पणजी: राज्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी वीजवाहिन्या बदलण्याची तसेच त्याची दुरुस्तीची कामेही वेळेत केली जात नाहीत. त्यामुळे अवकाळी पाऊस पडला की वीज खात्याला जाग येते. गेल्या काही दिवसांपासून ताळगाव व सांताक्रुझ भागात मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज नियंत्रण कक्षाला फोन केल्यास ते बंद असतात. त्यामुळे विजेच्या लपंडावामुळे लोकांना नाहक त्रास सहन करण्याची पाळी आली आहे.
(Power outages are common in Talgaon, Santa Cruz)
पावसाळा येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. मात्र वीज खात्याचे कामगार अजून वीज उपकरणांच्या दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार वीज खंडित करत आहेत. अनेकदा वीज खंडित होण्याची आगाऊ माहिती दिली जात नसल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
वीज खात्याच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास मॉन्सूनपूर्व कामे सुरू असल्याचे कारण सांगितले जाते. अनेकदा या विभागात तक्रार करण्यासाठी असलेले फोन बंद ठेवण्याचेही प्रकार रात्रीच्यावेळी सुरू असतात. वारंवार फोन करूनही फोन व्यस्त असल्याचा संदेश ऐकायला येतो.
गेल्यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वादळाचा फटका राज्याला बसून वीज खात्याचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते.
तेव्हा तत्कालीन वीजमंत्र्यांनी पुढील वर्षी राज्यात पावसाळ्यात वीजपुरवठा कमीत कमी खंडित होण्याकडे लक्ष दिले जाईल तसेच नादुरुस्त होणारे फिडर व जंपर बदलून त्या ठिकाणी नवी उपकरणे घालण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यावर्षी पुन्हा त्याच परिस्थितीला लोकांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
दिशाभूल : मॉन्सूनपूर्व कामे ही पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असते; मात्र वीज खात्याचे अधिकारी नियोजन करून काम करत नाहीत, अशा तक्रारी आहेत. वीजवाहिन्या जुन्या आहेत, वारंवार जंपर उडत आहेत, फिडर नादुरुस्त होत आहेत, अशी कारणे देऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे.
एकच वाहन : जर एखाद्यावेळी दोन-तीन ठिकाणी वीजवाहिनी नादुरुस्त झाली किंवा झाडे पडून वीजवाहिन्या तुटल्या तर त्याच्या दुरुस्तीसाठी अपुरा कर्मचारी वर्ग व एकच वाहन यामुळे वीजपुरवठा पुन्हा सुरू होईपर्यंत लोकांना मात्र रात्रीच्यावेळी अंधारात बसावे लागते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.