फोंडा: गेली तेरा वर्षे रेंगाळत पडलेला फोंडा नगरपालिकेचा सुवर्णमहोत्सवी प्रकल्प येत्या सहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याची ग्वाही फोंड्याचे नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी दिली आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून हा वेळेचे बंधन कंत्राटदाराला घालण्यात आले आहे.
आनंद नाईक यांनी सांगितले की, तत्कालीन गृहमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते १९ डिसेंबर २०११ रोजी या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. ते वर्ष गोवा मुक्तिदिनाचे पन्नासावे वर्ष असल्यामुळे राज्य सरकारने प्रकल्प उभारण्यासाठी राज्यातील प्रत्येक पालिकेला निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळेच या प्रकल्पाला ‘सुवर्णमहोत्सवी प्रकल्प’ असे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले. रवी नाईक यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यावेळी व्यक्त होत होती. मात्र २०१२ साली झालेल्या निवडणुकीत रवींचा पराभव झाल्यामुळे हा प्रकल्प रेंगाळत पडला.
नंतर दोन नगरपालिका मंडळे येऊनसुद्धा या प्रकल्पाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी आलेला निधी पालिकेला वापरता आला नाही. मात्र नगराध्यक्षपदी असताना रितेश रवी नाईक यांनी शून्यापासून सुरूवात करून प्रकल्पाबद्दल सकारात्मक पावले उचलली. आता त्यांचे उत्तराधिकारी आनंद नाईक प्रयत्नशील आहेत.
सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास तो फोंडा शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा बनू शकतो. तसे पाहायला गेल्यास हा शहरातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गणला जात असून शहराच्या मध्यवर्ती असल्यामुळे त्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. जर नगराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रकल्प सहा महिन्यांत पूर्ण झाल्यास फोंडावासीयांचे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होईल हे निश्चित.
सुवर्णमहोत्सवी प्रकल्प हा फोंडा शहरातील अद्ययावत प्रकल्प ठरणार आहे. त्याला काय नाव द्यायचे हे नंतर ठरविले जाईल. सध्या कृषिमंत्री असलेले रवी नाईक यांनीच हा प्रकल्प सुरू केल्यामुळे आता त्यांच्याच अखत्यारीत तो मार्गी लागला तर त्यांचे प्रयत्न फळास आले असे म्हणता येईल.
आनंद नाईक, नगराध्यक्ष (फोंडा)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.