आगोंद: गोवा राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या गृहआधार आणि दयानंद सामाजिक योजनेचे मानधन काणकोण तालुक्यातील लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यांपासून मिळाले नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले आहेत. सरकारने ही रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी होत आहे.
काणकोण तालुक्यात 1,562 ज्येष्ठ नागरिक, 66 जण विशेष व्यक्तींच्या गटात; तर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली 6 हजार लाभार्थी आहेत. या सर्वांना राष्ट्रीयकृत बँकांमार्फत आर्थिक मदत वितरित केली जात असून, रक्कम खात्यात जमा झाली की नाही, याची पडताळणी करण्यासाठी त्या सर्वांना बँकेमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत.
सर्व गरजवंताना सरकारकडून देय असलेली आर्थिक मदत गेल्या चार महिन्यांपासून मिळालेली नाही. ती त्वरित देण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी सरपंच सचिन नाईक यांनी केली. जनतेसाठी सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. महिनाकाठी ठरावीक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत होती. त्यामुळे ज्यांना कुणाचा आधार नाही, अशा नागरिकांना या योजनेचा चांगला लाभ होत होता. मात्र काणकोण तालुक्यातील लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून या योजनांचे पैसे मिळालेले नाहीत. काही ज्येष्ठ नागरिकांचे सरकारकडून मिळणाऱ्या पैशांवरच औषधोपचार अवलंबून असल्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले.
विधानसभा निवडणूक काळात सरकारकडून दिल्या जाणाऱ्या योजनांचे पैसे वाढवून देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पूर्वीचीच रक्कम मिळत नसल्याने गरजवंत त्रस्त झाले आहेत. किमान पूर्वीचेच मानधनतरी वितरित करा, अशी ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.