वास्को: पावसाळ्यापूर्वी मान्सूनपूर्व कामे पूर्ण करा, आणि साफसफाईला तातडीने सुरूवात करा,असे निर्देश वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी पालिका तसेच विविध संबंधित शासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांना दिले. रवींद्र भवन येथे बैठक घेऊन वास्कोतील मान्सूनपूर्व कामांचा आढावा आमदार साळकर यांनी घेतला.
या बैठकीत मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस देसाई, मामलेदार रघुनाथ देसाई, पालिका मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर, वीज खात्याचे संयुक्त अभियंते संजीव म्हाळसेकर, आरोग्य खात्याचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, वास्को अग्निशमन दल, पालिका अधिकारी व कामगार पर्यवेक्षक व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आमदार साळकर तसेच उपजिल्हाधिकारी यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून या बैठकीत विचारविनिमय केला. आमदार साळकर म्हणाले, की पालिका सोमवारपासून शहरातील मुख्य नाल्यांची साफसफाई चे काम सुरू करणार आहे. तसेच सध्या रेल्वे दुपदरीकरण विस्ताराचे काम चालू असून रेल्वेने मातीचा भराव टाकून काही नाल्यांची वाट बंद झाली आहे. त्यांनाही सदर वाट मोकळी करून देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच डोंगराळ भागातून येणाऱ्या पावसाचे पाणी सखल भागात डुंबत असल्याने त्याचा योग्यरीत्या निचरा होत नाही. या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांची मुख्य वाट व्यवस्थित उघडून देण्याचेही निर्देश देण्यात आल्याचे ते म्हणाले.
या वेळी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू, मलेरिया या रोगांवर उपाययोजना आखण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी विचारविनिमय झाला. आमदार साळकर यांनी या काळात लागणाऱ्या औषधांचा तुटवडा भासणार नाही, याकडे लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले. वीज अभियंता म्हाळसेकर यांनी पावसाळ्यात समस्या उद्भवू नये, यासाठी वीज खात्याचे कर्मचारी दक्षता घेत असून काम चालू असल्याचे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.