Sadetod Nayak: पणजीत मुख्य कार्यालये आहेत, दररोज दहा हजारांवर वाहने शहरात ये-जा करतात. पोर्तुगीज काळापासून असलेल्या या शहराचा काळानुसार आणि भविष्याचा विचार करून विकास झालेला नाही. तसेच वाहनधारकांत स्वयंशिस्त नाही, त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात.
एकमेकांवर आरोप करून उपयोग नाही, स्वयंशिस्त लावून घेतल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात, असे मत वाहतूक विभागाचे उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी ‘सडेतोड नायक'' या कार्यक्रमात व्यक्त केले.
‘गोमन्तक’च्या सडेतोड नायक या कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी सोमवारी पणजीत झालेल्या वाहतूक कोंडीवर शिरोडकर आणि माजी महापौर तथा नगरसेवक उदय मडकईकर यांच्याशी चर्चा केली.
पणजीत ठिकठिकाणी खोदकाम होत असून ‘स्मार्ट सिटी’चे काम सुरू आहे. अशा कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत, काहीठिकाणी रस्ते बंद आहेत, असे असताना वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात आहे.
वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलिस नजरेस पडत नाहीत. त्यामुळे पोलिस कुठे आहेत, असा प्रश्नही विचारला जातो, यावर शिरोडकर म्हणतात, पणजी शहरात पोर्तुगीजकालीन सुविधांचा अजूनही वापर होत आहे. स्मार्ट सिटी हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. काही ठिकाणी मलनिस्सारण प्रकल्पाच्या वाहिन्या टाकण्याचे गटारांचे काम सुरू आहे.
बेशिस्तपणामुळे पडतेय कोंडीत भर !
सार्वजनिक पार्किंग ठिकाणे पणजीत आहेत तरी कुठे, त्यामुळे लोक कसेही कोठेही वाहने पार्क करतात. 18 जून रस्त्यावर केवळ पार्किंगचे नियम मोडल्याची 3 हजार 600 प्रकरणे घडली आहेत.
पणजीत येणारा प्रत्येकजण वाहन घेऊन येतो. पणजीतील रस्ते अजूनही पोर्तुगीज काळातीलच आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. स्मार्ट सिटी प्रकल्पात पार्किंग, वाहतूक व्यवस्था, सिग्नल या सुविधांचा त्यात समावेश आहे. परंतु लोक स्वतःची जबाबदारी विसरले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे, असेही पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी नमूद केले.
‘स्मार्ट’ अधिकाऱ्यांचे ‘रिटायर्ड लाईफ’!
नगरसेवक उदय मडकईकर यांनी सकाळ, दुपार आणि संध्याकाळी महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिस असणे आवश्यक असताना ते असत नाहीत, यावर बोट ठेवले. त्यांनी त्यासाठी शहरातील मार्केट, वैद्य हॉस्पिटल अशी ठिकाणांची नावेही सांगितली.
आज मार्केटपासून भाटल्यात जाण्यासाठी 45 मिनिटांचा कालावधी लागल्याचेही त्यांनी सांगितले. जी कामे चालली आहेत, त्याबाबत संबंधित सरकारी खात्यांची जबाबदारी आहे. स्मार्ट सिटीचा एकही अधिकारी फिरकत नाही, ते अधिकारी निवांत ‘रिटायर्ड लाईफ’ जगत असल्याचाही आरोप केला.
चर्चेतून समोर आलेले मुख्य मुद्दे
कामे सुरू आहेत, पण पुढे चांगली सुविधा मिळेल.
पार्किंग संबंधीचा मुख्य आराखडा नाही.
वाढती वाहनसंख्याही कोंडीला कारण.
ही कामे ‘स्मार्ट सिटी’ने आधीच करायला हवी होती.
शहरातील कामांत नियोजनाचा अभाव.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.