
Ponda Municipal Council Meeting
फोंडा: पालिकेच्या आज झालेल्या बैठकीत विविध विषयांवर खडाजंगी झाली. विशेषतः विशाल मेगा मार्टमुळे उद्भवलेली पार्किंग समस्या, पदपथ अडवून सुरू असलेला व्यवसाय, मार्केटमधील विक्रेत्यांकडून सोपो कराची थकबाकी तसेच पालिका अभियंत्याच्या दोन नावांवरून उडालेला गोंधळ आदी विषयांवरून जोरदार चर्चा झाली.
या बैठकीला स्थानिक आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक उपस्थित होते. अनेक विषयांवर जोरदार चर्चा झाली,
नगराध्यक्ष आनंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या बैठकीला उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते. आनंद नाईक यांनी सर्वांचे स्वागत करून बैठकीला सुरवात केली.
फोंडा पालिका हद्दीतील पदपथांवर बसून माल विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर आता थेट कारवाई करण्यात येईल, असे नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी सांगितले.
फोंडा पालिकेने थकीत भाडे वसूल करताना विक्रमी २ कोटी ३३ लाख रुपये आतापर्यंत वसूल केले आहेत. ही वसुली सुरूच राहणार असल्याचेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
पालिका अभियंता विशांत नाईक यांची दोन नावे असून आधारकार्डमध्ये भलतेच नाव असल्याने हा विषय बैठकीत निघाला असता यासंबंधी पूर्ण चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.
फोंडा पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीसंबंधीही विषय चर्चेला आला असता अशा धोकादायक इमारती संबंधित मालकाने पाडाव्या. त्यासाठी पालिकेकडून नोटिसा जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही कंत्राटदार निविदा भरून कामे घेतात, पण वर्ष दीड वर्ष झाले तरी काम करीत नाहीत, त्यामुळे अशा कंत्राटदारांना ब्लॅक लिस्टमध्ये घालण्याचा निर्णय यावेळी झाला. इतर अनेक विषयांवरही सांगोपांग चर्चा झाली.
फोंड्यात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इमारतीत ज्या ठिकाणी पार्किंगची सोय नाही, तेथे विशाल मेगा मार्ट सुरू करण्यासाठी पालिकेने परवानगी दिल्यामुळे हा विषय बराच तापला. नगरसेवक रूपक देसाई यांनी हा विषय लावून धरला. विशाल मेगा मार्टला परवानगी देताना पालिका मुख्याधिकाऱ्यांनी पार्किंगची सोय पाहिली नाही काय, असा सवाल रूपक देसाई, नगरसेवक व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक आणि इतरांनी उपस्थित केला. त्यावर व्यंकटेश नाईक, रितेश नाईक व इतरांची एक समिती स्थापन करून या विषयावरील सविस्तर अहवाल पालिकेला द्यावा आणि त्यानंतर कारवाई करावी, असे ठरवण्यात आले.
फोंडा पालिकेच्या बाजारात मालाची विक्री करणाऱ्या ९७ विक्रेत्यांकडून सोपो कर थकला आहे. या विक्रेत्यांनी कर भरलेला नाही. पालिका वीज, पाण्याची व्यवस्था करते मात्र विक्रेते कर भरत नसल्याने त्यांना यासंबंधीची नोटीस पाठवण्यात आली आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ही थकबाकी भरली नाही तर थेट कारवाई करण्यात येईल, असा पालिकेने निर्णय घेतला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.