Dual Citizenship: पोर्तुगालमध्ये ज्यांनी आपल्या जन्माची नोंदणी केली आहे, त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय यापूर्वी भारत सरकारने घेतला होता. त्यामुळे अशा नागरिकांचे भारतीय पासपोर्ट रद्द व्हायचे. मात्र, अशा नागरिकांना आता पासपोर्ट मागे घेतल्याचे कार्ड दाखवल्यावर ओसीआय कार्डसाठी (अनिवासी भारतीय नागरिक) अर्ज करता येणे शक्य आहे, असे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने परिपत्रकाद्वारे हल्लीच जाहीर केले आहे.
त्यामुळे कित्येक गोमंतकीयांना दिलासा मिळाला असला, तरी याबाबत अजूनही पुरेशी स्पष्टता न आल्याने गोंधळाचे वातावरण आहे. हा सर्व गोंधळ दूर करण्यासाठी आणि या किचकट विषयावर कायमचा तोडगा काढण्यासाठी भारत सरकारनेही इतर देशाप्रमाणे दुहेरी नागरिकत्व कायदा लागू करावा, अशी मागणी राजकीय विश्लेषक आणि नेत्यांनी केली आहे.
ज्यांची जन्मनोंदणी पोर्तुगालात झाली आहे आणि ज्यांचे भारतीय पासपोर्ट रद्द झाले आहेत, त्यांना ओसीआय कार्डसाठी अर्ज करण्याची मुभा केंद्र सरकारने दिली असली तरी फक्त ‘आसेंत’ची सुविधा घेऊन गोव्यात राहणारे नागरिक हजारोंच्या संख्येने आहेत. त्यांना भारतातच राहायला हवे. अशा नागरिकांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल, तर दुहेरी नागरिकत्व हाच त्यावर एकमेव तोडगा आहे.
विदेशात जन्म नोंदणी झालेल्या नागरिकांना भारतात व्यवहार करण्यासाठी ओसीआय कार्डची सुविधा दिली जात असली तरी एकप्रकारचे ते दुय्यम नागरिकत्व आहे. अशा नागरिकांना भारतात मतदान करता येत नाही. एकप्रकारे या नागरिकांवर झालेला हा अन्यायच म्हणावा लागेल. याचसाठी जगातील शंभरहून अधिक देशांनी दुहेरी नागरिकत्व हा त्यावर तोडगा काढला आहे. भारत सरकारनेही या अशा तोडग्यावर विचार करण्याची आज गरज आहे.
दुहेरी नागरिकत्वाची मागणी अराष्ट्रीय होत नाही. काँग्रेसचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी एका सभेत दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे आणला होता. त्यामुळे त्यांची मागणी असंविधानिक म्हणून भाजपने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. गोमंतकीयांना दुहेरी नागरिकत्व मिळावे अशी कॅ. फर्नांडिस यांनी मागणी केल्यामुळे त्यांच्यावर तक्रार होत असेल, तर हा मुद्दा जिवंत आहे असे सांगणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांवरही गुन्हा व्हायला नको का?
पोर्तुगालात ज्यांनी जन्मनोंदणी केली आहे, त्यांचे भारतीय पासपोर्ट रद्द केल्यामुळे ते भारतीय नागरिकही नाहीत आणि पोर्तुगालचे नागरिकही नाहीत अशी त्यांची स्थिती झाली होती. अशा नागरिकांना ओसीआय सुविधाही घेता येत नव्हती. त्यामुळे या मुद्यावर केंद्राकडून तोडगा मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एकूण सह रिट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका आज बुधवारी सुनावणीस येणार असून केंद्र सरकारने नवीन परिपत्रक जारी केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ त्यावर काय निर्णय घेणार यासंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे.
1- पोर्तुगालात जन्मनोंदणी करूनही भारतीय पासपोर्ट बाळगणाऱ्या सुमारे 200 गोमंतकीयांनी आपल्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी अर्ज केले होते. मागचे १७ महिने त्यांचे हे अर्ज केंद्र सरकारच्या एका परिपत्रकामुळे अडकून पडले होते. आता परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे त्यांना ओसीआय कार्डसाठी अर्ज करता येणे शक्य आहे. यामुळे या २०० जणांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
2- मागच्या 17 महिन्यांत केवळ 200 गोमंतकीयांनीच पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केले असले, तरी असे अर्ज केल्यानंतर भारतीय पासपोर्ट रद्द केले जातात असे समजून आल्यावर किमान दीड हजार लोकांनी पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्जच केले नव्हते. आता त्यांनाही आपले भारतीय पासपोर्ट रद्द करून ओसीआय कार्डची सुविधा घेता येणे शक्य होणार आहे.
3-केंद्र सरकारने ओसीआय कार्डसाठी नवीन सोय केली असली तरी ही योजना परिपत्रक जारी केल्याच्या तारखेपासून लागू होणार, ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार यासंदर्भात काहीच स्पष्टता नसल्याने लोकांच्या मनात अजूनही संभ्रम आहे.
4-ज्यांची जन्मनोंदणी विदेशात झाली आहे, त्यांना भारतीय नागरिक म्हणून राहता येत नाही. त्यामुळे त्यांचे भारतीय पासपोर्ट वैध ठेवण्यात येऊ नयेत असे परिपत्रक परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने 30 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केले होते. त्यामुळे अशी नावनोंदणी केलेल्या गोमंतकीयांचे पासपोर्ट जमा केल्यावर त्यांना ‘सरेंडर सर्टिफिकेट’ न देता ‘रिव्होकशन सर्टिफिकेट’ दिले जायचे. यामुळे ज्यांचे पासपोर्ट यापूर्वीच रद्द झाले आहेत, त्यांनाही ओसीआय कार्ड घेण्याची सवलत मिळणार का? हाही प्रश्न लोकांना सतावत आहे.
5-गोव्यात कित्येकांनी आपल्या मुलांना किंवा नातवंडांना रोजगारासाठी युरोपची दारे उघडी रहावीत यासाठी पोर्तुगालात जन्म नोंदणी करून फक्त ‘आसेंत’ (पोर्तुगालमध्ये केलेली जन्मनोंदणी) परवाना मिळविला होता. मात्र, या नागरिकांना पोर्तुगालात जाऊन स्थायिक व्हायची किंवा तिथे जाऊन नोकरी करण्याची कुठलीही इच्छा नाही. अशा गोमंतकीयांची संख्या किमान 50 ते 60 हजार एवढी असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या नागरिकांचे भवितव्य काय याबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.