
फोंडा: मोले अभयारण्यातील वन कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळालेल्या संशयितांना कुळे पोलिसांनी वन कर्मचारी, दूधसागर असोसिएशनचे सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने जंगलात सर्च ऑपरेशन राबवून धारवाड, कर्नाटक येथील दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेतले होते. परंतु या हल्ल्यात दोघाच सहभाग आढळल्याने दोघांना सोडून देण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोले अभयारण्यात बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी वन कर्मचाऱ्यांनी धारवाड येथील श्रवण बसवराज कराडीगौडा (२३) व दर्शन महादेवप्पा मल्लागुंड्डी (२४) रोखले असता त्या दोघांनी वन कर्मचाऱ्यावर हल्ला चढविला. यात वन कर्मचारी मंगलदास गांवकर (४५) व नागू दहिफोडे (४६) हे जखमी झाले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने धारबांदोडा, पिळये येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दोघांच्याही डोक्यावर ४ -४ टाके घालण्यात आले व त्यांना घरी पाठवण्यात आले.
दरम्यान, याबाबत पोलिस तक्रार झाल्यानंतर हल्ला करून पळालेल्यांना पकडण्यासाठी कुळे पोलिस, वन कर्मचारी, दूधसागर असोसिएशनचे सदस्य व ग्रामस्थांनी जंगलात सर्च ऑपरेशन राबवले. दरम्यान, चारजण रेल्वे ट्रकच्या बाजूला संशयास्पद फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेउन कुळे स्थानकात आणले. पोलिस चौकशीत चौघांपैकी दोघेजण या हल्ल्यात सहभाग असल्याचे उघड झाले. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली व अन्य दोघांना सोडण्यात आले. पुढील तपास कुळे पोलिस करीत आहेत.
रीतसर तक्रार कुळे पोलिस स्थानकात नोंदवली आहे. वन नियमाचा भंग केल्याप्रकरणी पोलिस चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांना वन कस्टडीत नेण्यात येईल. तसेच वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलणार, असे फोंडा विभागाचे उपवनपाल जिस वर्की यांनी सांगितले.
या हल्ल्यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने सुरा घेऊन हल्ला चढविला. प्रतिकारावेळी सुरा बाजूला पडल्याने जीव वाचला. त्यानंतर त्या दोघांनी लाथाबुक्यांनी तसेच दंडुक्याने मारहाण केली. दंडुक्याचा वार डोक्यावर बसल्याने जबर दुखापत झाली. अन्य कर्मचारी त्या ठिकाणी पोचले, तोवर ते जंगलात पळून गेले. त्यानंतर आम्हाला उपचारासाठी हलवण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संशयितांच्या बॅगांची तपासणी केली असता बॅगेत मोठा सुरा लपविलेला पोलिसांना आढळला आहे. दरम्यान, संशयित धारवाडहून आलेल्या रेल्वेतून वास्को रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर तिथेही काही प्रवाशांशी त्यांचा वाद झाल्याने त्या प्रवाशांनी वास्को रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या संशयितांना वास्को रेल्वे पोलिसही ताब्यात घेणार आहेत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.