Illegal Sand Extraction: बाणस्तारी पुलाखाली चाललेल्या बेकायदेशीर रेती व्यवसायावर आज (शनिवारी) पहाटे किनारी सुरक्षा पोलिसांनी छापा टाकून ट्रक, होड्या तसेच जमा केलेली रेती जप्त केली. नदीच्या पात्रातून उत्खनन करून आणलेली रेती ट्रकमध्ये भरताना चौदा मजुरांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
याप्रकरणी सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांना याबाबत अजिबात माहिती नव्हती.
कामगार अडकले, माफिया पसार
बाणस्तारी पुलाखाली मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन करून ती रातोरात राज्यात पुरवली जात असल्याची तक्रार किनारी सुरक्षा पोलिसांकडे आली होती. त्यानुसार आज पहाटे पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या पथकाने ही कारवाई करताना रेती माफियांना अजिबात खबर लागू दिली नाही. अचानक पोलिसांच्या गाड्या रेती भरणाऱ्या ट्रकांजवळ आल्यानंतर मजुरांना पळ काढण्यास वेळच मिळाला नाही. मात्र, रेती माफियांनी पळ काढला. खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनाही यावेळी पाचारण केले होते.
आठ ट्रकांसह चार होड्या केल्या जप्त
बाणस्तारी येथे पुलाखाली गेली अनेक वर्षे बेकायदा रेती उत्खनन करून ती ट्रकमधून भरून वाहतूक केली जात होती. आज पहाटे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी रेती भरलेले आणि न भरलेले मिळून आठ ट्रक तसेच रेतीने भरलेल्या चार होड्या जप्त केल्या. १४ मजुरांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून या बेकायदा रेती प्रकरणात गुंतलेल्या माफियांना अटक करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
रेती व्यवसाय कायदेशीर करा
रेती व्यवसायावर बंदी असल्याने शेकडो कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. सरकारने हा व्यवसाय कायदेशीर करावा, रेती उत्खननावर मर्यादा घालावी, आवश्यक तेवढेच रेतीचे उत्खनन करण्यासाठी परवाने दिले तर रेतीच्या अव्वाच्या सव्वा दरावरही नियंत्रण येईल, असे रेती व्यावसायिकांनी सांगितले.
सरकारी यंत्रणांकडून डोळेझाक
बेकायदा रेती उत्खनन प्रकरणांत सक्षम अधिकार असूनही खाण खात्याचे अधिकारी काहीच कारवाई करताना दिसत नाहीत. बंदर कप्तान खात्यानेही अशा प्रकारांकडे डोळेझाक चालवली आहे. सगळे काही ‘चिरीमिरी’च्या जोरावर चालत असून स्थानिक पोलिसांनी बेकायदा रेती पकडायची सोडून किनारी सुरक्षा पोलिसांना हे काम करावे लागते, त्यावरून काय ते समजा, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.
स्थानिक पोलिस काय करतात?
राज्यात रेती उत्खननावर बंदी असली तरी रात्रीच्या वेळी बेकायदा रेती काढली जाते. रेती उत्खनन करणाऱ्या मजुरांना दिवसभर काम नसते. रात्र झाली की हे मजूर होड्या घेऊन नदीत रेती काढायला जातात. रात्री बाराच्या सुमारास ट्रकमधून ही रेती ग्राहकांच्या मागणीनुसार अव्वाच्या सव्वा दराने पुरवली जाते. विशेष म्हणजे, बेकायदा रेती उत्खनन आणि त्यानंतर वाहतूक करताना कोणत्याही पोलिस स्थानकाच्या हद्दीत हे ट्रक अडवले जात नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.