

Partagali Math Closed from January 2: श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचा ५५० वा ऐतिहासिक वर्धापन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या भव्य सोहळ्यानंतर आता मठाच्या पायाभूत सुविधा आणि सौंदर्यीकरणाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर, येत्या २ जानेवारी २०२६ पासून मठाचा परिसर भाविक, पर्यटक आणि सर्व अभ्यागतांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मठाच्या बांधकाम समितीने दिलेल्या माहितीनुसार, ५५० व्या वर्षपूर्ती सोहळ्यामुळे काही नागरी (Civil) आणि सजावटीची (Finishing) कामे थांबवण्यात आली होती. आता हा सोहळा संपन्न झाल्याने, ही उर्वरित कामे पुन्हा सुरू केली जाणार आहेत.
यामध्ये प्रामुख्याने मठ परिसरातील अंतर्गत बांधकामे आणि नव्याने स्थापित केलेल्या 'राम प्रतिमे'च्या सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण यांचा समावेश असून हे संपूर्ण प्रकल्प कार्य शिस्तबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मठ परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामाची यंत्रसामग्री आणि साहित्य असेल. अशा परिस्थितीत भाविक किंवा पर्यटकांचा वावर असल्यास सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कोणताही अनपेक्षित अपघात टाळण्यासाठी आणि कामात व्यत्यय येऊ नये यासाठी समितीने सार्वजनिक प्रवेशावर निर्बंध घातले आहेत.
जोपर्यंत पुढील अधिकृत सूचना किंवा नोटीस प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत मठात येणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वैयक्तिक सुरक्षा आणि प्रकल्पाची वेळेत पूर्तता या दोन्ही दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलेय.
मठाच्या बांधकाम समितीने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय घेताना भाविकांच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेचा पूर्ण आदर राखण्यात आला आहे. परंतु, मठाचे पावित्र्य आणि भव्यता टिकवून ठेवण्यासाठी उर्वरित कामे पूर्ण करणे अपरिहार्य आहे. सार्वजनिक हितासाठी आणि मठाच्या दीर्घकालीन सोयीसाठी हा तात्पुरता बदल स्वीकारावा, अशी विनंती करण्यात आलीये.
मठाचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि परिसर पुन्हा दर्शनासाठी सुरक्षित झाल्यानंतर, समितीकडून स्वतंत्रपणे जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाईल. तोपर्यंत भाविकांनी मठाकडे न येता प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आलीये. या कालावधीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल समितीने दिलगिरी व्यक्त केली असून, मठाच्या अधिकृत माध्यमांद्वारे वेळोवेळी अपडेट्स दिले जातील, असेही सांगण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.