
पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी गोव्याच्या समुद्रात तैनात नौदलाच्या नौकेवर भारतीय जवानांसोबत साजरी करणार आहेत, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. या भेटीत ते नौदलाच्या जवानांसोबत स्नेहभोजनही करतील.‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी मोहिमेचे स्मरण म्हणून मोदींनी हा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, यावर्षी पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच भारतीय नौदलाच्या विशेष तुकडीसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. हे जवान देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करतात. मोदींची ही भेट नौदल जवानांच्या मनोबलात भर घालणारी ठरणार आहे.
पंतप्रधान झाल्यापासून २०१४ पासून नरेंद्र मोदी दरवर्षी दिवाळी देशाच्या विविध सीमांवर तैनात सैनिकांसमवेत साजरी करत आहेत. त्यांच्या मते, खरी दिवाळी म्हणजे राष्ट्ररक्षणासाठी सज्ज असलेल्या आपल्या जवानांसोबत साजरी केलेला सण. २०१४ साली त्यांनी पहिली दिवाळी सियाचिन ग्लेशियर (लडाख) येथे जवानांसोबत साजरी केली.
२०१५ मध्ये अमृतसर येथील दोराई युद्धस्मारकाजवळ तर २०१६ मध्ये हिमाचल प्रदेशातील सुमडो येथे त्यांनी सैन्य व सीमा सुरक्षा दलासोबत दीपावलीचा उत्सव साजरा केला. २०१७ मध्ये मोदी गुरेझ (जम्मू-काश्मीर) येथे, २०१८ मध्ये उत्तराखंडमधील हर्षिल येथे आयटीबीपी जवानांसोबत होते.
२०१९ मध्ये त्यांनी राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. २०२० मध्ये कोविड महामारीच्या काळात ते जैसलमेर (राजस्थान) येथील लोंगेवाला पोस्टवर, तर २०२१ मध्ये नौशेरा येथे गेले होते. २०२२ मध्ये त्यांनी कारगिल येथे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. २०२३ आणि २०२४ मध्ये त्यांनी अनुक्रमे हिमाचल प्रदेशातील लेप्चा आणि गुजरातमधील सिर क्रीक येथे तैनात सैनिकांसोबत सण साजरा केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.