Sunburn Festival: 'सनबर्न' जवळ आल्यावर आर्लेकरांचा विरोध का मावळला? दुटप्‍पी भूमिकेमुळे पेडणेवासीय नाराज

Pravin Arlekar About Sunburn: स्‍थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्‍या दुटप्‍पी भूमिकेमुळे पेडणेवासीयांत तीव्र चीड निर्माण झाली आहे.
Pravin Arlekar
Pravin Arlekar Dainik Gomantak
Published on
Updated on

Pravin Arlekar statement on sunburn Oppose

मोरजी: सरकारने कितीही बढाया मारल्‍या तरी ‘सनबर्न’मध्‍ये जाणारे ड्रग्‍सचा वापर करतात हे आता लपून राहिलेले नाही. नुकत्‍याच धारगळ येथे झालेल्‍या ‘सनबर्न’मध्‍ये सहभागी झालेल्‍या दिल्लीतील एका युवकाचा ड्रग्‍सच्‍या अतिसेवनाने मृत्‍यू झाला तर पाचजणांना ड्रग्‍स घेऊन नाचताना ताब्‍यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्‍यात आले.

साहजिकच हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महोत्सव वादग्रस्त ठरला आहे. दरम्‍यान, स्‍थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्‍या दुटप्‍पी भूमिकेमुळे पेडणेवासीयांत तीव्र चीड निर्माण झाली आहे. लोक रस्‍त्‍यावर उतरले नाहीत, म्‍हणून मीसुद्धा रस्‍त्‍यावर उतरलो नाही, असे थातूरमातूर कारण त्‍यांनी आता पुढे केले आहे.

धारगळ पंचायत क्षेत्रात ‘सनबर्न’चे आयोजन केल्याच्या बातम्या ज्या दिवशी विविध प्रसारमाध्यमांतून प्रसारित झाल्या, त्‍याच दिवशी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या महोत्‍सवास कडाडून विरोध केला. भाजप कार्यकर्ते, पंचायत मंडळे यांच्‍यासमवेत एक जाहीर सभा घेऊन शक्तिप्रदर्शनही घडविले. तर, त्याच दिवशी दुसऱ्या बाजूने धारगळ पंचायत मंडळाच्‍या सत्तारूढ गटाची बैठक होऊन ‘सनबर्न’ला पाठिंबा जाहीर करण्‍यात आला. त्‍यामुळे समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले.

Pravin Arlekar
Goa Sunburn: 'सनबर्न'च्या झळा! संगीत महोत्सवात चोरांची 'पार्टी', तब्बल १११ मोबाईल गहाळ

या सर्व प्रकारामुळे आमदार आर्लेकर संतप्‍त बनले. धारगळ पंचायत क्षेत्रात ‘सनबर्न’ कोणत्‍याही स्‍थितीत होऊ देणार नाही, अशी भीष्‍मप्रतिज्ञाच त्‍यांनी केली. प्रसंगी महोत्‍सव सुरू असताना आतमध्‍ये घुसून तो बंद पाडू, असा इशारा दिला. लोकांनीही त्‍यांना पाठिंबा दिला. पण जसाजसा हा महोत्सव जवळ येऊ लागला, तसातसा आर्लेकरांचा विरोध मावळू लागला.

नंतर ‘सनबर्न’ झालाही. कोणीही विरोध केला नाही किंवा कोणीही आत घुसले नाहीत. त्‍यामुळे आर्लेकरांची भीष्‍मप्रतिज्ञा फुकट गेलीच शिवाय त्‍यांनी मोठमोठ्या गमजा मारून निर्माण केलेले वादळ ‘पेल्‍यातील वादळ’ ठरले. पेडणेवासीय आता त्‍यांच्‍या क्षमतेवरच प्रश्‍‍नचिन्‍ह निर्माण करू लागले आहेत

‘सनबर्न’ला मी सुरवातीपासूनच विरोध दर्शविला. रस्त्यावर येऊन जाहीर सभा घेतली. अनेकांनी मला साथ दिली. परंतु प्रत्‍यक्षात महोत्‍सवादिवशी विरोध करायला कोणीही रस्‍त्‍यावर आले नाही. म्हणून मग मीसुद्धा घरातच बसलो. आता हा महोत्सव झालेला आहे. त्यामुळे त्‍यावर अधिक भाष्य करणे योग्‍य नव्हे.

-प्रवीण आर्लेकर, आमदार (पेडणे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com