Sanguem Accident: टँकरने घेतला दोघांचा जीव; कोठार्ली-सांगेतील दुर्घटना

5 महिन्‍यांपूर्वी मृत मंज्योतच्या भावाचाही झाला अपघाती मृत्‍यू
cotarli sanguem Accident
cotarli sanguem AccidentDainik Gomantak

Sanguem Accident: दाबामळ कोठार्ली-सांगे येथे रविवारी दुपारी 2.30 च्या सुमारास पेप्सी कंपनीला गॅसवाहू टँकरने दुचाकीला समोरून धडक दिली. यात मंज्योत च्यारी हा युवक जागीच गतप्राण झाला. तर गंभीर जखमी झालेल्या परप्रांतीय मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विशेष म्हणजे पाच महिन्यांपूर्वी मंज्योतचा भाऊ लवलेश याचाही पेप्सी कंपनीच्या वाहनामुळे अपघाती मृत्यू झाला होता.

एकाच घरातील दोन तरुण बळी गेल्यामुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातून वाहतूक होणाऱ्या अवजड वाहनांनी केली जात आहे. यामुळे अपघात होत असल्याने ग्रामस्थांचा आज संयम सुटला.

पेप्सी कंपनीला गॅस पुरवठा करून टँकर (क्र. पीबी 03 बीए 6913) हा सांगेकडे जात होता. तर एक दुचाकी (क्र. जीए 09 क्यू 6627) कोठार्ली येथून दाबामळ शेळपे दिशेला जात होती. दुपारी अडीचच्या सुमारास कोठार्ली दाबामळ येथील वळणावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या भीषण अपघातात दुचाकीचालक मंज्योत हा टँकरखाली येऊन आणि 20 मीटर फरफटत गेला. यात तो जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला आनंद बा (23, रा. झारखंड) हा मजूर गंभीर जखमी झाल्याने त्याला सांगे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

cotarli sanguem Accident
Aadhaar-PAN link : गोयकारांनो आधार-पॅन कार्ड लिंक करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पोलिसांकडून डोळेझाक

दुचाकी चालकांना तालांव देण्यासाठी दहा-पंधरा पोलिस घोळक्याने रस्त्यावर थांबतात आणि नियमभंग करणाऱ्या अवजड वाहनांना स्थानिक युवकांनी जाब विचारल्यास पोलिस युवकांना ताब्यात घेतात. हे कधी थांबणार?

अरुंद रस्त्यावरून अवजड वाहतूक केली जात आहे. या अवजड वाहतुकीला अजून किती बळी हवे? स्थानिक प्रशासन अशीच डोळेझाक करणार काय? असा संताप स्थानिकांनी व्यक्त केला.

पाच महिन्यांत दोन पुत्र गेले

पाच महिन्यांपूर्वी पेप्सी कंपनीच्या अवजड वाहनाखाली सापडून लवलेश च्यारी याचा बळी गेला होता. तर आज त्याच कंपनीच्या टँकरखाली सापडून मंज्योत याचा मृत्यू झाला. एकाच घरातील दोन बळी गेल्याने वडील मनोहर च्यारी हताशपणे आपला संताप व्यक्त केला.

मंज्योत यांच्या पश्‍चात पत्नी, दोन लहान मुले व आई-वडील असा परिवार आहे. च्यारी कुटुंबियांवर आलेले हे दुसरे संकट असल्यामुळे या घटनेने कुटुंब कोलमडून गेले आहे

कंपनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

अपघातात दोन जणांचे बळी गेले असताना पेप्सी कंपनीने उत्पादन सुरूच ठेवले. आपल्याला या घटनेची माहिती पाच वाजता मिळाली असे सांगत त्यांनी हात वर केले. घटनेनंतर पाच तास मृतदेह रस्त्यावर असतानाही साधी सहानभूती व्यक्त करण्यासाठी कंपनीचा कोणताही अधिकारी तिकडे फिरकला नाही.

काही काळाने घटनास्थळी आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना संतप्त जमावाकडून अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

cotarli sanguem Accident
Goa Corona Update: वाढत्या कोविड संक्रमणांवर आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील; GMC मध्ये एक वॉर्ड राखीव

स्थानिकांच्या सहनशीलतेचा अंत

  • लवलेशच्या अपघाती मृत्यूनंतर शेळपे औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या अवजड वाहनांवर शिस्त आणण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.

  • याकरिता त्यांनी रास्ता रोको आंदोलनही केले होते. मात्र, पाच महिन्यांनंतर अवजड वाहनामुळे एकाच घरातील दुसऱ्या युवकाचा बळी गेल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला.

  • अवजड वाहतूक कोणाच्या बळावर केली जात आहे? याचे उत्तर मिळेपर्यंत मंज्योतच्या मृतदेहाला हात लावू देण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला.

  • लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर रात्री आठ वाजता मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला.

दिवसभर काय घडले?

  • अडीच वाजता अपघात झाल्यानंतर सांगेचे मामलेदार गौरव गावकर हे संध्याकाळी ५.१५ वाजता घटनास्थळी दाखल झाले. पेप्सी कंपनीचे अधिकारी अपघातस्थळी येत नाही, तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे ग्रामस्थांनी निक्षून सांगितले.

  • संध्याकाळी ६ वाजता स्थानिक आमदार तथा समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई घटनास्थळी आले. स्थानिकांसोबत त्यांची चर्चा सुरू असताना कंपनीचे अधिकारी हजर झाले.

  • दोन जणांचा अपघातात बळी जाऊनही कंपनीने उत्पादन सुरूच ठेवल्याबद्दल मंत्र्यांनी त्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. मात्र, स्थानिकांच्या प्रश्‍नांवर अधिकाऱ्यांनी बोटचेपी भूमिका घेतली.

  • रात्री आठपर्यंत तोडगा निघत नसल्याने अखेर मंगळवारी सकाळी ८ वाजता कोटार्ली येथे आमदार फळदेसाई, कंपनीचे अधिकारी, प्रशासनाचे अधिकाऱ्यांची ग्रामस्थांसोबत बैठक घेतली जाईल, असे ठरले.

  • या महत्त्वपूर्ण बैठकीवर पेप्सी कंपनीचे भवितव्य अवलंबून आहे. ग्रामस्थांच्या म्हणणे आहे, की कंपनी बंद करा किंवा वाहतुकीसाठी नवीन रस्ता तयार करा; पण गावातून वाहतूक नकोच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com