
Ponda tourist city guide: तुम्ही गोव्यात जायच्या विचारात आहात का? पण गोव्याला जाऊन त्याच त्याच जागा बघायचा कंटाळा आलाय आणि काही नवीन बघायचं आहे तर मग कुठे जाल? गोवा म्हटलं की समुद्र किनारे,पार्टी आणि धिंगाणा एवढंच नाही, गोवा त्यापेक्षा अधिक विस्तृत पसरलेला आहे. चला मग जाणून घेऊया उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या मध्यभागी असलेल्या फोंडा शहरात नेमकं काय आहे? तुम्हाला माहितीये का फोंड्याचं जुनं नाव होतं अंत्रुजमहाल, पुढे पोर्तुगीजांच्या काळात अनेक देवळं वाचवायला इथे आणून ठेवली आणि आज हीच मंदिरं शहराची शान बनली आहे.
श्री मंगेशचं देऊळ: मंगेशी इथे असलेलं श्री मंगेशचं देऊळ फोंड्यात प्रचंड प्रसिद्ध आहे. मंदिराच्या आजूबाजूला असलेला परिसर, नैसर्गिक सौंदर्य आणि मंदिरची बांधणी आकर्षक आहे. गोव्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरांमध मंगेशचं नाव आवर्जून घेतलं जातं. या मंदिराचा इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे या मंदिराला भेट द्यावी असं हे एक ठिकाण आहे.
सफा मस्जिद: असं म्हणतात या मस्जिदीत एक भुयारी मार्ग आहे ज्याचा वापर जुन्या काळात केला जायचा, पण त्याची सद्यस्थिती काय आहे हे कोणाला माहिती नाही. गोव्यातील जुन्या इस्लामी पाऊलखुणा बघायच्या असतील तर या जागेला भेट द्यावी. १५६०मध्ये ही मस्जिद आदिलशाहने बांधली होती.
बटरफ्लाय कंझर्व्हेटरी: तुम्हाला फुलपाखरं आवडत असतील तर फोंड्यात तुम्हाला १०० पेक्षा अधिक फुलपाखरांच्या जाती एकाच ठिकाणी बघायला मिळतील. नैसर्गिक सौंदर्यने नटलेल्या या ठिकाणी विविध प्रकारची फुल-झाडं सुद्धा पाहायला मिळतील. सफा मस्जिदीपासून अगदी नजदिकच या जागेला भेट देता येते.
सहकारी स्पाईस फार्म: गोवा हा इथे बनवलेल्या मसाल्यांसाठी ओळखला जायचा,किंबहुना अजूनही ओळखला जातो. तुम्हाला जर का गोव्यातील पारंपरिक मसाले, मसाल्यांची झाडं पाहायची असतील तर कुर्टी-फोंडा इथे सहकारी स्पाईस फार्म प्रसिद्ध आहे. इथे तुमहाला एक गाईड दिला जाईल, जो सगळी माहिती देतो.
बोंडला अभयारण्य: फोंडा आणि सत्तरी तालुक्याच्या मध्यभागी असलेलं हे अभयारण्य बरंच प्रसिद्ध आहे. इथे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात आणि वन्यजीव प्रेमींसाठी हा एक सुदंर अनुभव ठरतो.
फोंडा शहर अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. याला पोर्तुगिजांचा इतिहास देखील जोडलेला आहे. गोव्यात १५१० पासून पोर्तुगीजांची जुलुमी राजवट सुरु झाली, आणि गोवेकरांचं ख्रिस्ती धर्मांतरण सुरु झालं. मंदिरं पडायला सुरुवात झाली आणि याच मंदिरांना वाचवायला त्यांना फोंड्यात आणून वसवण्यात आलं. तुम्हाला जर का ही मंदिरं बघायची असतील तर फोंड्याला भेट द्या.
फोंड्याला पोहोचण्याचा सोपा रस्ता दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळ आहे किंवा तुम्ही मडगाव रेल्वे स्टेशनचा वापर करू शकता. म्हापसा शहरापासून फोंडा शहर थोडं दूर आहे, मात्र पणजी किंवा मडगावात राहणार असाल तर फारसा प्रवास करावा लागणार नाही. फोंडा शहर विविध मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे, यामध्ये शांतादुर्गा मंदिर, रामनाथीचं देवस्थान किंवा चारही बाजूनी पाण्याने वेढलेल्या अनंत मंदिराचा समावेश होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.