बार्देशचे मुख्यालय पर्वरी करण्याचा घाट?

बार्देश तालुक्याचे मुख्यालय म्हापशाऐवजी आता पर्वरी करण्याचा डाव मंत्री रोहन खंवटे यांनी रचला असल्याचा सध्या बोलबाला आहे.
Rohan Khaunte
Rohan Khaunte Dainik Gomantak 
Published on
Updated on

बार्देशचे मुख्यालय पर्वरी करण्याचा घाट?

बार्देश तालुक्याचे मुख्यालय म्हापशाऐवजी आता पर्वरी करण्याचा डाव मंत्री रोहन खंवटे यांनी रचला असल्याचा सध्या बोलबाला आहे. म्हापसा हे उत्तर गोव्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असून तिथे पोर्तुगीज काळापासून कार्यरत असलेली बाजारपेठ व तेथील बसस्थानक यांमुळे बार्देश तालुक्यातील लोकांना शासकीय कामे करणे तेथील सरकारी संकुलामुळे सोईस्कर होत असते. अशा या पार्श्वभूमीवर मंत्री खंवटे बार्देशचे शासकीय मुख्यालय म्हापशाऐवजी पर्वरी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत, असे ऐकिवात आहे. त्यामुळे काँग्रेसचे म्हापशातील नेते संजय बर्डे हे खंवटे यांच्या विरोधात सध्या जनजागृती करीत आहेत. मंत्री खंवटे यांचे राज्य सरकारात बरेच वजन असल्याने त्यांचे मनसुबे सहजपणे साध्य होतील, या विचाराने सध्या बार्देशमधील बहुतांश जनता भयभीत झाली आहे. असे असले तरी कुणीही जाहीरपणे त्याबाबत वक्तव्य करण्यास पुढे येत नाही, हेही तेवढेच खरे आहे. ∙∙∙

बाबूके हसीन सपने

पेडण्यातून मडगाव येथे आणून ठेवल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांची मडगावात काही डाळ शिजली नाहीच. विधानसभा निवडणुकीत मडगावात त्यांचा पराभव झाला, पण म्हणतात ना राजारण्यांना फार वेळ राजकारणातून फार वेळ स्वस्थ बसून राहता येत नाही. त्यामुळे त्यांना आता लोकसभा उमेदवारीचे वेध लागले आहेत. भाजपने आपल्याला दक्षिण गोव्यातून उमेदवारी दिली, तर ती लढविण्याची आपली तयारी आहे असे सूतोवाच त्यांनी केले आहे. दुसरे माजी उपमुख्यमंत्री असलेले बाबू कवळेकरही ही उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत. दामूचे समर्थकही यावेळी संधी दामूना द्या अशी मागणी करू लागले आहेत. लोकसभा निवडणूक हा राजकीय पुनर्वसनाचा मार्ग कधीपासून झाला बुवा? ∙∙∙

मळकर्णे पंचायतीतही नाराजीनाट्य?

सांगे मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मळकर्णे पंचायतीची दोन दिवसांपूर्वी म्हणजे रविवारी ग्रामसभा होणार होती. मात्र, बहुतेक सर्वच पंच ग्रामसभेला गैहजर राहिल्याने ही ग्रामसभा ग्रामस्थांनी होऊच दिली नाही. गावच्या सरपंच राजेश्री गावकर याच या सभेला उपस्थित होत्या. असे म्हणतात, मळकर्णे पंचायतीतही सध्या ‘नाराजीनाट्या’चा प्रयोग चालू आहे. बहुतेक पंच सरपंचाच्या विरोधात असून या ग्रामसभेला गैरहजर राहून त्यांनी आपला राग दाखवून दिला आहे. मात्र, आमदार सुभाष फळदेसाई यांचा त्यांना खंबीर पाठिंबा असल्याने त्यांची खुर्ची अजून टिकून आहे असे सांगितले जाते. ∙∙∙

पदपथावर गाड्या!

वास्तविक पदपथ बांधले जातात ते पादचाऱ्यांना वाहनांचा त्रास न होता चालता यावे यासाठी. मात्र, कुडचडेत हे काहींना मान्य नसावे. याचे कारण म्हणजे सध्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत असे सांगितले जात आहे त्या जास्मिन ब्रागांझा यांचे पती अर्ल ब्रागांझा यांची स्वतःचीच गाडी कित्येकदा पदपथावर उभी करून ठेवलेली दिसून येते. हे अर्ल ब्रागांझा मंत्री नीलेश काब्राल यांचे निकटचे सहकारी मानले जात असून त्यामुळेच हा प्रकार सध्या कुडचडे येथे अधिक चवीने चघळला जात आहे. जर लोकप्रतिनिधींचे यजमानच कायद्याचे पालन करत नसतील, तर सामान्य नागरिकांनी कायदा पाळावा ही अपेक्षा धरणे चुकीचे नव्हे का? ∙∙∙

(political Situation in goa)

Rohan Khaunte
पंचायत निवडणुकांचा चेंडू आता सरकारच्या ‘कोर्टात’

कोकणी नाटकं की ना‘ड’कां?

कोकणी अकादमीने नाटकांची संमेलने भरवली होती. त्यात जी ‘नाडकं’ झाली त्यांचं कवित्व धुनीसारखं अजून धगधगत आहे. मानापमान, रूसवे फुगवे, गचाळ, ढिसाळ, मनमानी कारभार, दादागिरी, राजकारण यांनी ती गाजली. ‘करत रावया..’ चे मागील पानावरून पुढे धोरण! पण काय करावं याची दिशा नाही. मातीच्या गंधातून स्फुरलेल्या वैश्विक संदेशाच्या ताकदीच्या मौलीक संहिता ही कोकणी रंगभूमीची आजचीही गरज. लसीकरण करून लेखक होत नाहीत. मी तुला, तू मला लेखक म्हटलं, म्हणूनही होत नाहीत... अनुवादांचा ढीग असं स्पर्धेचं स्वरूप पक्कं झालंय. अनुवादाच्या दर्जाविषयी न बोललेलं बरं. नाटकाचा ढांचा, रचना, सांगाडा नाटककार रचतो. तो सिनेमा नव्हे. फक्त अभिनय म्हणजे नाटक नव्हे. कोकणी अकादमीचे उपाध्यक्ष नाटककार व नाट्य अनुवादक आहेत. त्यांनी मनावर घेतलं तर परत एकदा नाट्य संमेलन होऊन जाईल. पण सर्वांना विश्वासात घ्यावं लागेल. सरकारी संस्था ती. दादी, भाई सांगतो ते ऐकावं म्हणायला मंडळ नव्हे. तथापि पाय ओढण्याच्या या संपूर्ण ‘नाडकां’च्या प्लॉटवरच एक दमदार हृयस्पर्शी नाटक होऊन जाईल हे मात्र खरं. ∙∙∙

कुडचडे पालिकेतील सरकारी सूनबाई!

कुडचडे नगरपालिका मंडळाचा कायदेशीर लढा देणाऱ्या व सध्या कुंकळळी नगरपालिकेचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यावर ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या काव्यपंक्ती आठवण्याची पाळी आली आहे. कुडचडे पालिकेच्या एका निलंबित महिला कर्मचाऱ्याचा न्यायालयात खटला चालू असून कुडचडे पालिकेकडे तसा लायक अधिकारी नसल्यामुळे सरकारने कुंकळ्ळी पालिकेच्या मुख्य अभियंत्यांना सरकारची व पालिकेची बाजू मांडण्याचे वकीलपत्र दिले आहे. मात्र, त्या महिला कर्मचाऱ्याचा निकटचा नातेवाईक जो कुंकळ्ळी पालिकेत नगरसेवक आहे, तो बदला घेण्यासाठी नाहक कुंकळ्ळी पालिकेच्या मुख्य अभियंत्याला सतावण्याचे उद्योग करीत आहे. त्या अभियंत्यावर खोट्या तक्रारी नोंदवून सरकारी वकीलपत्र मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचे उघड झाले आहे. एका बाजूने त्या महिलेच्या नातेवाईकाची दादागिरी व दुसऱ्या बाजूने कुडचडे पालिकेचा सहयोग नको होता असे म्हणून तो मुख्य अभियंता डोक्यावर हात मारून घेत आहे. ∙∙∙

मोदींच्या म्हापशातील सभेमुळे शेतकरी अजूनही हवालदिल!

सुमारे तिनेक महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे औचित्य साधून म्हापशातील श्री बोडगेश्वर मंदिराच्या परिसरातील शेतजमिनीत उभारण्यात आलेल्या हेलिपॅडमुळे म्हापशातील शेतकरी अजूनही हवालदील आहेत. याचे कारण म्हणजे हेलिपॅड व त्यासंदर्भात उभारण्यात आलेले रस्ते थोड्याफार प्रमाणात हटवण्यात आले असले, तरी माती, दगड इत्यादी सामग्री अद्याप तेथून हटवण्यात आली नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात तिथे भातशेतीचे पीक घेणे शेतकऱ्यांना अशक्यप्राय झाले आहे. भाजपच्या त्या सभेच्या निमित्ताने अखेरीस त्या हेलिपॅडवर पंतप्रधान मोदी उतरलेच नाहीत, ही वस्तुस्थिती असली, तरी तेथील शेतकऱ्यांची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या त्या हेलिपॅडमुळे शेतकऱ्यांसमोर अनेकविध प्रश्न निर्माण झाले आहेत, हेही तेवढेच खरे आहे. ∙∙∙

अखेर कुंकळ्ळीच्या लढ्याला राजमान्यता!

‘देर आए दुरुस्त आहे’ अशा शब्दांत कुंकळळीकरांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले आहे. गोव्याच्या घटक राज्यदिनी मुख्यमंत्र्यांनी कुंकळळीकरांनाच नव्हे ते राष्ट्रप्रेमी गोमतकीयांना अनोखी सौगाद दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी कुंकळळीच्या १५८३ च्या लढ्याला राजमान्यता देण्याची घोषणा घटक राज्यदिनी करून कुंकळळीकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. गोवा 15 जुलै कुंकळळीच्या पोर्तुगीज सत्तेविरुद्धच्या प्रथम लढ्याची आठवण म्हणून साजरा केला जात आहे व सोळा महानायकाचा स्मरण दिवस म्हणून साजरा केला जातो तो राज्य सरकारतर्फे राष्ट्रीय युद्ध स्मारक दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याचे घोषित केले आहे. आता सरकारने या उठावाचा इतिहास पाठ्य पुस्तकात घालून उरलेले कार्य पूर्ण करावे म्हणून कुंकळ्ळीकर म्हणायला लागले आहेत ‘दोतोर - तुसी ग्रेट हो’... ∙∙∙

नाल्याचे गौडबंगाल

पूर्वी जलसिंचन हा साबांखाचाच एक भाग होता, पण नंतर जसजसे सिंचन काम विस्तारले तसे जलसिंचन हे वेगळे खाते निर्माण केले गेले, तेच आताचे जलश्रोत खाते होय. तर सांगण्याचा मुद्दा म्हणजे या खात्यातर्फे राबविलेले अनेक प्रकल्प वादग्रस्त ठरू लागलेले आहेत. शॅडो कौन्सिलने उपस्थित केलेला मडगावातील नाला हा त्यातीलच एक. काही महिन्यांमागे तो उपस्थित करूनही खात्याने त्यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. कोणा एकाच्या जमिनीच्या फायद्यासाठी सुस्थितीतील नाला हटवून तब्बल 81 लाख खर्चून नवा नाला बांधला जात असेल, तर ते आक्षेपार्हच आहे. खात्याने बांधलेल्या अन्य नाल्यांचेही असेच गौडबंगाल आहे की काय अशी चर्चा आता कानावर येत आहे. ∙∙∙

ठराव करून भागणार नाही

पेडणे व काणकोण हे गोव्याच्या दोन टोकावरील तालुके. विकासात जरी ते अन्य तालुक्याशी तुलना करता मागे असले तरी सामाजिक भान व सुधारणात ते नेहमीच पुढे असतात. पेडण्यातील कोरगाव व धारगळ पंचायतीच्या ग्रामसभांनी विधवा सन्मान ठराव संमत करून तेच दाखवून दिले आहे. आता राज्यातील अन्य ग्रामसभाही त्याचे अनुकरण करतील, पण मुख्य मुद्दा आहे तो असे ठराव संमत केले म्हणून विधवांची हेळसांड थांबणार का हा आहे. आपल्या गावात विधवांबाबतच्या अनिष्ठ प्रथा अंमलात येणार नाहीत याची खबरदारी प्रत्येकाने, विशेषत महिलांनी घेतली तरी ठराव न घेताही विधवांना दिलासा मिळेल असे विधवाच म्हणत आहेत. ∙∙∙

Rohan Khaunte
गोव्यात दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

सक्ती सिध्द कशी करणार?

सडये येथील बिलिव्हरपंथीय धर्मगुरूला पोलिसांनी अटक केल्यानंतर बेकायदा धर्मांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तशात आमदार दिलायला लोबो यांनी या प्रश्नावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उपस्थित होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या काँग्रेस पक्षातील अनेकांनी त्याबाबत सवाल केला आहे. जो कोणी स्वेच्छेने धर्मांतर करतो त्याबद्दल कोणीच आक्षेप घेत नाही, मुद्दा रहातो तो सक्तीच्या धर्मांतराचा. दिलायला मॅडमही तेच सांगतात, आमिषे दाखवून ती घडविणाऱ्यांवर बंदी आणण्याचा आग्रह त्या धरतात, पण मुद्दा रहातो तो हे सगळे सिध्द कसे करणार हा. कारण स्वेच्छेने धर्म बदलणारा वा आमिषांना भुलून धर्म बदलणारा कधीच ते मान्य करणार नाही मग ते सिध्द कसे करणार?∙∙∙

विधवा प्रथेविरुद्ध ठराव स्तुत्य

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत विधवा प्रथेविरुद्ध ठराव घेऊन देशात आदर्श निर्माण केला आहे. ही कूप्रथा बंद करण्याचा आदर्श आता गोव्यातही पसरत चालला आहे. ही आनंददायी गोष्ट आहे. गोव्यातील धारगळ आणि कोरगाव या दोन गावांनी या प्रथेविरोधात दंड थोपटले असून महिला सन्मानाच्यादृष्टीने हा एक चांगले पाऊल आहे. मध्यंतरी गोमंतकीय पार्श्वगायिका हेमा सरदेसाई यांनीही ‘विधवा’ या शब्दाला आक्षेप घेऊन हा शब्द प्रशासनाच्या कामकाजातून रद्द करावा अशी मागणी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे केली होती. या दोन्हीही बाबी अत्यंत स्तुत्य असून या आचरणात आल्यास महिलांना सन्मानपूर्वक जगण्याला प्रोत्साहन मिळेल.∙∙∙

पेडणेकर झाले आक्रमक

विधानसभा निवडणुकीत यावेळी उत्तर टोकावरील पेडणे तालुक्याने परिवर्तन घडविले आहे हे खरे, पण अन्य अनेक बाबतीतही पेडणेकर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. कदाचित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे त्यामागील कारण असू शकते. रविवारी झालेल्या कोरगाव व धारगळ ग्रामसभांत झालेली चर्चा व संमत झालेले ठराव त्याची साक्ष आहेत. कोरगावमध्ये अनिर्बंध बांधकामाला लोकांनी आक्षेप घेऊन त्याला दिलेला परवाना मागे घेण्याबाबत केलेली मागणी तसेच धारगळमध्ये विमानतळ लिंक रोडसाठीच्या परवान्याबाबत अशीच झालेली मागणी लोकजागृती व बदलेल्या मानसिकतेचे द्योतक मानले जाते. ∙∙∙

अनिश्चित मॉन्सून

गेली काही वर्षे मॉन्सून गोव्याला व येथील वेधशाळेतील शास्त्रज्ञांना हुलकावणी देताना आढळून येत आहे. गतवर्षी तौक्ते वादळाने त्यांना चांगलाच हिसका दाखवला व मॉन्सूनबाबतचे त्यांचे सगळे अंदाज उलटे पालटे करून टाकले. पुणे वेधशाळेने यंदा मॉन्सून आठवडाभर अगोदरच अंदमान निकोबार बेटात, केरळ तसेच गोव्यात दाखल होईल असे भाकीत केले होते, पण अंदमानमध्ये दाखल झालेल्या त्याला तेथील हवामानाने इतके क्षीण केले की तो पुढेच सरकू शकला नाही व त्यामुळे पुढची सारी गणिते कोलमडली. त्यामुळे मॉन्सूनविषयक सारे अंदाज हे जर तर वर आधारीत असतात हेच खरे. ∙∙∙

सार्दिन आहेत कुठे?

ंपक्षांतर्गत बंडाळी आणि फुटाफुटीच्या हंगामात मुख्यमंत्री झालेले फ्रान्सिस सार्दिन सध्या आहेत कुठे? असा प्रश्‍न विचारायचे कारण म्हणजे, आज राज्याचा 35 वा घटक राज्यदिन होता. या दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारच्यावतीने सर्व माजी मुख्यमंत्र्यांचा राजभवनावर विशेष सन्मान करण्यात आला. या समारंभात 12 माजी मुख्यमंत्र्यांपैकी हयात असलेल्या सात मुख्यमंत्र्यांपैकी फ्रान्सिस सार्दिन यांनी चक्क दांडी मारली. ते विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे त्यांना राज्य शिष्टाचाराचे धडे चांगलेच पाठ असतील. तरीही या कार्यमाकडे त्यांनी फिरवलेली पाठ आज दिवसभर चर्चेत होती. चर्चिल आलेमाव या कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत. मात्र, आपला प्रतिनिधी म्हणून मुलगी वालंका यांना पाठवायला ते विसरले नाहीत. सार्दिन यांनी चर्चिल यांच्यासारखे तरी सौजन्य दाखवायला हवे की नाही?∙∙∙

यंदा तरी ‘फॉर्मेलिन फ्री’ मासे मिळणार?

मासे गोमंतकीयांच्या खाद्यसंस्कृतीतला अविभाज्य घटक आहे. आजपासून पश्‍चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी लागू होत आहे. त्यामुळे राज्यातल्या मोठ्या मोठी किनाऱ्याला लागल्याने मासेमारीवर मर्यादा येणार आहे. या दरम्यान पूर्व किनारपट्टीवरून गोमंतकीयांना पुरविले जातात. यंदाही ते येतील. मात्र, मासे टिकवून ठेवण्यासाठी या माशांमध्ये अत्यंत विषारी आणि आरोग्याला हानीकारक फॉर्मेलिन वापरले जाते. या विरोधात मागे मोठे वादळ उठले होते. या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने दंड थोपटले असले, तरी यंदा खरोखरच ‘फॉर्मेलिन फ्री’ मासे मिळतील का हा गोमंतकीयांच्या जीवाभावाचा प्रश्‍न आहे.∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com