Pomburpa-Olaulim Panchayat Gram Sabha: पोंबुर्फा-ओळावली ग्रामस्थांनी रविवारी एकमताने एकोशी येथील वादग्रस्त रस्त्याच्या बांधकामासाठी दिलेल्या परवानगी रद्द करण्याचा ठराव केला.
जो २००९मध्ये पंचायत मंडळाने मंजूर केला होता. तसेच नगर नियोजन, वन व सीआरझेडला पत्र लिहिण्याचे ठरविले. याशिवाय गामस्थांनी मेगा प्रकल्पांना परवानगी न देण्याचा तसेच जंगल व टेकड्यांच्या र्हास होऊ न देण्याचा ठराव घेतला.
रविवारी, पोंबुर्फा-ओळावली पंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा झाली. सरपंचा लिओपोल्दिना नोरोन्हा या सभेच्या अध्यक्षतेखाली होत्या. तसेच पंचायत सचिव व इतर पंचसदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गावातील जैवविविधता जतन करणे, करांचे पुनर्मूल्यांकन, कचरा, नाल्यांच्या समस्यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
‘सेव्ह अवर व्हिलेज अँड सेव्ह हिल्स’ या बॅनरखाली गावकर्यांनी एकोशी येथील डोंगर व जंगल नष्ट झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. आणि या प्रकल्पस्थळी रस्ता बांधकामासाठी वन विभागाची परवानगी आहे का? असा सवाल पंचायत मंडळाकडे केला.
त्यानुसार, सरपंचांनी कामाला वनविभागाची परवानगी नसल्याची माहिती दिली. त्यानंतर, गावातील डोंगर व जंगल नष्ट होऊ न देण्याचा ठराव ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला. त्याचप्रमाणे, मेगा प्रकल्पांना मंजूरी न देण्याचे ठरविले.
२००९मध्ये ठराव मंजूर करताना भाटान येथील स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेतले नाही. त्यांनी तिथे अस्तित्वात पदपथ रस्ता असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात आली व रस्त्याचे बांधकाम वनविभागाच्या मंजुरीशिवाय करण्यात आल्याचे ग्रामस्थ म्हणाले.
त्यानुसार, सदर रस्ता तोडण्याची मागणी करीत ग्रामसभेच्या सदस्यांनी एकमताने हा रस्ता हटविण्याचा ठराव मंजूर केला.
दरम्यान, सरपंचांनी ग्रामस्थांनी सांगितले की, पंचायत मंडळाने २०१८मध्ये शेवटचे कराचे पुनर्मूल्यांकन केल्यामुळे गावात १०टक्के कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.