

पणजी/फोंडा: फोंडा पोटनिवडणुकीतील आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार गीतेश नाईक यांनी प्रतिज्ञापत्रातून खोटी माहिती सादर केल्याचा काँग्रेस आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांचा आक्षेप फेटाळत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गीतेश यांचा अर्ज बुधवारी ग्राह्य धरला. त्यामुळे ‘आप’च्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
माजी मंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांच्या निधनामुळे विधानसभेच्या फोंडा मतदारसंघात येत्या ९ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून रितेश नाईक, काँग्रेसकडून केतन भाटीकर आणि ‘आप’कडून गीतेश नाईक आहेत. या तिन्ही उमेदवारांनी गेल्या सोमवारी अर्ज सादर केलेले आहेत.
‘‘गीतेश नाईक यांनी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून खोटी माहिती सादर केलेली आहे. त्यांच्यावर बंगळुरु आणि राजस्थान येथे फसवणूक तसेच विश्वासघात केल्याच्या तक्रारी दाखल असून, त्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही’’ असा दावा करत आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज बुधवारी सुनावणी घेत त्यांचा अर्ज फेटाळला आणि गीतेश यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरला.
दरम्यान, आमदार ॲड. फेरेरा यांनी गीतेश नाईक यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबाबत त्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा ‘आप’चे राज्य निमंत्रक वाल्मिकी नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
माफीचा प्रश्नच नाही
सर्व पुरावे आपण निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी घुसू नये, यासाठीच आपण हा निर्णय घेतला. त्यामुळे यात माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा
यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. या प्रकरणात आपण काहीही चूक केलेली नाही. लढण्यासाठी आपल्याकडे अजूनही पर्याय आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.