
पणजी: पावसाळीपूर्व कामे न केल्यास अनेक प्रकारची हानी व अडचणी निर्माण होऊ शकतात. ही कामे विशेषतः शेती, नागरी व्यवस्था, पाणी व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. बहुतेक पंचायती, पालिकांना त्याचे महत्त्व कळलेले नाही. त्याचमुळे पावसाळ्यात अनेक आपत्तींना सामोरे जावे लागते. पावसाळा समोर येऊन ठेपला आहे. राज्याचा आढावा घेतला असता पावसाळीपूर्व कामांत स्थानिक स्वराज्य संस्था काठावर पास झालेल्या आहेत.
फोंडा पालिका तसेच कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रातील नाले व गटार सफाई कामास प्रारंभ करण्यात आला असून फोंड्यातील बहुतांश कामे पूर्णत्वास आली आहेत. मान्सूनपूर्व विकासकामांना फोंडा पालिकेने अगोदरच सुरुवात केली होती, त्यामुळे ही कामे आता पूर्णत्वास येत आहेत.
फोंडा पालिका आणि कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रातील नाल्यात कचरा फेकण्याचे प्रकार वाढले असल्याने हे नाले कचऱ्याने भरले आहेत. दरवर्षी या नाल्यांची सफाई जलस्रोत खात्यातर्फे करण्यात येते. फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांच्याकडून या सफाईकामाचा पाठपुरावा केला जात असल्याने ही कामे पावसाळ्यापूर्वी सुरू केली जातात.
पेडणे तालुक्यात सर्वत्र मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. या सर्वात पेडणे वीज खाते आघाडीवर आहे. पेडणे वीज कार्यालयातर्फे सर्वत्र ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती तसेच वीजवाहिन्यांजवळ आलेली झाडेझुडपे कापून टाकली आहेत. पेडणे नगरपालिका क्षेत्रात एक आठवड्यापूर्वीच गटार उसपणे व साफसफाईला प्रारंभ केला आहे.
पेडणे नगरपालिका तसेच काही पंचायत क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर व अंतर्गत रस्त्यांवर काही जुनाट व जीर्ण झालेले वृक्ष आहेत. या अशा वृक्षांमुळे पावसाळ्यात मोठा धोका संभवतो. या अशा जुनाट वृक्षांची सर्व्हे सुरू असून लगेच हा अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करून त्यांची मान्यता मिळाल्यावर नंतर धोकादायक ठरलेले वृक्ष कापण्यात येतील, असे नगराध्यक्ष मनोज हरमलकर यांनी सांगितले.
या अगोदर मुख्य रस्त्यांच्या जवळची झाडेझुडपे छाटण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ता विभाग कार्यालय करायचे; पण गेल्या काही वर्षांपासून ही जबाबदारी नगरपालिका व त्या-त्या गावातील ग्रामपंचायतींकडे सोपवण्यात आली आहे. अशा ग्रामपंचायती फिफ्टीन पे योजनेद्वारा किंवा ग्रामपंचायत निधीतून करतात.
गेल्यावर्षी चतुर्थीच्या अगोदर रस्त्याच्या बाजूची झाडेझुडपे कापण्यात आली होती; पण यंदाचा पावसाळा बराच लांबणीवर पडला. यामुळे पेडणे तालुक्यात अनेक ठिकाणी झाडेझुडपे रस्त्यावर आलेली आहेत. त्यात काटेरी झाडेझुडपेही आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता विभाग आता हे काम पाहत नाही. ही जबाबदारी नगरपालिका व ग्रामपंचायतींकडे सोपवण्यात आली आहे; पण नगरपालिका व ग्रामपंचायती खर्चाची बाब असल्याने त्याकडे दुर्लक्ष करतात.
मुरगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. अनेक ठिकाणी गटार उपसण्याची कामे सुरुवात झाली आहे.
काही लोकांच्या कौलारू घरांच्या शाकारणीचे काम सुरू होते. तर मुरगाव पालिका प्रभागातील गटार उपसण्याची कामे झाली नसल्याने अवकाळी पावसावेळी रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरसेवकांचीही धावपळ होत आहे.
वास्को शहरी भागात गेल्या महिन्यापासून गटार साफसफाई करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत पालिकेने हाती घेतले आहे. ते काम अजून पूर्ण झालेले नाही. तसेच धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी सध्या सुरू आहे. मात्र, तो कचरा तसाच पडून असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे डासांची पैदास होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
वाळपई नगरपालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांचा वेग वाढला असून टप्याटप्याने कामे पूर्ण केली जात आहेत. त्यात एकूण ४ प्रभागांतील कामे पूर्ण झालेली असून उर्वरित प्रभागातील कामे अंतिम टप्प्यात आहेत.
वाळपई प्रभागाचा विस्तार होताना एकूण १० प्रभाग आहेत. त्यात पालिकेतर्फे दररोज कचऱ्याची उचल केली जाते. त्याचबरोबर पावसाच्या पार्श्वभूमीवर गटारांची साफसफाई, रस्त्याबाजूची झाडेझुडपे, कचरा गोळा करणे, इतर घाण काढणे आदी कामे सुरू आहे. त्याचबरोबर धोकादायक झाडेही आवश्यकतेनुसार छाटण्यात आलेली आहेत, अशी माहिती वाळपई नगराध्यक्ष प्रसन्ना गावस यांनी दिली.
प्रसन्ना गावस म्हणाल्या, पालिकेतर्फे घराघरांतून व हाॅटेल्स आदींचा कचरा रोज नेला जातो. मात्र, काही प्रभागांत पालिकेतर्फे साफसफाई केली असताना नागरिक जाणूनबुजून गटारात कचरा टाकतात. त्यामुळे अनेकवेळा पावसाळ्यात गटारात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते. आम्ही पालिकेतर्फे एप्रिल महिन्यापासूनच मान्सूनपूर्व कामे हाती घेतली होती व ती अजून सुरूच आहेत.
वाळपई भागात अनेक ठिकाणी भूमिगत वीजवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात रस्ते खोदलेले आहेत. पावसाळ्यापूर्वी संबंधितांनी काम पूर्ण करून रस्ता सुरळीत करावा. या खोदकामामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास खोदलेल्या खड्ड्यांत पाणी साचण्याचे प्रमाण वाढणार असून वाहतुकीस धोकादायक बनणार आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवसांत गोव्यात पावसाची शक्यता व्यक्त केल्याने मडगाव व फातोर्डात मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. मडगाव नगरपालिकेने मान्सूनपूर्व कामांची सुरुवात मार्च महिन्यातच केली होती.
मडगाव व फातोर्डात मिळून २५ प्रभाग आहेत. या सर्व प्रभागांमध्ये नाले व गटारे स्वच्छ करणे, लहान-मोठी झाडे कापणे हे काम सुरू करून ते संपल्यातच जमा आहे. प्रत्येक प्रभागांतील नगरसेवकाला या कामांसाठी प्रत्येकी सात ते आठ मजूर व एका आठवड्याची मुदत देण्यात आली होती. त्याप्रमाणे हे काम पूर्ण झाल्याचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी या प्रतिनिधीला सांगितले.
नावेली मतदारसंघात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते खणलेले आहेत. त्यामुळे गटारेही मातीने भरलेली आहेत. पादचारी तसेच वाहनचालकांना खासकरून दुचाकीस्वारांना त्याचा भयंकर त्रास सोसावा लागत आहे. गत दोन दिवसांत पाऊस पडल्याने खणलेल्या रस्त्यावरील माती खाली गेली आहे.
यासंदर्भात तक्रार करण्यास तसेच रस्ते व गटारे तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यासाठी नावेलीतील आम आदमी पक्षाचे नेते सिद्धेश भगत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वीज खात्याचे साहाय्यक अभियंता शरद नाईक यांची भेट घेतली व त्यांच्या कानावर आपल्या समस्या घातल्या.
काणकोण पालिका क्षेत्राबरोबरच सात पंचायतींत मान्सूनपूर्व कामे अद्याप अर्धवटच स्थितीत आहेत. काणकोण पालिकेत अकरा प्रभाग आहेत. पालिकेच्या कामगारांकरवी गटारे उपसण्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. पंचायत क्षेत्रात गटारे उपसण्याचे नाममात्र काम सुरू आहे. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या बैठकीत मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करण्यात येते, त्याप्रमाणे गटारे उपसण्याचे सुमारे बारा लाख रुपयांचे कंत्राट दिले जाते, अशी माहिती नगर्सेचे नगरसेवक हेमंत नाईक गावकर व मास्तीमळ वार्डाचे नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी दिली. पाळोळे किनाऱ्यावरील हायमास्ट दिवा गेले कित्येक महिने नादुरुस्त स्थितीत होता. मात्र, पावसाची चाहूल लागताच वीज खात्याने दोन दिवसांपूर्वी त्याची दुरुस्ती केली आहे. पालिका क्षेत्रातील काही भाग पावसाळ्यात पाण्याखाली जातात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे.
गावातून जाणाऱ्या रस्त्याशेजारी गटारे बांधून त्यावर लाद्या बसवण्यात आल्या आहेत. बऱ्याच भागातील गटारांची स्वच्छता न केली गेल्याने पावसाळ्यात पाणी रस्त्यावरून वाहण्याची शक्यता आहे. काही रस्त्याशेजारी स्टीलची संरक्षक कुंपणे बसवली गेल्याने रस्त्यावर गुरे येणार नाहीत. खाजोर्डा भाटात आदी भागातील रस्त्याशेजारच्या गटारातून दरवर्षीच्या पावसात डोंगरमाथ्यावरून वाहत येणारे पाणी थेट रस्त्यावरून वाहते. म्हणूनच सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याशेजारची गटारे बांधून घेतली आहेत. तसेच या गटारावर सिमेंटच्या लाद्या बसवून गटारांची तोंडे बंद केलेली आहेत. साळबार, कुडचाळ, कोपले, देऊळवाडा, तापशिरेपर्यंत जाणाऱ्या मोठ्या नद्यांची स्वच्छता करून घेतल्याने सिद्धनाथ पर्वतावरून वाहत येणाऱ्या पाण्याची यावर्षी चांगली विल्हेवाट लागणार आहे.
शहरात सुरू असलेली रस्ते, भूमिगत वीजवाहिन्या, पदपथ तसेच नालेसफाईची कामे पावसाळ्याच्या आधी पूर्ण करण्याचे आव्हान म्हापसा पालिका तसेच प्रशासनाससमोर आहे. शहरातील काही भागांत अद्याप खोदलेले रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झालेले नाही, तसेच गटारांची साफसफाई होणे बाकी आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी सांगितले की, मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण होतील. येत्या ३० मेपर्यंत सर्व नाल्यांची सफाई केली जाईल. सध्या बाजारपेठेत काम सुरू आहे. पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी सर्व क्षेत्रातील नाले व ड्रेनेज सफाईसाठी पालिकेने निविदा काढली होती. त्यानुसार ही कामे केली जात आहे. दरम्यान, गावसावाडा, आंगड या भागातील रस्ते अद्याप हॉटमिक्स करणे बाकी आहेत. नुकताच, उपसभापती तथा स्थानिक आमदारांनी शहरातील रस्त्यांचे हॉटमिक्सिंग करण्याच्या कामाचा नारळ वाढवून श्रीगणेशा केला होता. या कामासाठी ३१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.