

फोंडा: फोंडा परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या गॅस काढून त्याची चोरी करणाऱ्या एका टोळीचा फोंडा पोलिसांनी पर्दाफाश केला. बेतोडा बायपास रोडवर भररस्त्यात कोणत्याही सुरक्षेची काळजी न घेता सुरु असलेला हा जीवघेणा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 12:10 च्या सुमारास बेतोडा बायपास रोडवरील बोनबाग येथील पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या जागेत संशयास्पद हालचाली सुरु होत्या. फोंडा पोलीस स्थानकाचे हवालदार देवराज नाईक (वय 47) आणि त्यांच्या पथकाला गस्त घालत असताना एक एलपीजी गॅस सिलेंडर वाहून नेणारी गाडी (क्रमांक GA-05-T/7163) उभी असलेली दिसली. पोलिसांनी (Police) जवळ जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी दोन व्यक्ती भरलेल्या गॅस सिलेंडरमधून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले. कोणत्याही सुरक्षेविना आणि सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेला हा प्रकार अत्यंत धोकादायक होता. यामुळे मोठी आग लागून जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती.
याप्रकरणी पोलिसांनी अनिल बिश्नोई आणि शिशपाल बिश्नोई या दोघांना ताब्यात घेतले. हे दोन्ही आरोपी सध्या शांतीनगर, फोंडा येथे वास्तव्यास आहेत. हे दोघेही एलपीजी सिलेंडर वितरण करणाऱ्या गाडीवर काम करतात. ग्राहकांना मिळणाऱ्या सिलेंडरमधून गॅस काढून त्याची चोरी करणे आणि कमी वजनाचे सिलेंडर ग्राहकांच्या माथी मारणे, असा यांचा उद्देश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
हवालदार देवराज नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फोंडा पोलिसांनी 4 जानेवारी रोजी पहाटे 2:00 वाजता गुन्हा नोंदवला आहे. आरोपींविरुद्ध 'भारतीय न्याय संहिता 2023' (BNS) च्या कलम 125 (मानवी जीव धोक्यात घालणे), 303(2) (चोरी) आणि 3(5) (समान हेतूने केलेले कृत्य) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरीकडे मात्र, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे गॅसची चोरी करणे हा केवळ गुन्हास नसून तो सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ आहे. गॅस ट्रान्सफर करताना थोडी जरी ठिणगी उडाली असती, तर बेतोडा बायपासवर मोठा स्फोट होऊन जीवितहानी झाली असती. फोंडा (Ponda) पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे हा मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे गॅस एजन्सींच्या कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवण्याची गरज पुन्हा एकदा व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.