Mumbai Goa Highway: काळ आला होता पण...दैव बलवत्तर म्हणून रूपाले कुटुंब बचावले

Mumbai Goa Highway: मालपे - पेडणे येथे महामार्गावर कोसळली दरड व संरक्षक भिंत
Mumbai Goa Highway
Mumbai Goa Highway Dainik Gomantak

Mumbai Goa Highway

मालपे येथे आज सकाळी 10 वाजता नव्याने बांधलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दरड व संरक्षक भिंत कोसळली. यावेळी दापोली (रत्नागिरी) येथील एक कुटुंब थोडक्यात बचावले.

हे कुटुंब गोव्यात सहलीसाठी येत असताना अचानक त्यांच्या चारचाकीसमोर महामार्गावर दरड व संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

पोरस्कडे ते मालपेपर्यंत नव्याने बगल महामार्ग केला आहे. महिन्यापूर्वी हा महामार्ग वाहतुकीसाठीही खुला केला आहे. हा महामार्ग करताना बाजूचे डोंगर निमुळते न कापता उभे कापले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात दरड कोसळणार, अशी शक्यता माध्यमांनी अनेकदा वर्तविली होती आणि झालेही तसेच.

पावसाळ्याच्या प्रारंभीच डोंगराची दरड कोसळून महामार्गावर पडली. एका ठिकाणी या दरडीमुळे संरक्षक भिंतही कोसळून पडली. दापोली - रत्नागिरी येथील अशोक रुपाले हे कुटुंबीयांसोबत त्यांच्या जीजे - ०३ - जेएल - ०५९१ या क्रमांकाच्या कारने गोव्यात येत होते. यावेळी त्यांच्यासोबत कारमध्ये पत्नी आणि दोन मुले होती. मालपे येथे अचानक डोंगरावरून दरड कोसळली. प्रसंगावधान राखून त्यांनी कार थांबवली. दरडीतील काही दगड व माती कारच्या बॉनेट व बंपरवर पडले. मात्र, या दुर्घटनेतून रूपाले कुटुंबीय सुखरूप बचावले.

दरड कोसळल्यानंतर पेडण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रथमेश पार्सेकर, तसेच वाहतूक विभागाचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळविली.

धारगळ येथेही पुनरावृत्ती : महाखाजन-धारगळ येथील राष्ट्रीय महामार्गावरही आज सकाळी दरड कोसळली. गेल्यावर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी महामार्गावर दरड कोसळली होती. या डोंगरावर भले मोठे खडक असून ते वेळीच न हटविल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

Mumbai Goa Highway
मंदीत संधी! IIT Goa च्या 90 टक्केपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची बाजी; Google, Siemens, Accenture सारख्या कंपनीत प्लेसमेंट

पहिल्याच पावसात जर संरक्षक भिंती कोसळतात, तर मोठा पाऊस पडल्यानंतर काय स्थिती होईल याची कल्पनाच न केलेली बरी. एमव्हीआर या कंत्राटदाराविरुध्द मी सतत आवाज उठवत आलो आहे. संपूर्ण महामार्गाची या कंत्राटदाराने दुर्दशा करून टाकली आहे, परंतु सरकारकडून त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही ही शोकांतिका आहे.

- जतीन कामत, शिवसेना राज्य प्रमुख (ठाकरे गट)

राष्ट्रीय महामार्ग ६६ ची भयानक अवस्था झाली असून नियोजन नाही व निकृष्ट काम यामुळे हा मार्ग लोकांचा कर्दनकाळ ठरू शकतो. सहाव्यांदा निवडून आलेले खासदार आणि केंद्रीयमंत्री श्रीपाद भाऊंनी आता या राष्ट्रीय महामार्ग ६६ ची पत्रादेवीपासून महाखाजनपर्यंत तपासणी करून योग्य सूचना व उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा या मार्गावर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- राजन कोरगावकर, निमंत्रक मिशन फॉर लोकल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com