पणजी: उत्तर प्रदेशातील निवडणुकीनिमित्त सुरक्षेसाठी तैनात आलेल्या गोवा आयआरबीच्या 413 पोलिसांना टपाल मतदान करण्यास गोव्यात आणण्यासाठी कदंब महामंडळाच्या सर्वसाधारण 10 बसेस रवाना झाल्या आहेत. त्यांच्या बदली या बसेसमधून सुमारे 350 आयआरबी तसेच गोवा पोलिसांना तेथे पाठवण्यात आले आहे. नियोजनशून्य पोलिस व्यवस्थापनाचा फटका मात्र पोलिसांची परवड होण्यास कारणीभूत ठरला आहे. (postal vote is becoming a problem for the police)
टपाल मतदानासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) अगोदरच सर्व सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार व्यवस्था करा असे सांगितले होते. पोलिस खात्यातील आयआरबी पोलिस इतर राज्यांतील निवडणुकीच्या (Assembly Election) सुरक्षेसाठी पाठवावे लागणार हे माहीत असूनही त्याची गंभीर दखल घेण्यात आली नाही. मतदानानंतर या पोलिसांच्या घरच्या पत्त्यावर टपाल मतपत्रिका पाठविल्या गेल्याने अनेकांना त्या वेळेवर मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना मतदान करण्यापूर्वीच उत्तर प्रदेशला जावे लागले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा या पोलिसांना भोवला आहे. उत्तरप्रदेशला जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या पोलिसांना 1800 किलोमीटरचा प्रवास सर्वसाधारण बसने करण्याची वेळ आली आहे. गेल्या 14 फेब्रुवारीला मतदानाच्या दिवशी गोव्यातून (Goa) आयआरबीचे सुमारे 950 पोलिस उत्तर प्रदेशला पाठवण्यात आले होते. त्यातील सुमारे अर्ध्याहून अनेकांनी टपाल मतदान केलेच नाही. त्यांची टपाल मतपत्रिका त्यांच्या पत्त्यावर पाठविली गेल्याने त्यांना मतदानापासून वंचित होण्याची वेळ येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली होती.
3 मार्चला युपीला पोचणार पोलिस पथक
पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता कदंबच्या दहा बसेसने 400 पेक्षा अधिक पोलिस उत्तर प्रदेशला रवाना झाले. त्यांच्यासोबत एक उपअधीक्षक पाठवण्यात आला आहे. हे पोलिस पथक 3 मार्च रोजी दुपारपर्यंत उत्तर प्रदेशला पोहोचणार आहे. त्यानंतर याच बसेसने तेथे असलेले 413 आयआरबी पोलिस 3 मार्चला गोव्याकडे यायला निघतील व ते 6 मार्चला पोहोचतील. टपाल मतदानाची मुदत 10 मार्च सकाळी 7 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे टपाल मतदानास त्यांना पुरेसा वेळ मिळेल.
तब्बल 40 तासांचा प्रवास; तीव्र नाराजी
उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) असलेल्या काही आयआरबी पोलिसांनी बसने प्रवास करण्यास नाराजी दर्शविली आहे. प्रवास सुमारे 40 तासांहून अधिक असल्याने बसमध्ये खूप त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. दिवसा उष्म्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. ज्या बसेस पाठविण्यात आल्या आहेत, त्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपयोगी नाहीत. पोलिसांच्या जीवाशी हा खेळ मांडला जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या एका आयआरबी पोलिसाने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.