म्हापसा
राजकारण्यांनी पंचायत मंडळांवर दबाव आणणे अयोग्यच आहे. मतदारसंघातील पंचायतींवर सत्ता स्थापन करणे हे माझ्या रक्तातच नाही; त्यामुळे, आजपर्यंत तसे प्रयत्न मी कदापि केले नाहीत, असा दावा थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी केला.
या वक्तव्यातून त्यांनी माजी आमदार किरण कांदोळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टोला हाणला आहे. कांदोळकर यांनी थिवी मतदारसंघातील आठपैकी किमान सहा पंचायतींवर स्वससमर्थक गट सत्तास्थानी आणण्यात यश मिळवल्याच्या अनुषंगाने ते बोलत होते.
थिवी मतदारसंघातील विद्यमान राजकीय स्थितींसंदर्भात विचारले असता, श्री. हळर्णकर पुढे म्हणाले, की पंचायत सदस्यांना विकत घेऊन पंचायत मंडळे स्थापन करण्याचे उपद्व्याप मी कदापि केलेले नाहीत. मी प्रथमतः आमदारपदी निवडून आलो तेव्हा माझ्या समर्थनार्थ केवळ दोनच पंचायत मंडळे होती. तरीसुद्धा जनमताच्या शिदोरीवर मी निवडून आलो. थिवी मतदारसंघात सध्या आठ पंचायती आहेत. मागच्या निवडणुकीतदेखील माझ्या बाजूने केवळ दोनच पंचायत मंडळे होती. तरीसुद्धा जनतेच्या विश्वासाच्या बळावर मला विजयश्री प्राप्त झाली.
पंचायत सदस्यांवर मी मुद्दामहून कदापि दबाव आणत नाही. त्यांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. व्यवहारापेक्षा भावनेला मी अधिक महत्त्व देतो, असेही श्री. हळर्णकर म्हणाले. मी पंचसदस्यांचा आमदार नसून थिवीतील जनतेचा आमदार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मनीपॉवर आणि मसलपावरचा गैरवापर करून, पंचायतसदस्यांना हायजॅक करून आणि धमक्या देऊन पंचायत मंडळांवर सत्ता स्थापन करणाचा प्रयत्न करणाऱ्यांवर विश्वास ठेवण्याइतपत थिवी विधानसभा मतदारसंघातील जनता निश्चितच मूर्ख नाही, असाही दावा त्यांनी केला. अखेर जनमत सर्वाधिक महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
यासंदर्भात मी मतदारसंघातील कोणत्याची सरपंचाला अथवा अन्य पंचायतसदस्याला दोष देत नाही; कारण, ते नाइलाजाने परिस्थितीला शरण आलेले आहेत. भाजपाचे तसेच आमदार या नात्याने माझेही कार्य थिवी मतदारसंघात चांगल्यापैकी चाललेले आहे. माझे कार्यकर्ते व पक्षसंघटना यांचे पाठबळ लाभल्यामुळे मला आगामी निवडणुकीबाबत कोणतीही भीती वाटत नाही, असेही श्री. हळर्णकर यांनी स्पष्ट केले.
किरण कांदोळकर हे माजी आमदार आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे ते स्वतःचे राजकीय अस्तित्व राखण्याचा प्रयत्न करीत आहेत व त्यात गैर असे काहीच नाही. त्यांनी तसे अवश्य करावे; पण, कुणीच अनिष्ट मार्गांचा अवलंब करू नये, एवढेच माझे प्रांजळ मत आहे, असेही श्री. हळर्णकर यांनी सांगितले. goa goa
|