Ponda News : फोंड्यात विधानसभेचे प्रतिबिंब पालिकेत; भाजपच्या नगरसेवकांत गटबाजी?

‘Ponda News : गेल्यावेळी रवींमुळे त्यावेळी भाजपची उमेदवारी हुकलेले भाजपचे फोंड्याचे गटाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी हे सध्या आक्रमक झाले असून ‘अभी नही तो कभी नही’ हे धोरण बाळगून त्याप्रमाणे निवडणुकीत उतरण्याकरता त्यांनी पावले उचलायला सुरवात केल्याचे दिसत आहे.
bjp
bjp Dainik Gomantak

Ponda News :

फोंडा, लोकसभा निवडणुकीनंतर आता इच्छुकांची नजर २०२७ साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर लागली असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे.

याकरता पहिला ‘निशाना’ नगरपालिका ठरत असून विद्यमान नगराध्यक्ष रितेश नाईक यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे हा ‘कहीं पे निगाहे कहीं पे निशाना’ अशातला प्रकार वाटतो आहे.

फोंड्याचे विद्यमान आमदार रवी नाईक हे पुढच्या वेळी रिंगणात उतरण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्यांचे पुत्र रितेश हे या उमेदवारीकरता दावेदार ठरू शकतात, असे गृहीत धरून सध्या त्यांच्याविरुद्ध ‘षड्‌यंत्र’ रचण्याचे प्रयत्न खुद्द भाजपचा गोटातूनच सुरू झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

bjp
Goa Power Tariff Hike: गोमंतकीयांच्या खिशाला झळ बसणार, रविवारपासून वीज दरवाढीचा शॉक

नगराध्यक्ष रितेश नाईक हे सध्या फोंड्यातील विकासकामांवर लक्ष ठेवून आहेत. एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीचे प्रतिबिंब फोंडा नगरपालिकेत आतापासूनच दिसायला लागले असून काही नगरसेवकांच्या अपेक्षेप्रमाणे रितेश पायउतार झाल्यास हे प्रतिबिंब अधिकच स्पष्ट होऊ शकेल. आता अपेक्षेप्रमाणे असे घडते की घडामोडींना वेगळा ‘टर्न’ मिळतो याचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल हे निश्चित.

गेल्यावेळी रवींमुळे त्यावेळी भाजपची उमेदवारी हुकलेले भाजपचे फोंड्याचे गटाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी हे सध्या आक्रमक झाले असून ‘अभी नही तो कभी नही’ हे धोरण बाळगून त्याप्रमाणे निवडणुकीत उतरण्याकरता त्यांनी पावले उचलायला सुरवात केल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांना आपल्या गोटातील वीरेंद्र ढवळीकर यांना नगराध्यक्षपद मिळावे असे वाटते आहे; पण रितेशही भाजपचे असल्यामुळे त्यांची अवस्था ‘धरलं तर चावतं सोडलं तर पळतं’ अशी झाल्यासारखी दिसत आहे.

सध्या फोंडा नगरपालिकेत भाजपच्या नगरसेवकांत गटबाजी असल्याचे स्पष्टपणे दिसत असून भाजपच्या दहा नगरसेवकांपैकी पाच नगरसेवक एका बाजूला, तीन दुसऱ्या बाजूला तर दोन कुंपणावर असे चित्र दिसत आहे.

दुसऱ्या बाजूला मगो पक्षाचे डॉ. केतन भाटीकर हे नगरपालिकेतल्या या घडामोडीवर बारीक नजर ठेवून असून वेळ पडल्यास त्यांचे चार नगरसेवक रितेशना पदच्युत करण्यास भाजपच्या बंडखोर गटाशी हातमिळवणी करू शकतात, अशी माहिती त्यांच्या गोटातील एका वजनदार नेत्याने दिली.

जनतेच्या ‘संपर्कात’

राहण्याचा प्रयत्न!

विश्वनाथ दळवी थेटपणे रितेशना आव्हान देऊ शकत नसल्यामुळे यातून मार्ग काढण्याकरता त्यांनी ‘प्रोग्रेसिव्ह फोंडा’ या नावाखाली एका बिगर सरकारी संघटनेची स्थापना केली असून आपत्कालीन सेवेकरता हेल्पलाईन नंबरही दिला आहे. याद्वारे ते फोंड्यातील नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

सावईकर ‘फ्रन्ट रनर’

लोकसभा निवडणुकीची दक्षिण गोव्याची उमेदवारी हुकलेले माजी खासदार नरेंद्र सावईकर हे फोंड्याच्या भाजप उमेदवारीकरता ‘फ्रन्ट रनर’ असल्याचे मानले जात असले तरी येत्या अडीच वर्षांत समीकरणे बदलू शकतात, असेही बोलले जात आहे. दळवी हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्यामुळे ते उमेदवारीकरता आशावादी आहेत. पण लोकसभा निवडणुकीत भाजपला फोंड्यातून अपेक्षेएवढी आघाडी मिळू न शकल्यामुळे तसेच काँग्रेसची फोंड्यातील मते वाढल्यामुळे उमेदवारीबाबत श्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे सांगणे कठीण आहे.

भाटीकरांचे बारीक लक्ष

पुढील निवडणुकीत भाजप-मगो युती झाल्यास २०१२ सालाप्रमाणे फोंड्याची जागा मगोला जाऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून भाटीकरांनी सध्या भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत ‘तमाशा’वर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. पुढील निवडणुकीत भाजपमध्ये उमेदवारीकरता अहमहमिका लागल्यास त्याची परिणती ही जागा मगोला सोडण्यात होऊ शकते, असा होरा राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com