Panaji News : तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; ‘आप’चे आव्हान

Panaji News : निकालाआधी जाहीर केलेल्‍या मताधिक्‍यावरून साधला निशाणा
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji News :

पणजी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच उत्तर व दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवारांचे मताधिक्य जाहीर केले आहे.

तेवढे मताधिक्य भाजप उमेदवारांना मिळाले नाही, तर राजीनामा देण्याची हिंमत मुख्यमंत्री दाखवतील काय? असे आव्हान त्यांना आज ‘आप’कडून देण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी कालच काँग्रेसने निकालाआधीच पराभव मान्य केला, खासगीत ते तसे सांगत आहेत असा दावा केला होता. त्याच्या २४ तासांत त्यांना हे आव्हान देण्यात आले आहे.

आपचे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की मुख्यमंत्र्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यात जावे लागले. यावरून त्यांना निवडणूक किती भारी पडली होती ते दिसून येते.

ऐन मतदानावेळी त्यांना मोतिडोंगरचा राजा दिगंबर कामत असतानाही तेथे तळ ठोकावा लागला होता यावरून ते किती घाबरले आहेत हे लक्षात येते. मुख्यमंत्री एरव्ही राज्याच्या ज्या ज्या भागात गेले नसते तेथे विधानसभा नव्हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पोचले. त्यांना या निमित्ताने कचरा साचून राहिलेले राज्य नजरेस पडले असेल.

लोक मूलभूत सुविधांपासून कसे वंचित आहेत याची जाणीव झाली असेल. राज्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना या दौऱ्याचा उपयोग होईल असे आम्ही मानतो. त्यांनी ही निवडणूक फार गांभीर्याने घेतली होती. त्यांनी आम्ही केलेल्या कामाची दखल घेतली याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, पण निकालाआधीच मताधिक्य जाहीर केल्याने तेवढे मताधिक्य प्रत्यक्षात मिळाले नाही, तर ते आपली खुर्ची सोडण्याची हिंमत दाखवतील काय? नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तसे केले पाहिजे.

‘वाढलेला टक्काच भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरणार’

पक्षाचे दक्षिण गोवा कार्यकारी अध्यक्ष जर्सन गोम्स यांनी मोतिडोंगरावरील मतदारांना मतदान करा अन्यथा बुलडोझर फिरवू असे धमकावण्यात आल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मतदान सुरू झाल्यानंतर मुख्‍यमंत्र्यांना दक्षिण गोव्यात धाव घ्यावी लागली.

त्यांनी मोतिडोंगरावर तळ ठोकला. सासष्टीत मतदान ९ टक्क्याने वाढले आहे, तर उर्वरित भागात ते १३ टक्क्यांनी वाढले आहे. हा वाढलेला टक्काच भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरणार आहे.

Panaji
Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटेल

पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी या निवडणुकीत सच्चा भाजप कार्यकर्त्याने इंडिया आघाडीचा उमेदवार जिंकण्यासाठी मदत केल्याचा दावा केला. ते म्हणाले, भाजपचा मूळ कार्यकर्ता वैतागला आहे. महागाई, बेरोजगारी आणि गैरव्यवहार याने कळस गाठला आहे.

आम्ही यासाठीच भाजपचे सरकार निवडून दिले होते का? असा प्रश्न त्याला पडला आहे. त्यामुळे त्याने बदलासाठी मतदान केले आहे. मतमोजणीवेळी भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com