PM Narendra Modi : टीकेची पर्वा करु नका; अल्‍पसंख्‍याकांना आपलंसं करा; पंतप्रधानांचा मूलमंत्र

गोव्यात राजकारणापलिकडे विचार करायला शिका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंत्री, आमदार आणि पक्षसंघटनेच्या नेत्यांना मार्गदर्शन
PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

PM Narendra Modi : केवळ राजकारण करू नका, गोव्याच्या हिताचे निर्णय घ्या. राजकीय क्षेत्रात काम करतानाही कल्पकता आणि हटके विचार करा, असे मत मांडून मोदी म्हणाले, गोव्यातील अल्पसंख्याकांकडे जाताना राजकारणाबाहेर विचार करा. केवळ मते मागण्यासाठी आम्ही तुमच्याकडे येत आहोत, असे कधीही अल्पसंख्याकांना वाटू देऊ नका. त्‍यांना आपलेसे करा, असा मूलमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

आपल्या गोवा भेटीत मोदी प्रफुल्लित, आनंदित होते आणि पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधताना त्यांच्या मनातील ही सद्‍भावना सतत जाणवली. त्यामुळे नेतेही पंतप्रधानांचे बोल ऐकताना आणि त्यांच्याशी हितगुज करताना भारावले. पंतप्रधान गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमुळे आनंदी मूडमध्ये होते आणि तोच मूलमंत्र त्यांनी गोव्यातील नेत्यांना दिला. तुम्हाला कोणी मते दिली याचा विचार करत बसू नका, तुम्ही जनतेचे प्रतिनिधीत्व करत आहात असे समजा, असे ते म्‍हणाले.

टीकेची पर्वा करू नका

मी सत्तेवर आलो, तेव्हा माझी छबी वेगळी होती. अत्यंत कडक नेता अशी माझी प्रतिमा होती, जी मी कालांतराने बदलली. आज मी संपूर्णतः सर्वसमावेशक बनलो आहे असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही तुमचे काम करत रहायचे आहे. कोणाच्या टीकेची पर्वा करू नका आणि टीकेला उत्तर देताना दुप्पट आक्रमक होऊ नका. लोकांबरोबरचा तुमचा संबंध वाढवा. जनतेशी तुम्ही सतत निकट असले पाहिजे.

2014 मध्ये मी सत्तेवर आलो तेव्हा स्वच्छतागृहे आणि साफसफाई हा विषय मांडला होता. तेव्हा लोक हसले होते. आज मला याच विषयावर जगभरातून शाबासकी मिळतेय. अनेक राष्ट्रप्रमुखांनी लेखी पत्र पाठवून माझे अभिनंदन केले आहे. माझे कौतुक झाले याचसाठी कारण मी स्वच्छतेबाबत बदल व्हावा या हेतूने काम केले आणि त्यात राजकारणाचा लवलेशही नव्हता. राजकारणाविषयी मानसिकता बदलली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी तसे प्रयोग सतत करत राहिले पाहिजे, असे मोदी स्थानिक नेत्यांना उद्देशून म्हणाले.

PM Narendra Modi
भाऊ, भाई आणि जॅक सिक्वेरा वादात 'मनोहर' नाव फायनल! तरीही पर्रीकरांचं नाव दिल्याने का होतोय वाद?

दोन आमदार राहिले अनुपस्‍थित

आमदार गणेश गावकर आजारी असल्यामुळे पंतप्रधानांच्या बैठकीला गैरहजर राहिले, तर काणकोणचे आमदार व सभापती रमेश तवडकर हे लोकोत्सवात गुंतले असल्याने त्यांना अनुपस्‍थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. ते वगळता नवांगतांमधले आठजण व भाजपचे आमदार तसेच पक्षसंघटनेतील ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. आठ वर्षे पंतप्रधानपदी राहिलेले नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सुखसंवाद करता आल्याने अनेक आमदारही सुखावले.

बैठकीत नेत्‍यांचे काढून घेण्‍यात आले मोबाईल

नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार आठ आमदारांनी आपला अनुभव सांगितला. गोव्यात मतदारांचा संपर्क वाढविण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग कसे आचरणात आणले, हे त्‍यांनी सांगितले. परंतु या बैठकीची खासियत म्हणजे बैठकीत व्यक्त झालेले विचार प्रसारमाध्यमांपर्यंत न पोचविण्याचे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. तसेच नेत्यांकडून त्यांचे मोबाईलही काढून घेण्‍यात आले होते. केवळ पाच-पाच जणांच्या गटांबरोबर मोदींनी फोटो काढू दिले.

कायम लोकांच्‍या संपर्कात रहा

मोदींनी आमदारांनाही बोलते करताना, तुम्ही लोकांबरोबरचे संबंध वाढविण्यासाठी काय कल्पकता वापरली, ते सांगण्याचा आग्रह धरला. तुम्ही 2022 मध्ये पुन्हा जिंकून आला याचा अर्थच गोमंतकीय जनतेला राज्यात भाजप हवा आहे. परंतु लोकांना तसे मनातून सतत वाटले पाहिजे, त्यांनी तुम्हाला मते देत राहिली पाहिजेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com