मनोहर पर्रीकरांचा भाजप आता राहिलेला नाही..

शालजोडीयुक्त आहेर स्वपक्षाला देत बंडाचा आव आणणारे कळंगुटचे आमदार आणि प्रमोद सावंत सरकारातील कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी आपण भाजपातच असून पुढची निवडणूकही त्याच पक्षाचा उमेदवार म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
Goa Assembly Election

Goa Assembly Election

Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Election: मायकल यांचे बंड खरे, त्यांनी दाती तृण घेत दिलेली शरणागती खरी की अस्तनीतला निखारा होण्याची आपली क्षमता शाबुत ठेवण्याची त्यांना लागलेली तळमळ खरी हे कळण्यासाठी निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागेल. लोबो अद्यापही ''स्वयंभू'' बनू शकलेले नाहीत, असाच या शरणागतीचा अर्थ आहे.

मनोहर पर्रीकरांचा भाजप आता राहिलेला नाही आणि तो कार्यकर्त्यांचा पक्षही राहिलेला नाही, असा शालजोडीयुक्त आहेर स्वपक्षाला देत बंडाचा आव आणणारे कळंगुटचे आमदार आणि प्रमोद सावंत सरकारातील कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी आपण भाजपातच असून पुढची निवडणूकही त्याच पक्षाचा उमेदवार म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. आपली धर्मपत्नी शेजारच्या शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे ते आताही सांगत असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत डिलायला लोबो यांच्या उमेदवारीबाबत शेकडो शक्यता उद्भवू शकतात.

Goa Assembly Election

कार्यकर्ते केवळ निवडणुकांपुरतेच; खरी कुजबूज

मायकल यांचे बंड खरे, त्यांनी दाती तृण घेत दिलेली शरणागती खरी की अस्तनीतला निखारा होण्याची आपली क्षमता शाबुत ठेवण्याची त्यांना लागलेली तळमळ खरी हे कळण्यासाठी निवडणुकीच्या (Election) निकालाची वाट पाहावी लागेल. 2017 च्या निवडणुकीत साळगाव आणि शिवोलीतल्या भाजपा उमेदवारांच्या पराभवाचे श्रेय जाणकार मायकल यांनाच देतात. ज्या प्रकारे खुद्द पर्रीकर यांच्या काकदृष्टीला चकवत त्यानी आपले मनसुबे तडीस नेले होते, ते पाहिल्यास त्याच प्रकाराची अंशतः तरी पुनरावृत्ती यावेळेसही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एक खरे की बाहुबली बनून पक्षाला नमवण्याची लोबोंची चाल सध्या तरी फसली आहे. सत्तरीत विश्वजीत राणे किंवा तिसवाडींत बाबुश मॉन्सेरात आपल्या पत्नींसाठी जे करू शकले ते लोबो यांना जमले नाही, याचे कारण शिवोलींत भाजपकडे सक्षम यंत्रणा आहे आणि बाहुबलींचे मर्मस्थळ ओळखून त्यांचे हात पिरगाळण्याची क्षमता असलेले केंद्रीय नेतेही आहेत. लोबो अद्यापही ''स्वयंभू'' बनू शकलेले नाहीत, असाच या शरणागतीचा अर्थ आहे. आपला गैरसमज नेतेमंडळीनी दूर केल्याने आपली पक्षनिष्ठा दृढ झाली असल्याचे स्पष्टीकरण जरी लोबो आता देत असले तरी सर्वसामान्यांपर्यंत मात्र पक्षाने त्याना वेसण घातल्याचे, त्याना ''मॅनेज'' केल्याचेच संदेश जातील.

लोबो यांनी तृणमूलचा (TMC) आकस्मिक प्रवेश जसा अपेक्षित नव्हता तशीच सासष्टीतील नेत्यांची त्या पक्षाकडे लागलेली रीघ आणि त्यामुळे कॉंग्रेसला लागलेली घरघरही अपेक्षित नव्हती. त्यांना ''किंगमेकर''ची भूमिका सोडून ''किंग'' बनण्याची अंमळ घाईच झाली आहे. पण त्यासाठी त्यांनी अत्यंत मर्यादित असे क्षेत्र निवडले आणि राजकारणातले पावसाळे अनुभवलेल्या बेरकी सहकाऱ्यांच्या साहाय्यावर आधण ठेवले. आपल्या पंसतीचे उमेदवार बार्देश तालुक्यात उभे करून त्यांना निवडणुकीसाठी लागणारे आर्थिक पाठबळ पुरवायचे आणि गलितगात्र कॉंग्रेसला या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी भाग पाडायचे, ही शिकावू स्तरावरली रणनिती त्यांनी आचरली होती. सुरुवातीच्या काळात भाजपाही या रणनितीने धास्तावला होता. मात्र, जयेश साळगांवकर, रोहन खंवटे हे लोबोंचे शिलेदार रात्रींत भाजपात आले आणि लोबोंच्या पायाखालची वाळू ढासळायला लागली.

Goa Assembly Election

भाजपाने आर्लेकरना प्रवेश देत साधला डाव

खुद्द कळंगुट मतदारसंघांत लोबोंना खमके विरोधक आहेत आणि इरेस पडून भाजपाने (BJP) त्यांच्याशी संधान बांधले तर आपण बार्देशची बृहद् योजना राबवताना घरच्याच मैदानावर तोंडघशी पडू शकतो याचा अंदाज लोबोना आला आणि त्यांनी सध्यापुरती तरी तलवार म्यान केली आहे. पण खरेच का त्यांनी तलवार उपसली होती? की दशावतारी नाटकांत लढाईच्या आरंभी नट आपल्या तलवारी एकमेकांसमोर परजत रणनृत्य करतात, तसाच हाही देखाव्यापुरता प्रयोग होता? कॉंग्रेसने आजवर लोबोंच्या या दशावतारी प्रयोगाला दाद दिलेली नाही, हीदेखील नोंद घेण्याजोगी बाब आहे.

एक प्रकारे लोबो सध्याच्या राजकारणाचे नियंत्रण करणाऱ्या बलाढ्य अशा व्यावसायिक लॉबीच्या कलाने घेण्यासाठी माघार घेतल्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही लॉबी गोव्यातील जमीनविक्रीच्या व्यवहारात आहे. तुर्तास येथील जमीनविक्री आणि तिच्या अनुशंगाने होणारे भूरुपांतराची प्रक्रिया ही कोट्यवधींची माया मिळवून देणारी कामधेनू ठरली आहे. गोव्यांत जमिनीचा तुकडा असणे आणि त्यावर आपल्या मालकीचा इमला असणे म्हणजे ''स्टेटस सिंबॉल'' असे मानणाऱ्या उत्तर भारतीय नवश्रीमंताच्या टोळधाडी गेली अनेक वर्षे गोव्यावर येऊन आदळताहेत. शिवाय यथील पर्यटनात स्वारस्य असलेली धनिकबाळेही धमाश्यांसारखी घोंगावत आहेत. आतापर्यंत त्यांनी निवासी व बागायती जमिनी अव्वाच्या सव्वा दाम देत ताब्यात घेतल्या. आता शिल्लक राहिल्या आहेत त्या शेतजमिनी. त्या बराच काळ पडिक ठेवायच्या आणि मग हळूहळू निवासी किंवा व्यावसायिक क्षेत्रांत आणून त्यांची विक्री करायची, ही कार्यपद्धती आचरताना कोट्यवधी रुपयांचा मलिदा मधल्यामध्ये सोडवण्याचे कौशल्य अनेकांनी आत्मसात केले आहे. निवडणुकीसाठी लागणारा अफाट पैसा आज प्रामुख्याने हे, भूविकासाचे क्षेत्रच पुरवत असते. त्या क्षेत्राला नियंत्रित करण्याची क्षमता राज्य सरकारकडे नसली तरी केंद्रातील चाणक्यांकडे निश्चितपणे आहे आणि आता त्या क्षमतेचाच प्रत्यय येतो आहे. सध्या जे विविध पक्षांतले बाहुबली आपला राजकीय पूर्वेतिहास विसरून विशिष्ट पक्षाच्या दिशेने धाव घेत आहेत, तो याच नियंत्रणाचा परिपाक असण्याची गडद शक्यता आहे. यातील सर्वांनाच भू-विकासांत स्वारस्य आहे, हा काही योगायोग नव्हे. दक्षिणेतले तृणमूलच्या दिशेने होणारे नेत्यांचे संघटनही निवडणुकीनंतर आपला रोख बदलून उत्तरेतील संघटनाला येऊन मिळाले तर आश्चर्य वाटू नये. अशा वेळी राजकीय निष्ठा किती क्षीण ठरतात हे, सध्याच्या विधानसभेत भाजपाची पाठराखण करणाऱ्या पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडल्या गेलेल्या चर्चिल आलेमाव यांनी व्यवस्थितपणे सिद्ध केलेले आहेच. लोबो यांचा चौखूर उधळलेला घोडा अकस्मात आवरण्याचे श्रेय भू-विकासाच्या समांतर अर्थव्यवस्थेलाच द्यावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com