हे नेहमीच वादग्रस्त ठरत आहे. कारागृहात प्रवेश करण्यासाठी तीन वेगवेगळ्या सुरक्षेच्या ठिकाणी तपासणी होऊनही कैद्यांकडे मोबाईल्स पोहचत आहेत. नुकतेच जेलर व तुरुंगरक्षकांनी रात्रीच्यावेळी कैद्यांच्या खोलीत धडक देऊन २५ पेक्षा अधिक मोबाईल जप्त केले. त्याची माहिती विचारली असता अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवलेत.
कारागृहाच्या सुरक्षेसाठी मनुष्यबळ विकास महामंडळाचे सुरक्षारक्षक, पोलिस शिपाई व कारागृहाचे तुरुंगरक्षक असे कर्मचारी तैनात आहेत. कैद्यांना न्यायालयातून सुनावणीहून परत कारागृहात आणताना त्यांची एका विशिष्ट खोलीत तपासणी केली जाते. तरीही या कैद्यांकडे मोबाईल्स पोहचत असून तुरुंगातून ते आपल्या गुन्हेगारी सहकारी तसेच आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधत आहेत.
मोबाईल्ससह कैद्यांना ड्रग्ज तसेच ओल्या पार्ट्यासाठी लागणारे मद्य हे सर्व पुरवण्यात येते. त्यामुळे कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेवरील नियंत्रण वरिष्ठांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. कारण कारागृहातील काही अधिकारी व तुरुंगरक्षक या कैद्यांना सामील असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नकळत हे प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.
‘तो’ अधिकारी पुरवितो मोबाईल
कारागृहातील एक अधिकारी कैद्यांशी सामील आहे. त्याने आपल्या मर्जीतील काही तुरुंगरक्षकांना मोबाईल नेण्याची ‘अर्थ’पूर्ण मुभा दिली आहे. मोबाईल पोहचविण्यात त्याचाच हात असल्याची माहिती कारागृहातील एका तुरुंगरक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भात कारागृहातील या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे घडतच नसल्याचे सांगून सुरक्षेची ठिकाणी त्याची कसून तपासणी केली जात असल्याचे सांगितले.
जप्त मोबाईल्स जातात कुठे?
दोन वर्षांत कोलवाळ कारागृहात अधिकृतपणे तीन ते चार वेळा वरिष्ठांनी कैद्यांच्या खोल्यांमधून 200 हून अधिक मोबाईल जप्त केले. तसेच अनधिकृतपणे दर आठवड्याला कैद्यांकडून मोबाईल जप्त करतात. मात्र, त्याची माहिती बाहेर येत नाही. त्या मोबाईल्सचे काय होते? मोबाईल धारकाचा शोधही घेतला जात नाही. शिवाय अधिक चौकशीसाठी ते पोलिसांनाही देत नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.