कार्यकर्ते केवळ निवडणुकांपुरतेच; खरी कुजबूज

कार्यकर्त्यांची कामे सोडाच. पण, गेल्या पाच सहा वर्षांत एक कार्यकर्त्यांची बैठकही झालेली नाही.
Goa Assembly Election 2022

Goa Assembly Election 2022

Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Election 2022

विद्यापीठाचे लोटांगण

‘कोरोना’ संकटाच्या नावाने चांगभले म्हणत न शिकताच उच्च श्रेणीत उत्तीर्ण होण्याच्या इराद्याने गोवा विद्यापीठाकडे ऑफ लाईन परीक्षा रद्द करून ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या काही मोजक्याच विद्यार्थ्यांच्या दबावाला गोवा विद्यापीठ बळी पडले. असे आम्ही नव्हे, तर महाविद्यालयाचे प्राध्यापकच म्हणायला लागले आहेत. महाविद्यालयाच्या सर्व परीक्षा ऑफ लाईनच घ्याव्यात अशी आग्रही मागणी म्हणे महाविद्यालयाच्या प्राचार्यानी संयुक्त बैठकीत केली होती. प्रथम वर्ष सोडून इतर परीक्षा ऑफ लाईन घेण्यासाठी बैठकीत म्हणे एकमत झाले होते. मात्र, विद्यापीठाचे उपकुलगुरु व रजिस्ट्रार काही विद्यार्थ्यांच्या धमकीला घाबरले व प्राचार्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवत प्रथम व दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचे फर्मान विद्यापीठाने काढले आहे. कोरोनाच्या नावाने जो गोंधळ सुरू आहे, तो आपले शिक्षणमंत्री व शिक्षण तज्ज्ञ उघड्या डोळ्यांनी बघत आहेत हीच खरी शोकांतिका. ∙∙∙

सावित्रींची गणेशवंदना !

‘जे आपल्याला येत नाही ते करण्याच्या फंदात पडू नये’ असे आपले बुजुर्ग जाणते लोक सांगून गेले आहेत. जेव्हा आपण न येत असलेले दिव्य करण्याचे असे धाडस करतो तेव्हा कशी फजिती होते याची अनुभूती सावित्री कवळेकर यांनी सांगे येथे झालेल्या जाहीर सभेत घेतली. सावित्री यांनी आपल्या भाषणाची सुरवात गणेश वंदनाने करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संस्कृत श्लोकांचे योग्य उच्चारण व संपूर्ण श्लोक येत नसल्यामुळे सावित्रीबाईची श्लोक म्हणताना भांबेरी उडाली. सावित्री विरोधकांनी याच संधीचे सोने करीत सावित्रीला सोशल मीडियावर ट्रॉल करायला सुरवात केली आहे. ज्याला गणेशवंदना येत नाही ती विधानसभेत काय दिवे लावणार? गणेशा तिला माफ कर! अशा मेसेजस सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागल्या आहेत. काही का असोना सावित्रीची सभा गाजली व सावित्रीही गाजल्या हे मात्र तितकेच खरे.∙∙∙

हा देखावा कशासाठी?

‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ या म्हणीची आठवण होण्याचे कारण म्हणजे केपे येथे पार पडलेला सरकारी कृषी मेळावा. सरकारने म्हणे या मेळाव्यासाठी चक्क पंचवीस लाख रुपये खर्च केले आहेत. भव्य मंडप, लाल व निळे कार्पेट, महाराजा खुर्च्या, कुलर व पंखे जणू काही पंचतारांकित व्यवस्था चिखलात वावरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केली होती. सरकारने इव्हेंट मॅनेजमेंटकडून हा भव्य इव्हेंट केला खरा. मात्र, याचा फायदा खरेच शेतकऱ्यांना झाला असेल का? पीपीटी माध्यमातून अधिकाऱ्यांनी विविध योजनांची माहिती दिली खरी. मात्र, दिवसभर बसून डझनभर प्रेझेन्टेशन व केंद्रीय कृषी मंत्री, मुख्यमंत्री व कृषी मंत्र्याचे भाषण ऐकून थकलेले कष्टकरी शेतकरी घरी जाताना कुजबुजलेच. ‘माटोव बरो, जेवण बरे, भाषण बरें आमकां किदें? ∙∙∙

<div class="paragraphs"><p>Goa Assembly Election 2022</p></div>
हेतुपूर्वक राजीनामा देऊन पक्षांतर करणाऱ्यांना निवडून आणू नका : फेर्दिन रिबेलो

अन् सोडला सुटकेचा नि:श्‍‍वास!

राष्‍ट्रीय महामार्ग लोकार्पणाचा सोहळा काल अखेर झाला. बगल रस्‍त्‍यांवर वायफळ खर्च नको म्‍हणून ठेकेदारानेच महामार्ग आधीच खुला केला होता. त्‍यादरम्‍यान लोकांनी, वाहनचालकांनी ज्‍या खस्‍ता खाल्ल्‍या त्‍याची गणती करता येणारच नाही. तरीही श्रेय मिळविण्‍यासाठी श्रेष्ठींनी केलेला आटापिटा व लोकांना अखेरच्‍या क्षणालाही त्रासदायक ठरला. महामार्गाच्‍या लोकार्पण सोहळ्यासाठी सोमवारी सकाळपासून वाहतूक अचानक बगल रस्‍त्‍याने वळविली. अचानक असे काय घडले? महामार्गावरून का जाऊ दिले जात नाही, अशा संभ्रमात वाहनचालक होते. पर्यायी रस्‍त्‍यामुळे दिवसभर वाहनकोंडीचे प्रकार वाढले. करासवाडा चाररस्‍ता येते तर वाहनचालकांची प्रचंड तारांबळ उडत होती. दररोज सुरळीत असताना अचानक वाहतूक कोंडी का झाली, हे बॅनर्सवरून निदर्शनास येत होते. वास्‍तविक उद्‍घाटन सोहळा सायंकाळच्‍या सत्रात होते. पण, वाहतूक सकाळपासून रोखून पर्यायी मार्गाने वळविली होती. लोकार्पण झाल्‍याने अखेर लोकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. ∙∙∙

भाजपाकडे (BJP) आहे कोरोना कवच?

‘आंधळे दळते अन कुत्रे पीठ खाते’ अशी गत आपल्या सरकारची झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जी वाताहात झाली व सरकारची जी छी थू झाली त्याचा दोतोर सावंतांना विसर पडलाय काय? कोरोनाचा वणवा झपाट्याने वाढत आहे. सरकारचे टास्क फोर्सने शिक्षण संस्था बंद करण्याचा आदेश लादला आहे. नाईट कर्फ्यूबद्दल सरकार विचार करीत आहे. दुसऱ्या बाजूने भाजपा व सरकारने जो धडाका लावला आहे, तो पाहता भाजपाला कोरोना कवच मिळाले आहे का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक. हजारो लोकांना जमवून भाजपाचा जनसभा होत आहेत. दुसऱ्या बाजूने सरकारी कार्यक्रमाचा धडाका लावला असून जनतेला सरकार व भाजपा कोरोनाच्या लाटेत ढकलत आहेत, असा आरोप व्हायला लागला आहे. दोतोर जनता स्वस्थ तर हजार निवडणुका होणार. ‘सर सलामत तो पगडी पचास’ हे आपण ऐकलेच असणार. ∙∙∙

मला नको, तुला नको, द्या बाबूला!

सध्या मडगावात (Margao) भाजपची उमेदवारी कुणाला द्यावी याचा सर्वात मोठा ताप भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना झाला आहे. कारण शर्मदच्या गोटातील उमेदवाराला उमेदवारी दिल्यास रुपेशच्या पोटात दुखते आणि रुपेशच्या माणसाला उमेदवारी दिल्यास शर्मदच्या कपाळावर आठ्या उमटतात. याचा प्रत्यय देश प्रभुदेसाई यांना नुकताच आला आहे. यावर तानावडे आणि सावंत या दुकलीने बाबू आजगावकर यांना मडगावात उभे राहण्याची ऑफर दिली आहे. नाहीतरी पेडणेत बाबू भाजपला जड झाला आहेच. मडगावात तो लढल्यास भाजपची डोकेदुखीही कमी होणार आणि मडगावात बाबूला ठेवणे म्हणजे भाजपसाठी आला तर डोंगर अन्यथा... ∙∙∙

<div class="paragraphs"><p>Goa Assembly Election 2022</p></div>
कोमुनिदाद जागेवर केलेल्या अतिक्रमण विरोधात RG उठवणार आवाज

बर्डे काँग्रेसच्या (Congress) गोटात?

म्हापशात पी. चिदंबरम यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा विधानसभा निवडणुकीसाठी म्हापशातील इच्छुक उमेदवार संजय बर्डे उपस्थित राहिल्याने ते आता काँग्रेस गोटात गेले असल्याची वार्ता म्हापसा शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्याच कार्यक्रमात ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा काहींनी (अप)प्रचारही केला. परंतु, बर्डे यांच्या तेथील उपस्थितीचे खरेखुरे कारण सर्वांनाच मागाहून कळले. गोव्यातील मान्यवर एनजीओंच्या प्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेण्याचा तो सार्वजनिक स्वरूपाचा कार्यक्रम होता व त्याच अनुषंगाने बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी काँग्रेसच्या त्या व्यासपीठावर शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडल्यानंतरच त्यासंदर्भात भुवया उंचावलेल्या व्यक्तींचे चेहरे अखेरीस शांत झाले. ∙∙∙

सरकारी कार्यालये सज्ज आहेत का?

कोविड महामारीची पहिल्यांदा लाट आली, त्यावेळेला मोठी खबरदारी घेण्यात आली. त्यानंतर दुसरी लाट आली. आता तिसरी लाट येत आहे; मात्र बहुतांश लोकांकडून आवश्‍यक खबरदारी घेतली गेल्याचे काही दिसत नाही. लोक सोडाच, पण सरकारी कार्यालयेही आता कोरोनाबाबत अपडेट राहिलेली नाहीत. पूर्वी कसे दारावर सॅनिटायझेशन सिस्टम, येणाऱ्याचे तापमान तपासण्याचे किमान तंत्र अवलंबले जात होते, पण आता पाहिले तर काही सरकारी कार्यालयात आव जाव घर तुम्हारा बनला आहे. एक मात्र खरे कोरोनामुळे लॉकडाऊन झाले तरी इतरांची रोजीरोटी बुडेल, पण सरकारी नोकरांना मात्र बिनधास्त पगार मिळेल, नाही का..! ∙∙∙

कार्यकर्ते केवळ निवडणुकांपुरतेच

मडगावमध्ये भाजप मंडळ अगदी निष्क्रिय झाले आहे. मंडळ पदाधिकारी कोण हे कार्यकर्त्यांनाही माहीत नाही. मंडळातील वेगवेगळ्या दिशेला तोंडे असलेले व दोन होड्यांवर पाय ठेवून वावरणारे पाच सहा नेतेच काय तो निर्णय घेतात व आपआपसात भांडतात. सध्या मडगावमध्ये कार्यकर्त्यांच्या म्हणण्याला महत्त्वच नाही. कार्यकर्त्यांची कामे सोडाच. पण, गेल्या पाच सहा वर्षांत एक कार्यकर्त्यांची बैठकही झालेली नाही. निवडणूक उमेदवारीवरून जो गोंधळ सुरू आहे, त्यासाठी राज्यस्तरीय पक्ष श्रेष्ठींनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवावी व त्यांचे म्हणणे ऐकून तरी घ्यावे अशी मागणी होत आहे. मडगावात भाजप कार्यकर्त्यांचा वापर केवळ निवडणुकांपुरताच अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्येच सुरू आहे आणि ती खरीही आहेच. ∙∙∙

ही फक्त सुरवात

कुठ्ठाळी मतदारसंघात कन्नडिगाला उमेदवारी द्यावी म्हणून पुढे आलेल्या मागणीमुळे अनेकांच्या भुवया उंचावणे साहजिकच आहे. वास्तविक त्यात आश्चर्य काहीच नाही. मुक्तीनंतर सत्तेवर आलेल्या सरकारांनी राबविलेल्या सदोष धोरणांचेच हे फलित आहे. साखवाळच कशाला, अनेक प्रमुख शहरांलगतच्या पंचायतीत बिगर गोमंतकीय निवडून येत आहेत. पण, त्यांना तसे म्हणता येणार नाही. कारण ते येथील मतदार आहेत. आता अशाप्रकारे उमेदवारीची जाहीर मागणी करणे अतीच झाले. हमखास विजयासाठी कोणत्याही थरावर जाणारे भाजपवाले ती मान्य करणार याची खात्री असल्याने तर त्यांनी ती केलेली नसेल ना? ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com