यूकेमधून गोव्याला येणाऱ्या एका प्रवाशाने विमान प्रवासाचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. डेव्हिड पार्कर (62) प्रवासी त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत गोव्याला येत होता.
डेव्हिड बोईंग 787 द्वारे प्रवास करत असताना त्याला विमानाच्या पंखावर गॅफर टेपने डागडुजी केल्याचे दिसून आले. या विचित्र प्रकारामुळे प्रवासी डेव्हिड चांगलाच घाबरल्याचे त्यांनी सांगितले. 5 फेब्रुवारी रोजी हा प्रकार उघडकीस आल्याचे न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे.
गोव्यात येण्यासाठी विमानाने उड्डाण घेतल्यानंतर हवेत विमानाच्या पंखावर माझे लक्ष गेले. विमानाच्या पंख्यावर गॅफर टेपचे पॅचवर्क केल्याचे पाहून मला धक्काच बसला. विमान हवेत असतानाच गुंडाळलेली टेप सुटायला लागली, यापूर्वी मी असे कधीच पाहिले नसल्याचे त्यांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर 787 चे उत्पादन करणाऱ्या बोईंग कंपनीने याबाबत स्पष्टीकरण देत ती गॅफर टेप नव्हे तर 'स्पीड टेप' असल्याचे स्पष्ट केले. तसेच टेप पूर्णपणे सुरक्षित आहे आणि विमानाच्या संरचनात्मक रचनेशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही.
यापूर्वी देखील बोईंग 787 च्या रंगाबाबत समस्या निर्माण झाली होती. कंपनी विमान आणि ग्राहकांच्या सुरक्षितता याबाबत नेहमीच काळजी घेत असते, असेही बोईंगने म्हटले आहे.
उत्पादन प्रक्रियेचा भाग म्हणून विमानांना नवीन लेअर चढविण्यासाठी देखील काम करत आहोत. स्पीड टेप ही फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने काही तात्पुरत्या निराकरणासाठी मंजूर केलेली सामग्री आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.