Tamnar Transmission Project: ‘तम्नार’ला कर्नाटक सरकारने विरोध केल्यास पर्यायी व्‍यवस्‍था करावी लागणार- वीजमंत्री सुदिन ढवळीकर

Power Minister Sudin Dhavalikar: तम्नार हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून वाढत्या विजेची मागणी लक्षात घेता तो गोव्यासाठी महत्त्‍वपूर्ण आहे. त्‍यासाठी साधनसुविधा उभारण्याचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करून प्रकल्‍प कार्यान्वित केला जाईल.
Power Minister Sudin Dhavalikar
Power Minister Sudin Dhavalikar Dainik Gomantak

Tamnar Transmission Project: तम्नार हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून वाढत्या विजेची मागणी लक्षात घेता तो गोव्यासाठी महत्त्‍वपूर्ण आहे. त्‍यासाठी साधनसुविधा उभारण्याचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करून प्रकल्‍प कार्यान्वित केला जाईल. परंतु म्हादई नदीच्या पाण्यावरून सतावणूक करणाऱ्या कर्नाटक सरकारने या प्रकल्पासाठी आडकाठी आणल्‍यास गोव्‍याला इतर पर्याय शोधावा लागेल. पश्‍चिम ग्रीडकडून १२०० मेगावॅट वीज मिळू शकते, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यात अधिक एरिएल बंच केबल्स हे वाळपई, पर्ये, वेळ्ळी, सावर्डे व सांगे या मतदारसंघात आहेत. आत्तापर्यंत या सुमारे ५० टक्के केबल्स काढण्यात आल्या आहेत. पर्ये, साखळी व सांगे भागात उच्चदाबाच्या भूमिगत वीजवाहिन्यांचे काम झालेले आहे. त्या लवकरच कार्यान्वित केल्या जातील. वीज खात्यात वाहनचालकांची नोकरभरती व नवी वाहने खरेदी करण्यास बंदी आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार खासगी वाहने भाडेपट्टीवर चालकासह घेण्यात येत आहेत. प्रत्येक उपवीज केंद्रांना जादा कर्मचारी वर्ग देण्यात आला आहे, असेही ढवळीकर म्‍हणाले.

तम्नार प्रकल्पाला काही लोकांकडून विरोध होत आहे. सध्याची जुनी वीजवाहिनी अनमोड भागातून फोंड्याकडे आली आहे. या मार्गाने तम्नार प्रकल्पाची वाहिनी आणल्यास पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार नाही. उलट गोव्याचा पश्‍चिम ग्रीड वीजपुरवठा अधिक मजबूत होईल. त्‍यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या सुटेल, असे ढवळीकर म्‍हणाले.

सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

कोलवाळ ते धारबांदोडा वीज उपकेंद्रापर्यंत ४०० केव्हीएचे सात टॉवर आहेत. या प्रकल्पातून १२०० मेगावॅट वीज मिळू शकते. सध्या कोल्हापूर ग्रीडमधून वीज आणली जाते. पुढील वर्षी ३०० ते ४०० मेगावॅट वीज लागू शकते. त्यामुळे तम्नार प्रकल्प झाल्यास गोव्याला फायदेशीर ठरणार आहे.

या पत्रकार परिषदेला मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस, अधीक्षक अभियंता प्रफुल्ल हेदे उपस्थित होते. वीज खंडित किंवा इतर काही तक्रारी ग्राहक संबंधित विभागातील कार्यकारी अभियंत्यांना त्यांच्या अधिकृत मोबाईलवरही एसएमएस करून नोंदवू शकतात, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.

Power Minister Sudin Dhavalikar
New Education Policy In Goa: गोव्यात चार वर्षात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार; यंदा नववीपासून तर पुढील वर्षी...

गेल्या दोन वर्षांत वीज खात्यात बदल झाला असून कारभार सुरळीत होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल. खात्याच्या सर्व विभागांना आवश्‍यक प्रमाणात पथदिवे, इन्सुलेटर्स उपकरणे पुरविली आहेत. उच्च दाबाच्या ३३ केव्ही व ११ केव्ही भूमिगत वाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यावर वीजप्रवाहातील चढउतार कमी होतील. वाहिन्यांवर लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली आहे. लाईनमन, लाईन हेल्पर यांना सुरक्षा किट दिले आहे. काम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याचे प्रशिक्षण त्यांना दिले आहे. वीज खांब किंवा ट्रान्स्फॉर्मरवर काम करताना वीजप्रवाह बंद आहे याची शहानिशा करणे, ही त्या कर्मचाऱ्याचीही जबाबदारी असते, असे मंत्री म्हणाले.

वीज खात्याने गेल्या दोन वर्षांत सुमारे ३,५०० कोटींच्या निविदा काढून कामे पूर्ण केली. प्रत्येक मतदारसंघात भूमिगत वीजवाहिन्या, वीज उपकेंद्रांचा दर्जा वाढविण्याबरोबरच ६० कोटींची कामे केली आहेत. अनेक भागातील उच्च व कमी दाबाच्या वीज वाहिन्यांची तपासणी केली जाईल. पावसाळ्यापूर्वी नवे पथदीप कार्यान्वित होतील. औद्योगिक वसाहतींनाही पत्र पाठवून तेथील पथदिव्यांचे काम खात्याने हाती घेतले आहे.

Power Minister Sudin Dhavalikar
Goa News: राज्यातील अनेक भागांमध्‍ये बत्तीगुल, उकाड्यामुळे लोक हैराण; पर्वरी, केपे, पणजीत खेळखंडोबा

वीज गळतीचा हिशेबच लागेना

काही भागांत वीजप्रवाहात चढउतार, हा वीज चोरी तसेच आपत्कालीन घटनांमुळे होतो. सुमारे १२ टक्के विजेचा हिशेब मिळत नाही. १९६५ पासून अनेक भागांतील ट्रान्स्फॉर्मर बदलले नव्हते, ते बदलले आहेत. अनेक ठिकाणी वीज समस्या आहे. याला काही प्रमाणात वीज खाते जबाबदार आहे. पण ग्राहकही तितकेच जबाबदार आहेत. वीज कनेक्शन घेतलेल्या क्षमतेपेक्षा जादा वापर होत असल्याने ट्रान्स्फॉर्मरवर लोड येऊन वीज खंडित होते, असे ढवळीकर यांनी सांगितले.

वीज खात्याच्या कॉल सेंटरवर ‘नजर’

वीज खात्यातील कॉल सेंटरमध्ये अनेकदा तक्रारीचे कॉल्स घेतले जात नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. या सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येईल. त्यामुळे या तक्रारी कमी होतील, तसेच कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. हे सेंटर २४ तास सुरू असते. तक्रारीचे कॉल घेण्यासाठी १० कर्मचारी असतात. पावसाळ्यात आणखी ५ कर्मचारी वाढविण्यात येतील, असे ढवळीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com