Pilerne Fire: पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील ‘बर्जर बेकर कोटिंग’ या रंग उत्पादन करणाऱ्या कंपनीला लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले. सरकारी यंत्रणांनी रात्रंदिवस परिश्रम करून आग विझवली असली, तरी आता आव्हान आहे ते कंपनी पूर्ववत सुरू होण्याचे.
दुर्घटनेच्या पहिल्याच दिवशी कंपनीने सर्व कामगारांची काळजी घेतली जाईल असे सांगितले असले, तरी येथील कामगारांना भविष्याची चिंता लागून राहिली आहे.
कंपनी पूर्ववत उभा राहून उत्पादन कधी सुरू होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कंपनीकडे सुमारे 120 कामगार आहेत. मात्र, त्यापैकी मोजक्याच कामगारांना कामावर बोलावले जाते, तर काही अधिकाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ दिल्याचे सांगण्यात आले.
याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कंपनी वस्तुस्थिती लपवते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कंपनीतील 120 कर्मचाऱ्यांपैकी काही कायमस्वरूपी, तर काही कंत्राटी पद्धतीवर आहेत. कंपनीत सकाळी आणि सायंकाळी अशा दोन शिफ्टमध्ये काम चालते.
मंगळवारी (ता.10) या कंपनीच्या गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती. आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळविण्यास तीन दिवस लागले. सुरुवातीचे तीन दिवस कंपनीच्या आवारात बघ्यांची तसेच लोकांची ये-जा सुरू होती.
मात्र, गुरुवारी ही मोकळीक पूर्णतः बंद करण्यात आली. कंपनीच्या प्रवेशद्वारावर आता प्रत्येकाची माहिती नोंद केली जाते. याशिवाय सुरक्षा रक्षकांकडून संबंधितांना भेटीचे कारण विचारले जाते.
आग दुर्घटनेचा मानवनिर्मित आपत्तीमध्ये समावेश
पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील बर्जर या रंगांच्या कंपनीला लागलेल्या आगीचा मानवनिर्मित आपत्तीमध्ये समावेश करण्याची अधिसूचना महसूल विभागाने काढली आहे. यापूर्वी स्थानिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीशी संबंधित नैसर्गिक दुर्घटनांमध्ये 9 आपत्तींचा समावेश केला असून 6 आपत्ती या मानवनिर्मित म्हणून जाहीर केल्या आहेत.
अधिकाऱ्यांचे बैठकांचे सत्र
काहीजणांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, गुरुवारी सायंकाळपर्यंत आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण आले. आता सर्व काही स्थिरस्थावर होण्यास थोडा वेळ लागेल. सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून कंपनीतील कामगारांचा विषयही व्यवस्थित हाताळला जाईल.
कंपनीच्या आधाराची प्रतीक्षा : काही कामगारांनी सांगितले की, कंपनी कर्मचाऱ्यांची योग्य ती काळजी घेते. कोविड महामारीच्या काळात काही कंपन्यांनी कामगार कपात केली, तर काहींनी कर्मचाऱ्यांचा अर्धे वेतन दिले. मात्र, आमच्या कंपनीने कोविड काळात पूर्ण पगार दिला. आता आगीच्या या दुर्घटनेनंतर त्यांना कंपनीकडून भक्कम आधाराची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.