

फोंडा: फोंड्यात उघडकीस आलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेली भंडारवाडा-आमोणा येथील सुहाना नाईक हिची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. अद्याप या प्रकरणी इतर कोणतीही अधिकृत तक्रार नोंद झालेली नसली, तरी पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत.
सुहाना नाईक ही सराईत गुन्हेगार आहे काय?, तसेच नोकऱ्या मिळवून देण्याच्या नावाखाली तिचे इतर कोणाशी संबंध किंवा संपर्क आहेत काय?, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उसगाव येथील तिघांकडून सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुहाना नाईक हिने तब्बल १८ लाख रुपये उकळले होते. मात्र ठरलेल्या कालावधीनंतरही नोकरीबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने संबंधितांनी तिच्याकडे पैशांची मागणी सुरू केली. वारंवार तगादा लावूनही पैसे परत न मिळाल्याने अखेरीस फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुहाना नाईक हिला ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा तपास फोंडा पोलिसांकडून सुरू असून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पैसे देऊन नोकऱ्या मिळत असतील, तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.