मिलिंद म्हाडगुत
पंडितवाडा हा फोंडा शहराचा कणा समजला जातो. विठोबा देवस्थानाच्या उजव्या बाजूपासून जाणाऱ्या रस्त्यावरून फोंडा पालिकेचा प्रभाग क्र. ११ सुरू होतो. पंडितवाडा हा या प्रभागाचा मुख्य भाग. केशव देवालय, नक्टेश्वर देवस्थान ही या प्रभागाची प्रमुख केंद्रे.
अतिशय गजबजलेला असा हा भाग. या प्रभागाची सीमा कुर्टी-खांडेपार पंचायतीला मिळत असते. ही पंचायत व हा प्रभाग एवढा एकमेकांशी जुळला आहे की नगरपालिकेची सीमा व पंचायतीची हद्द ही दोन्ही एकामेकांत बेमालूम मिसळल्यासारखी वाटत आहे.
एक वर्षात चेहरा बदलला
नगराध्यक्ष रितेश रवी नाईक हे या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक. गेले एक वर्ष ते नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षांत या प्रभागाचा बहुतेक विकास हा रितेश नगराध्यक्ष झाल्यावरच झाला आहे. या प्रभागाचा फेरफटका मारल्यास हीच स्थिती अधोरेखित व्हायला लागते.
पंडित वाड्यावरून वारखंडेकडे जाताना लागणारा अरुंद रस्ताही नजरेत भरतो. एकंदरीत ‘रात्र थोडी सोंगे फार’ या उक्तीप्रमाणे मर्यादित क्षेत्रफळ; पण आस्थापने, सदनिका व उलाढाल जास्त असेच या प्रभागाचे स्वरूप दिसते.
महत्त्वाची कामे मार्गी : नगराध्यक्ष नाईक
बाजारात विक्रेत्यांना बसण्याकरता 75 लाख रुपये खर्चून ‘शेड’ उभारणे, गटार बांधणे, रस्ते हॉटमिक्स करणे, नवे पेव्हर्स घालणे, विजेचे खांबे घालणे, पावसात काही भागात रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचा निचरा करणे इत्यादी विकासकामे केली. अजूनही २५ ते ३० लाखांची कामे कार्यान्वित आहेत. पण सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे बाजारातला गेली दहा वर्षे रखडलेला ट्रान्सफॉर्मर सुरू केल्याची माहिती नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी दिली.
काही रस्ते अतिशय अरुंद
हायवेला जाण्याकरता या प्रभागाचा वापर केला जातो. त्यामुळे इथे नेहमीच वर्दळ दिसते . हा प्रभाग तसा प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्यामुळे या प्रभागातील काही रस्ते अतिशय अरुंद बनले आहेत.
एकीकडे आस्थापनांची व सदनिकांची संख्याही वाढताना दिसत आहे. बंगल्यापेक्षा जुनी घरे इथे जास्त प्रमाणात असल्यामुळे फोंड्याच्या त्या ‘जुन्या जमान्याची’ हा प्रभाग आठवण करून देतो. फोंडा बाजाराशी संलग्न असल्यामुळे या प्रभागातील आर्थिक उलाढाल वाढताना दिसत आहे.
बिगर गोमंतकीयांची संख्या लक्षणीय
मागच्या वेळी या प्रभागात बाजारातला काही भाग जोडला गेला होता. बाजाराचा पुढील भाग हा या प्रभागाचा प्रमुख हिस्सा बनला होता. त्यामुळे या प्रभागाला आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. पण आता नव्या पुनर्रचनेत बाजाराचा हिस्सा वगळण्यात आला असून सेंट मेरीच्या परिसरातला काही भाग या प्रभागाला जोडण्यात आला आहे.
बाजारापासून दूर गेल्यामुळे या प्रभागाला आता मर्यादित स्वरूप प्राप्त झाले असून मतदार जास्त व कक्षा कमी अशी या प्रभागाची स्थिती झाली आहे. सध्या या प्रभागात १,२२४ मतदार असून बिगर गोमंतकीयांचीही लक्षणीय संख्या इथे दिसते आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.