फोंडा, परिसरात गेल्या २० दिवसांत विविध अपघातांमध्ये एकूण ६ जणांचा बळी गेला आहे. शिवाय अन्य अपघातांत अनेकजण जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत.
वाहनांची वाढलेली वर्दळ आणि नियम भंग करणाऱ्या चालकांमुळे अपघात घडत असले तरी अरुंद रस्ते आणि भर पावसाळ्यात सुरू असलेली विविध कामे अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.
फोंडा परिसरात गेल्या २० दिवसांत झालेल्या अपघातांमध्ये एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन दुचाकीचालकांचा समावेश आहे. २३ मे रोजी टॉपकोला-बोरी येथे स्कूटर व मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात स्कूटरचालकाचा मृत्यू झाला होता. २४ रोजी कुर्टी येथील उड्डाण पुलावर केटीएमची धडक वीज खांबाला बसली.
यात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच मापा - पंचवाडी येथे ट्रक व टँकर यांच्यात झालेल्या अपघातात टँकर उलटून एका कामगाराचा मृत्यू झाला. २५ मे रोजी बेतोडा येथील बगलमार्गावर दुचाकी व कार यांच्या झालेल्या अपघातात युवकांचा मृत्यू झाला होता.
११ जून रोजी सकाळी फोंडा येथील कदंब बस स्थानकावर क्रेनखाली चिरडून मोटारसायकल पायलटचा मृत्यू झाला. ११ जून रोजी रात्री उसगाव येथे खड्ड्यांमुळे स्कूटर घसरल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. जखमीवर गोमेकॉत उपचार सुरू असतानाच १२ जून रोजी त्याचा मृत्यू झाला.
फोंडा परिसरात अनेक भागांत भूमिगत वीजवाहिन्यांचे काम धोकादायक स्थितीत सुरू आहे. भूमिगत वीजवाहिन्या घातलेल्या ठिकाणी रस्ता खचला आहे. बेतोडा बगल रस्त्याच्या बाजूची माती वाहून गेल्याने केबल दिसू लागले होते. वाढते अपघात पाहता बांधकाम खाते गांभीर्याने रस्त्याच्या कामांकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येते.
कामे करण्यासाठी कंत्राट दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते हात वर करते. त्यामुळे बेतोडा येथील रुंदीकरण करण्यात येणाऱ्या बगल रस्त्यावर एका वर्षात ७ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
बळी गेल्यानंतरही खड्डा तसाच
मंगळवारी रात्री उसगाव येथून तिस्क-उसगाव येथे जाताना पावसाच्या पाण्याने खड्डा भरल्याने स्कूटर चालकाला त्याचा अंदाज आला नाही. खड्ड्यात स्कूटर गेल्यानंतर चालक रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. गोमेकॉत उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी त्याला मृत्यूने गाठले. हा खड्डा अजूनही बुजविला नसल्याने लोक संतापले आहेत.
‘स्पेशल ड्राईव्ह डे’ :
पावसाळ्यात रस्ता निसरडा होतो. वेगाने वाहने चालविणे धोक्याचे आहे. दुचाकीवर हेल्मेट आणि कार चालविताना सीट बेल्ट घालणे अत्यंत गरजेचे आहे. दारू पिऊन वाहन हाकणे, हा मोठा गुन्हा आहे. गेल्या आठवड्यात ‘स्पेशल ड्राईव्ह डे’ म्हणून आम्ही खास मोहीम राबविली. तेव्हा अनेकांना चलन देण्यात आले. तसेच मद्य पिऊन गाडी चालविल्याबद्दल अनेकांवर कारवाई केली, असे वाहतूक पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.