Ponda Municipal Council: नगराध्यक्ष निवडीला राजकीय रंग; वर्षानंतर वीरेंद्र ढवळीकर...?

Ponda Mayor: प्रभाग नं १४ मधून निवडून आलेले रवी नाईकांचे कट्टर समर्थक आनंद नाईक यांनी बाजी मारली
Ponda Mayor: प्रभाग नं १४ मधून निवडून आलेले रवी नाईकांचे कट्टर समर्थक आनंद नाईक यांनी बाजी मारली
Ponda Municipality, Anand NaikDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कृषीमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर फोंड्याला नूतन नगराध्यक्षाचे वेध लागले होते. त्यामुळेच नूतन नगारध्यक्ष कोण यावर चर्चा रंगत होती.

प्रभाग नंबर २ चे नगरसेवक वीरेंद्र ढवळीकर हे नवीन नगराध्यक्ष होणार अशी अटकळ बांधली जात होती. तत्पूर्वी माजी नगराध्यक्ष विश्‍वनाथ दळवी यांचे नावही चर्चेत होते. मात्र दळवी यांनी ढवळीकर यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे नाव बाहेर पडले. पण प्रभाग नं १४ मधून निवडून आलेले रवी नाईकांचे कट्टर समर्थक आनंद नाईक यांनी शेवटी बाजी मारली. आनंद की वीरेंद्र या चर्चेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लॉट काढून पूर्णविराम दिला आहे.

वास्तविक नगराध्यक्षांची निवडणूक होण्यापर्यंत स्थिती पोचल्याचे सांगितले जात होते. त्याप्रमाणे रवींच्या समर्थक नगरसेवकांनी मोर्चेबांधणी पण सुरू केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी असे होऊ न देता सामोपचाराने हा गुंता मिटवला.

आता रितेश जाऊन आनंद नगराध्यक्षपदी आल्यामुळे कृषीमंत्री रवी नाईक यांचे नगरपालिकेतील पर्व मागच्या पानावरून पुढे चालूच राहील यात शंकाच नाही. मुख्यमंत्र्यांनी जरी हा गुंता मिटविण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजप नगरसेवकांमध्ये असलेली गटबाजी लपून राहिलेली नाही. विधानसभा निवडणुकीकरिता भाजपच्या उमेदवारीवर डोळा असल्यामुळे या गटबाजीला खतपाणी मिळायला लागले आहे. त्यामुळे पडद्यामागे अनेक हालचाली सुरू आहेत.

काही नगरसेवकांची अवस्था ‘धरले तर चावते सोडले तर पळते’ अशी व्हायला लागली आहे. एकाच पक्षात असल्यामुळे उघडपणे हेवेदावे दाखवता येत नसले तरी अंतर्गत राजकारण सुरूच आहे.

फोंडा नगरपालिकेच्या प्रभाग सहामधून सलग तीनदा व यावेळी बिनविरोध निवडून आलेले विश्‍वनाथ दळवी यांनी भाजपच्या उमेदवारीवर डोळा ठेवून आपल्या हालचाली सुरू केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे वीरेंद्र का आनंद असा पेच निर्माण झाला होता. सध्या विश्वनाथ दळवी यांनी आपल्या प्रोग्रेसिव्ह फोंडातर्फे सामाजिक कार्य सुरू केले आहे.

भाटीकर गट ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत

दुसऱ्या बाजूला चार नगरसेवक आपल्या गटात असलेले डॉ. केतन भाटीकर हे ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत असून नगरपालिकेतील राजकारण कसे बदलते यावर त्यांची रणनीती अवलंबून असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एकंदरीत नूतन नगराध्यक्षाच्या निवडीला राजकीय रंग चढला असून नगरपालिकेतील समीकरणे बदलत असल्याचे संकेत मिळायला लागले आहेत. येत्या वर्षभरात हा रंग आणखी गडद होणार असल्याची शक्यता यामुळेच नाकारता येत नाही एवढे निश्‍चित.

Ponda Mayor: प्रभाग नं १४ मधून निवडून आलेले रवी नाईकांचे कट्टर समर्थक आनंद नाईक यांनी बाजी मारली
Panjim Mayor: महापौरपदासाठी पुन्हा रोहित मोन्सेरात यांचा अर्ज

वर्षानंतर वीरेंद्र ढवळीकर...?

फोंडा नगरपालिकेचे राजकारण लवचिक झाले असून त्याचा कल कोणाच्या बाजूने झुकेल याचा अंदाज लावणे कठीण जाते. वर्षानंतर वीरेंद्र ढवळीकर यांना नगराध्यक्षपदाचे आश्‍वासन दिले गेले असल्याचे सांगितले जात असले तरी वर्षानंतर तशीच परिस्‍थिती राहील की काय हे सांगता येत नाही. त्यावेळी रवी नाईक परत एखादा आपला समर्थक या खुर्चीवर बसवू शकतात असा होरा राजकीय विश्‍लेषक व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे नगरपालिकेतील राजकीय स्थिती सध्या अस्थिर वाटत असून केवळ पक्षश्रेष्ठींचा धाक म्हणून ते संघटित असल्याचे दावा करताना दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com