नरेंद्र मोदी आणि भाजप, निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी मंगळवारी केला आणि या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाईल असे सांगितले.
कवठणकर यांनी मंगळवारी काँग्रेस हाऊस येथे पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारच्या यंत्रणेचा वापर पक्षाच्या कामासाठी करत असल्याचा आरोप केला. यावेळी काँग्रेसचे नेते तुलिओ डीसूझा उपस्थित होते.
भाजप सरकारी यंत्रणा वापरून ‘विकसीत भारत’ अभियान करत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करून मडगाव येथे विकसीत भारतचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा सरकारी कार्यक्रम असल्याचे सांगून करदात्यांच्या पैसा खर्च केला होता, असे कवठणकर म्हणाले.
हा सरकारी कार्यक्रम असला तरी भाजप करदात्यांच्या पैशाचा वापर पक्षाचा प्रचार करण्यासाठी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून त्यांच्याकडे भरपूर पैसा आला असताना, त्यांना आमच्या पैशांची गरज का आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
करदात्यांच्या पैशाच्या वापर पक्षाच्या कामासाठी केल्याने आम्ही निषेध करतो. भाजपने काही कंपन्यांवर छापे टाकले आणि त्यांच्याकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळले, असा आरोप त्यांनी केला.
भाजप सरकारी प्लॅटफॉर्मचा वापर करून मोबाइल फोन आणि ईमेलवर ‘विकसीत भारत’चे संदेश पाठवत आहे, असे करून त्यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या प्रचाराचा मजकूर सरकारच्या प्लॅटफॉर्मवरून पाठवला जातो. प्रत्येकाने या प्रश्नावर विचार करायला हवा. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. आचारसंहिता लागू असताना ते सरकारच्या व्यासपीठाचा वापर करू शकत नाहीत, असे ते म्हणाले.
इलेक्टोरल बाँड्सचा फायदा कोणाला झाला हे सर्वांना माहित आहे. इलेक्टोरल बाँड हा मोठा घोटाळा आहे, असे तुलिओ डीसूझा यांनी म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.