पणजी: निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपचा उमेदवार निवडून द्या, पेडण्याला मंत्रीपद देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, आमदार प्रविण आर्लेकर यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले होते. खाते वाटप जाहीर झाल्यावर त्यांनी सरळ पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर धडक दिली. पेडण्याला मंत्रिपद द्या आणि आश्वासनाची पूर्ती करा, असा आग्रह धरला. सुरवातीला त्यांना मुख्यमंत्री भेटले नाहीत. अखेर भाजप नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना नवे आश्वासन देऊन शांत करण्यात आले.
पहिल्या मंत्रिमंडळात पेडण्याला स्थान देण्यात आले नाही. तिथूनच नाराजीला सुरवात झाली होती. आता उरलेल्या तीन रिक्त मंत्रिपदांमध्ये आर्लेकर यांना स्थान नसल्याचे संकेत मिळाल्याने आर्लेकर समर्थक आधिकच आक्रमक बनले. अगोदर या कार्यकर्त्यांनी दुपारी पेडणे येथे सभा घेत सरकारवर टीका केली आणि तिथून सरळ मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्याची वाट धरली. मुख्यमंत्री व्यस्त असल्याचे सांगत त्यांची भेट नाकारण्यात आली.
त्यामुळे नाराज झालेल्या समर्थकांनी पत्रकारांकडे व्यथा मांडली. अखेर मुख्यमंत्र्यांनी या कार्यकर्त्यांची भेट घेऊन अजून मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे, आर्लेकर यांना मंत्रीपद मिळू शकेल किंवा महत्वाचे महामंडळही मिळेल, असे नवे आश्वासन दिले. तसेच मंत्री न बनताही जनतेचा विकास करता येतो. यापुढेही आमचे सरकार विकासासाठी प्रयत्नशील राहील असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.