
पणजी: गिरी ते पर्वरीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामावेळी गिरीच्या बाजूने सेगमेंट टाकण्याचे काम सुरू असताना अचानक क्रेनच्या हुकला असलेले लोखंडी व्हील तुटल्याने सेगमेंट जमिनीवर कोसळला. पडल्यावर या सेगमेंटचे तुकडे झाले. यात चारजण जखमी झाले असून एकावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.
सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. कामाच्या ठिकाणी उपस्थित असलेले कामगार सुरक्षित राहिले. मात्र, आजूबाजूच्या परिसरातील चौघेजण जखमी झाले.
या ठिकाणी एकूण तीन खांबांवर सेगमेंट आधीच बसविण्यात आले आहेत. तिसऱ्या ते चौथ्या खांबांच्या मध्ये आजचा सेगमेंट ठेवला जात असताना ही दुर्घटना घडली. हा कोसळलेला सेगमेंट रात्री हलविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ही दुर्घटना केवळ तांत्रिक कारणामुळे झाली की अजून काही कारणे आहेत, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.
या दुर्घटनेविषयी पर्यटन मंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ही दुर्घटना कशी घडली आणि नेमके काय झाले याची माहिती घेण्यासाठी सोमवारी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. सुरक्षेसंदर्भात देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले.
सेगमेंट चढवत असताना अचानक हुक तुटल्याने हूकचे काही भाग जवळील परिसरात उसळले. एक तुकडा गॅरेजकडे उसळला. येथे दुचाकी दुरुस्त करायला आलेल्या एका व्यक्तीच्या पायाला दुखापत झाली. त्यांना रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी इस्पितळात नेले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्या गॅरेजमध्ये तुकडा उसळला, ते गॅरेज सेगमेंटकडून ५० मीटर अंतरावर आहे. गॅरेज आणि सेगमेंट यांच्यामध्ये महामार्ग देखील आहे. या दुर्घटनेत एकूण चारजण जखमी झाल्याची माहिती मिळाली.
या दुर्घटनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दुर्घटनेवेळी घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित असलेला या प्रकल्पाचा उपाध्यक्ष राजदीप भट्टाचार्य याच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधला असता , त्याने फोन उचलला नाही. उपाध्यक्षाच्या या बेपर्वा वृत्तीबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यातील या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ज्युड कार्व्हालो यांनी सांगितले की, या दुर्घटनेविषयीची अधिकृत माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सोमवारी देणार आहेत. या दुर्घटनेत कुठलीही हानी झालेली नाही. काहींना किरकोळ जखमा झाल्या असल्या, तरी गंभीर परिणाम होईल, असे काहीच झाले नाही.
ज्या मार्गावर वाहतूक सुरूच असते, तेथे दिवसा सेगमेंट चढविणे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया राज्यभर उमटू लागल्या आहेत. आजच्या दुर्घटनेत मोठे नुकसान होऊ शकले असते; परंतु सुदैवाने मोठा अपघात टळला. हे काम जर रात्री झाले असते तर चार लोक जखमी झाले नसते. जखमी झालेल्यांमध्ये कामगार नसून आजूबाजूला आलेल्या व्यक्ती होत्या, अशी माहिती घटनास्थळी देण्यात आली.
या दुर्घटनेवेळी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होती. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सेगमेंटजवळून दोन्ही बाजूने सुमारे ७०० मीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही सुरू केली; परंतु वाहनांची संख्या बरीच असल्याने तासभर वाहतूक ठप्प होती.
या प्रकल्पाची जबाबदारी असलेले साबांखाचे कार्यकारी अभियंता ज्यूड कार्व्हालो यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीच्या वाहतूक पोलिस निरीक्षकाला उड्डाणपुलाच्या कामाविषयी प्रत्येक गोष्ट माहिती होती. त्यामुळे वाहतूक नियंत्रण देखील होत होते. मात्र, आता नवीन वाहतूक पोलिस निरीक्षक बदली होऊन आल्याने त्यांना याविषयी माहिती नाही. आम्ही सेगमेंटचे काम करताना वाहतूक वळविण्याचा प्रस्ताव दिला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.