Margao News : सासष्टी, कवी हा संवेदनशील असावा. आसपासच्या परिस्थितीचा त्याच्या मनावर परिणाम होत असतो. कवीच्या मनाची जखम उघडी पडते, तेव्हा त्या भळभळत्या जखमेतूनच कवितेचे शब्द कवीला स्फूरतात अन् कविता जन्मते ,असे अभिनेता तथा कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी ‘काव्यानंद’ कार्यक्रमात मुलाखतीत सांगितले.
कविता तीच चांगली असते जिचे पुष्कळ अर्थ असू शकतात,असेही ते म्हणाले.
श्रेष्ठ कवी स्व. बाकीबाब बोरकर यांच्या जयंती दिनी ३० रोजी ‘काव्यानंद’चा शुभारंभ संगीतकार अशोक पत्की, कवी किशोर कदम यांच्या उपस्थितीत झाला. आमदार दिगंबर कामत, माजी आमदार दामू नाईक तसेच काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौमित्र म्हणाले, जो चांगले गाणे लिहू शकतो तो चांगला कवी पण होऊ शकतो. राजेंद्र तालक यांनी काव्यानंद हा उपक्रम सुरू केला आहे. कवी अमेय नाईक, अंबेश तलवडकर, डॉ. श्यामा सिंगबाळ, संजीव भरणे, आमोद कुलकर्णी, अभय सुराणा यांनी अप्रतिम कविता सादर केल्या.
दर चौथ्या शुक्रवारी काव्यानंद
रवींद्र भवनाच्या खुल्या जागेतील मिनी मंचावर काव्यानंदचे सादरीकरण महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी होणार आहे. यात नवोदित कवी, कवयित्रींना आपल्या रचना पेश करण्याची संधी प्राप्त होणार आहे. काव्यानंद बरोबर नाट्यांजली (नाटक, एकपात्री प्रयोग), स्वरांजली (गायन), नृत्यांजली (नृत्य) यातील कलाकारांनाही खुला मंच खुला असल्याचे राजेंद्र तालक यांनी सांगितले आहे.
संगीतकाराला गाण्याला चाल लावताना तारेवरची कसरत करावी लागते. कधी कधी गाण्याची चाल आधी बनते व नंतर त्यात शब्द घातले जातात. संगीतकारालाही चाल लावताना त्या गाण्याचा अर्थ कळणे गरजेचे असते.
-अशोक पत्की, संगीतकार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.